Jayanti
Preview Audio:

Jayanti


₹0.00 ₹0.00
Price in USD: $0.00

'जयंती' - एका समाजाचे आत्मपरीक्षण 'जयंती' हे गौतमीपुत्र कांबळे यांचे पुस्तक केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवाच्या स्वरूपावर भाष्य करणारे नाही, तर सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक बदलांच्या प्रवाहाचा भेदक आढावा घेणारे एक महत्त्वाचे दस्तावेज आहे. हे पुस्तक वाचताना बाबासाहेबांच्या विचारधारेला कशी दिशा मिळाली आणि ती दिशा कशी बदलत गेली, याचे प्रामाणिक चित्रण लेखकाने केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मक्रांतीची संकल्पना उभी केली, ती केवळ बौद्ध धर्माच्या पुनर्जागरणासाठी नव्हे, तर भारतात सामाजिक समतेची क्रांती घडवून आणण्यासाठी होती. धम्मक्रांती ही कार्ल मार्क्सच्या भौतिकतावादी विचारांपेक्षा अधिक निर्दोष मानली गेली. त्यात केवळ वर्गीय समता नव्हती, तर जात, धर्म, वंश, लिंग अशा सर्वच भेदांवर आधारित समाजव्यवस्था बदलण्याचा प्रखर विचार होता. तथापि, बाबासाहेबांच्या निधनानंतर त्यांच्या धम्मक्रांतीचा आशय कसा क्षीण होत गेला आणि त्यातून समाजासमोर कोणती आव्हाने उभी राहिली, हे पुस्तकात स्पष्ट केले आहे. कांबळे यांनी या धम्मक्रांतीच्या प्रवासात डॉ. बाबासाहेब, डॉ. भदन्त आनंद कौसल्यायन आणि महापंडित राहुल सांकृत्यायन यांच्या विचारांचा संदर्भ घेतला आहे. तसेच राजा ढाले, हनुमंत उपरे काका, डॉ. भारत पाटणकर, डॉ. लक्ष्मण माने यांसारख्या व्यक्तींच्या कृतीशील चळवळींचे दाखले देत, धम्मक्रांतीला पूरक विचार आणि त्यावरील परिणाम यांचा वेध घेतला आहे. कांबळे यांनी 'जयंती'मधून दाखवले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवाचे स्वरूप प्रत्येक दशकात कसे बदलत गेले. सुरुवातीला जयंती हे सामाजिक जागृतीचे साधन होते. बाबासाहेबांच्या जयंतीला त्यांच्या विचारांवर चर्चा, त्यांच्या कृतींवर अभ्यास, आणि त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याचा उत्साह दिसून येत होता. मात्र, पुढे या जयंतींनी एक प्रकारचे विधी आणि परंपराग्रस्त स्वरूप घेतले. आजचे जयंती महोत्सव हे मोठ्या प्रमाणात औपचारिकता आणि राजकीय महत्त्वाकांक्षेच्या सोहळ्यांमध्ये रूपांतरित झाले आहेत. बाबासाहेबांच्या विचारांवर चर्चा करण्याऐवजी केवळ त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्याची प्रथा वाढली आहे. बाबासाहेबांच्या मूलतत्त्वांशी बांधिलकी ठेवण्याऐवजी त्यांना केवळ एका "महापुरुष"च्या चौकटीत बसवले गेले. या प्रतिक्रांतीतून बाबासाहेबांनी मांडलेले वैचारिक स्वातंत्र्य आणि समताधिष्ठित समाजघटनांचे तत्त्वज्ञान धूसर होत गेले. 'जयंती' हे पुस्तक त्या प्रक्रियांचे एक प्रत्ययकारी चित्रण करते, ज्या प्रक्रियांमुळे धम्मक्रांतीचा मूळ आशय समाजापर्यंत पोहोचण्यात अयशस्वी ठरला. बाबासाहेबांनी धम्माला जो स्वच्छ, वैचारिक आणि वैज्ञानिक आधार दिला, तो कालांतराने पूजाविधींनी व्यापला. बाबासाहेबांना मानणाऱ्या समाजाने त्यांच्या विचारांशी बांधिल राहण्याऐवजी काही प्रसंगी त्यांची संकल्पना केवळ धार्मिक चौकटीत बसवली. लेखकाने अतिशय मार्मिकपणे विश्लेषण केले आहे की, बाबासाहेबांचे विचार पोथीनिष्ठ विचारसरणीत कसे रूपांतरित झाले. हे केवळ डाव्या विचारसरणीच्या मर्यादांमुळे घडले नाही, तर धम्मक्रांतीला उजव्या विचारांनीही प्रभावीत केले. हे दोन्ही टोक समाजाला समताभिमुख करण्याऐवजी जातीय आणि सांप्रदायिक चौकटीत बांधत गेले. 'जयंती'मधील पहिल्या चार भागांत बाबासाहेबांच्या जयंती महोत्सवाचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वास्तव मांडले आहे, तर पाचवा भाग एका स्वप्नाला आकार देतो. लेखकाने धम्मनगर नावाच्या काल्पनिक गावाची निर्मिती केली आहे, जिथे डॉ. बाबासाहेबांच्या विचारांनुसार समाज रचला गेला आहे. या गावात समता, बंधुता आणि सामाजिक न्याय ही तत्त्वे केवळ जयंतीच्या दिवशीच नव्हे, तर रोजच्या जीवनात रुजवली गेली आहेत. हे गाव लेखकाचे स्वप्न असून, खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीचे मूळ उद्दिष्ट साध्य करण्याचा तो एक आदर्श आहे. लेखकाने कबूल केले आहे की, 'जयंती' या पुस्तकाला उपद्रवमूल्य आहे. पुस्तकात बाबासाहेबांच्या विचारांशी बांधिल राहणाऱ्या समाजाचे गुण आणि दोष दोन्ही मांडण्यात आले आहेत. पुस्तक वाचताना वाचकांमध्ये कडवट प्रतिक्रिया येऊ शकतात. मात्र, लेखकाची भूमिका स्पष्ट आहे – बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित धम्मक्रांतीला समजून घेतल्याशिवाय समाजाला खऱ्या अर्थाने पुढे नेता येणार नाही. 'जयंती' हे केवळ पुस्तक नाही, तर साहित्याचा एक नवा प्रकार आहे. याला "कथालेख" हेच नाव सर्वार्थाने योग्य आहे. यात कथेसारखी रंजकता आणि लेखासारखी वैचारिकता आहे. लेखकाने सत्य घटनांवर आधारित गोष्ट सांगताना साहित्य आणि वास्तवाच्या चौकटी मोडल्या आहेत. यातील अनेक गोष्टी वाचकांना गोंधळात टाकणाऱ्या आहेत – कधी कधी वास्तव आणि साहित्य यातील सीमारेषा धूसर होते. मात्र, लेखकाचा हा प्रयोग वैचारिक आणि साहित्यिकदृष्ट्या निश्चितच यशस्वी ठरतो. गौतमीपुत्र कांबळे यांचे 'जयंती' हे पुस्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने समाजाला एक नवा आरसा दाखवते. हे पुस्तक वाचताना केवळ बाबासाहेबांच्या विचारांचा अभ्यास होत नाही, तर समाजातील अंतर्विरोध, धम्मक्रांतीची दिशाभूल, आणि वैचारिकता यांचा त्रयस्थ आणि भेदक अभ्यास करता येतो. 'जयंती' हे केवळ बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित पुस्तक नाही, तर एका समाजाचे आत्मपरीक्षण आहे. बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीसाठी हे पुस्तक एक प्रेरणादायी साधन ठरू शकते, यात शंका नाही. जयभीम! प्रवाहाचा भेदक आढावा घेणारे 'जयंती' हे वाचनीय पुस्तक dibho.com या आॅनलाईन ई-बुक प्लॅटफॉर्म वरती उपलब्ध आहे. अवश्य वाचावे. - दिलीप भोसले

RELATED AUDIOBOOKS