"तिच्यातली 'ती'" :– स्त्रीमनाच्या अंतरंगात डोकावणारा अनुभवगर्भ स्त्रीची कहाणी लिहिणं म्हणजे केवळ एक अनुभव नव्हे, तर एक प्रवास असतो.. समाजाच्या आरश्यात तिच्या प्रतिबिंबाचा शोध घेण्याचा, तिच्या गहिऱ्या भावनांचा, साशंकतेचा, आणि अंतर्मुखतेचा अन्वय लावण्याचा प्रवास. डॉ. राजश्री पाटील यांचा कथासंग्रह "तिच्यातली 'ती'" हा नेमका हाच अनुभव वाचकांसमोर मांडतो. सहज, तरी खोलवर भिडणारा! 'सुमनांजली' या चारोळी संग्रहानंतर लेखिकेचे हे दुसरे साहित्यिक पाऊल आहे, पण हे पाऊल केवळ पुढे टाकलेलं नसून ते अंतर्मनाच्या गाभ्यातून उमटलेलं आहे. लहानपणात लिहिलेल्या कविता, छोट्या विनोदी गोष्टी, हस्तलिखित वह्या... त्या काळात आलेला चिमुकला टवटवीत अनुभव आता एका परीपक्व, जीवन अनुभवलेल्या लेखिकेच्या लेखणीतून नव्याने उमटतो. डॉ. पाटील या केवळ एक डॉक्टर नाहीत, त्या आहेत एक समजूतदार स्त्री, संवेदनशील आई, काळजीवाहू पत्नी आणि सर्जनशील लेखिका. त्यांचा सगळा प्रवासच हळूहळू लेखनाच्या दिशेने वळत गेला आहे. हा संग्रह म्हणजे त्यांच्या व्यस्त वैद्यकीय आणि कौटुंबिक आयुष्यातून साकारलेला अंतर्यात्रेचा एक संवेदनशील दस्तावेज आहे. या कथासंग्रहाचं मर्म नावातच सामावलेलं आहे. "तिच्यातली 'ती'". स्त्री म्हणजे एकच व्यक्ति नव्हे, ती अनेक रूपांची, अनेक छटांची व्यक्ती आहे. ही 'ती' कधी आपल्या खोल आतमध्ये लपलेली असते, तर कधी परिस्थितीमुळे झाकोळलेली. कधी ती बंडखोर असते, तर कधी गहिऱ्या वेदनांनी झिजलेली. डॉ. राजश्री पाटील यांच्या लेखणीतून ही ‘ती’ व्यक्त होते.. धाडसीपणे, पण सुसंवादीपणे; ती तक्रार करत नाही, पण आपली बाजू ठामपणे मांडते. लेखिका म्हणतात, “प्रत्येक स्त्री एक जिती-जागती कहाणी वाटायची...” आणि या भावना केवळ वाक्यात न अडकता, त्या कथा म्हणून या संग्रहात उमटल्या आहेत. त्या कहाण्या वैद्यकीय पेशाच्या अनुभवातून, रोजच्या भेटीगाठींमधून, माणसांच्या जिव्हाळ्यातून, एकटेपणाच्या विराणीतून, आणि जीवनाच्या दु:खसुखाच्या प्रत्यक्ष पातळीवरून साकार झालेल्या आहेत. या संग्रहातील १३ कथा म्हणजे स्त्रीजीवनाच्या विविध टप्प्यांची व भावनांची कलात्मक आणि संवेदनशील मांडणी. या कथा बाळबोध किंवा क्लिष्ट वाटत नाहीत. त्या वास्तववादी आहेत आणि म्हणूनच प्रखरपणे भिडतात. "वाट माझी वेगळी" ही कथा, साठी ओलांडलेल्या स्त्रीच्या एकटेपणावर भाष्य करते. तिचा 'विधवा विवाह' करण्याचा निर्णय हा केवळ व्यक्तिगत नाही, तर सामाजिक चौकटींना सडेतोड उत्तर देणारा आहे. "गंध" ही कथा ‘सहनशीलतेच्या’ मर्यादा पार झाल्यावर स्त्रीचा ठामपणा, आत्मभान आणि आत्मगौरव याचं प्रत्ययकारी दर्शन घडवते. "उणीव" स्त्रीला पुरुषमित्र असू शकतो की नाही, यासारख्या गुंतागुंतीच्या पण महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नावर नितळ आणि निखळ भाष्य करते. या कथा वाचताना जाणवतं की, लेखिका कुठेही भावनांचं अतीसिंथेटिक प्रदर्शन करत नाहीत. त्या सहज आहेत, म्हणूनच अधिक खऱ्या वाटतात. त्या वास्तवाचे पडसाद देतात, पण त्याचबरोबर नवे मार्ग दाखवतात. कधी स्त्रीच्या मनातील गहिऱ्या गरजा उलगडतात, तर कधी सामाजिक रूढींना भिडणारा आवाजही बनतात. डॉ. पाटील यांची लेखनशैली ही डॉक्टर म्हणून येणाऱ्या निरीक्षणशक्तीची आणि लेखिका म्हणून असणाऱ्या संवेदनशीलतेची उत्तम सांगड आहे. त्यांच्या शब्दांना भावनिक ओल आहे, पण ती केवळ सहानुभूतीची नाही. ती आहे समजूतदारतेची, जागृतीची आणि स्त्रीस्वत्वाच्या पुनर्परिभाषेची. त्यांची पात्रे ही केवळ कथा सांगण्यासाठी अस्तित्वात नाहीत, तर ती आपल्याच आजूबाजूला फिरणारी, आपल्याला स्पर्श करणारी माणसं आहेत. या कथा एखाद्या मोठ्या घोषणांऐवजी हळूवार पण ठाम स्वरात आपलं म्हणणं सांगतात आणि त्यामुळेच त्या जास्त परिणामकारक ठरतात. संग्रहाच्या मागे लेखिकेच्या जिव्हाळ्याच्या माणसांचा मोठा हात आहे. प्रसिद्ध लेखिका नीलम माणगावे यांची प्रेरणा, सौ. उज्वला पाटील यांचे स्नेहपूर्ण मार्गदर्शन, मैत्रिणींच्या श्रवण प्रतिक्रिया, आणि पती, मुले, कुटुंबियांचा आधार या साऱ्यामुळे ‘तिच्यातली ती’ हा कथासंग्रह केवळ एक वैयक्तिक अभिव्यक्ती नसून, ती एक सामूहिक प्रेरणेचा परिणाम आहे. विशेष म्हणजे, समाजात रूढ असलेल्या कथा-मर्यादांना मागे टाकून "ती" बाहेर यावी. या साक्षात्काराच्या क्षणांची हाक लेखिकेने ऐकली आणि कथांमधून तिचा मुक्त प्रवास सुरु केला आहे. एकूणच "तिच्यातली 'ती'" या कथासंग्रहात स्त्री ही एकसंध संकल्पना नसून एक अनुभवसंपन्न, गतिमान आणि स्वतंत्र चेतना म्हणून उभी राहते. यातली प्रत्येक ‘ती’ आपल्याला काहीतरी देऊन जाते. कधी स्वतःचा आरसा दाखवते, कधी आपल्याला आपल्यातल्या ‘ती’ची जाणीव करून देते. या कथांनी एक वेगळी वाट चोखाळली आहे. ही वाट अनेक वाचकांच्या मनात ठसा उमटवेल यात शंका नाही. स्त्रीचे वास्तव, तिचे स्वप्न, तिचे दुःख, आणि तिची उमेद... हे सगळं या पुस्तकात जिवंत आहे. डॉ. राजश्री पाटील यांना पुढील लेखनप्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! आणि 'तिच्यातली ती' आता अनेक वाचकांमधून उमटत राहो हिच सदिच्छा... -दिलीप भोसले