‘मानवतेचा पाईक’ :– उपेक्षितांच्या आयुष्याची प्रकाशवाट कधी कधी एका पुस्तकाची सुरुवात एखाद्या साध्या फोन कॉलपासून होते. पण त्या फोनपलीकडून सुरु झालेली ही वाटचाल केवळ एका पुस्तकापुरती मर्यादित राहत नाही, तर ती एका समाजभान असलेल्या जाणिवेची साक्ष बनते. ‘मानवतेचा पाईक’ हे शिवाजी सूर्यवंशी यांनी लिहिलेलं निवृत्ती बाळू फाळके यांचं चरित्र हे अशाच एका प्रगल्भ सामाजिक वास्तवाचे भाष्य आहे. तेही कुठलाही गाजावाजा न करता. ही केवळ एका व्यक्तीची कथा नाही, तर ही शतकानुशतकांच्या उपेक्षेचा जिवंत दस्तऐवज आहे. ही कथा आहे गावकुसाबाहेर जन्मलेल्या, दोरखंड-वळणाऱ्या एका मांग मजुराच्या पोटी जन्माला आलेल्या निवृत्ती फाळके यांची. ही कथा आहे तळातल्या माणसाच्या कळकळीच्या संघर्षाची, ज्यांनी स्वतःचा रस्ता पायाखालूनच निर्माण केला. नशिबाशी झगडत, समाजाच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवत आणि तरीही मनात कोणताही आकस न ठेवता ‘बापू’ म्हणून सन्मान मिळवणाऱ्या या माणसाची कहाणी ‘मानवतेचा पाईक’ म्हणून ओळखली जाते. शिवाजी सूर्यवंशी यांच्या लेखणीत जेवढी सुसंवादिता आहे, तेवढाच संयम आणि सुस्पष्टता आहे. लेखकाने निवृत्ती फाळके यांच्या आयुष्यातील अनेक सामाजिक, भावनिक व आर्थिक स्तरांवरचे कंगोरे अतिशय संयतपणे मांडले आहेत. कुठेही बटबटीत भावनांना वाट न देता त्यांनी गोष्ट मुळाशी पोहोचून सांगितली आहे. लेखकाने केवळ पात्राचे बाह्य जीवनच नाही तर अंतःकरणातील वादळेसुद्धा शब्दबद्ध केली आहेत. वडील बाळू फाळके व आई चिंगाबाई यांच्या जीवनातील अठराविश्वे दारिद्र्य, कष्ट, जातीचा ठपका आणि त्यातूनही जपलेली मानवता या गोष्टींचे वर्णन वाचकांच्या डोळ्यांसमोर चित्र उभं करतं. चिंगाबाईसारख्या सुईणीच्या हातात असलेला ‘देवहस्त’, तिचं सेवा भावाचं जीवन हे आजच्या वैद्यकीय व्यवस्थेलाही प्रेरणा देईल असं आहे. निवृत्ती फाळके या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण एका ज्वालामुखीसारखी झाली आहे. शांतपणे धगधगत, पण अंतर्बाह्य रूपांतरण घडवत. बालपणापासूनच त्यांना जातीयतेचे, गरिबीचे आणि शैक्षणिक अंधाराचे चटके बसत गेले. विहिरीवरून पाणी पिण्याच्या क्षुल्लक गोष्टीमुळे झालेला अपमान असो, की सवर्ण मित्रांबरोबर कुस्ती खेळल्यामुळे मिळालेली शिक्षा.. प्रत्येक प्रसंगाने त्यांच्या मनात विष न निर्माण करता अधिक सजगता, सहनशीलता आणि आत्मभान जागं केलं. जेव्हा त्यांच्या वडिलांवर सरपंचाने बनावट कागदपत्रांच्या आधारे आरोप करून अटक करण्याचा कट रचला, तेव्हा निवृत्तीने पहिल्यांदा अन्यायाविरुद्ध आवाज उठविला. हीच घटना त्यांच्या जीवनाचा टर्निंग पॉईंट ठरली. अन्यायाला न घाबरता, ‘बळ’ नसलेल्या समाजासाठी आवाज बनण्याची त्यांची सुरूवात झाली. मुंबईसारख्या नगरीत पाय रोवणं हे सुसंस्कृत शिक्षित माणसासाठीही अवघड. मग एका अशिक्षित, सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या माणसासाठी ती तर अत्यंत खडतर वाटचाल ठरते. मात्र, निवृत्ती फाळके यांचं समाजशील वर्तन, निस्वार्थ सेवाभाव आणि कधीही न डळमळणारा नैतिक आधार या तीन गोष्टींमुळे त्यांच्या आयुष्यात अनेक माणसं जोडत गेली. कोणत्याही जातीचा असो, कुणालाही मदत करणं, त्यासाठी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवणं हीच त्यांची ओळख झाली आणि लोक त्यांना ‘बापू’ म्हणून मानू लागले. कादंबरीचं अजून एक विशेष म्हणजे त्यात वापरलेली बोलीभाषा. खटाव तालुक्यातील बोली, त्यातील लहेजा, खास म्हणी, शब्दप्रयोग हे चरित्राला एक आगळंढगळं वास्तव रूप देतात. 'गुतापा', 'गुळमाट', 'नाडा सौंदर', 'तोंडात मुळा कोंबावा तशी गप्प झाली' यांसारखे शब्दप्रयोग गावगाड्याच्या मातीचा वास देतात. ते फक्त शैलीसाठी वापरलेले नाहीत, तर त्या विशिष्ट जीवनपद्धतीचं प्रतिनिधित्व करतात. अशा भाषिक वैशिष्ट्यांमुळे कादंबरी अधिक जिवंत आणि आत्मीय वाटते. शिवाजी सूर्यवंशी यांनी कुठेही वास्तवावर चादर ओढण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी या समाजातील अंधश्रद्धा, नवस, दैववाद, पशुहत्येप्रमाणे अमानवी प्रथा, महिला शोषण यांचं प्रखर चित्रण केलं आहे. यातून समाजाने काय शिकावं, काय सोडावं, आणि कुठे बदल घडवावा हे ठामपणे अधोरेखित होतं. लेखकाने या गोष्टी केवळ नोंदवून थांबले नाहीत, तर त्यामागचं वास्तव वाचकांच्या मनात रूजविण्याची जबाबदारीही उचललेली आहे. ‘मानवतेचा पाईक’ हे चरित्र म्हणजे एक ज्योत आहे. ही ज्योत दारिद्र्यातही आशेचं उजेड देणाऱ्या व्यक्तीमत्त्वाची आहे. ही ज्योत अज्ञानाच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी मार्ग दाखवते. ही ज्योत जातीपातींच्या दुर्गंधीच्या विरुद्ध शुद्ध हवेसारखी आहे. निवृत्ती फाळके हे नाव केवळ एका व्यक्तीचं प्रतिनिधित्व करत नाही, तर ते एका प्रेरणादायी प्रवाहाचं प्रतिनिधित्व करतं. त्यांच्या जीवनातील संघर्ष, सेवाभाव, समाजप्रेम आणि प्रामाणिकपणा हे गुण आपल्याला अधिक संवेदनशील, अधिक जागृत आणि अधिक मानवी बनवतात. ‘मानवतेचा पाईक’ ही केवळ चरित्रात्मक कादंबरी नसून, ती एक सामाजिक दस्तऐवज आहे. अवश्य वाचावी अशी. - दिलीप भोसले