'बोधिसत्वाच्या जातक अट्ठकथा' :- सद्गुणांचा अमृतस्रोत या ग्रंथाला केवळ कथा म्हणणे अपूर्ण ठरेल. कारण ‘बोधिसत्वाच्या जातक अट्ठकथा’ या ग्रंथामध्ये कथा या फक्त कथा नाहीत. तर त्या आहेत मानवतेच्या सद्गुणांचा जीवंत वारसा, नैतिकतेचे दीपस्तंभ आणि जगण्याला अर्थ देणारी जिवंत दीपमाळ! जातककथा या जगातील सर्वात प्राचीन आणि मौलिक बौद्ध साहित्याचा भाग आहेत. या कथा केवळ गौतम बुद्धाच्या जन्मकथाच नव्हेत, तर त्या आहेत, एका बोधिसत्वाच्या सद्गुणांची, त्याच्या आत्मत्यागाची, करुणेच्या अमर्याद विस्ताराची आणि दहा पारमितांच्या अखंड यात्रेची ओळख करून देणाऱ्या अमूल्य गोष्टी. पाली वाङ्मयातील जातकट्ठकथा हा जगात अत्यंत मान्यताप्राप्त ग्रंथ आहे. ५४७ कथांचा हा अथांग महासागर सिंहल, ब्रह्मदेश, सयाम या बौद्ध संस्कृतींमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे, पण आपल्या भारतात.. जिथे बुद्धांचा जन्म झाला, त्या भूमीत, या कथांचा प्रसार दुर्दैवाने फारसा नाही. ही शोकांतिका आदरणीय डी. एल. कांबळे यांनी आपल्या अथक परिश्रमाने बदलण्याचा प्रयत्न केला आहे. जर्मन पंडित व्ही. फॉसबोल यांनी १८७७ ते १८९६ या काळात या ग्रंथाचे संस्कारण रोमन लिपीत केले. हे परिश्रम म्हणजे एका महापुरुषाच्या बुद्धत्वसमान धैर्याची, चिकाटीची आणि अढळ श्रद्धेची साक्ष आहे. त्याच प्रेरणेने आज डी. एल. कांबळे यांनी ‘बोधिसत्वाच्या जातक अट्ठकथा’ या ग्रंथमालेतून या बोधकथा मराठी समाजाला सुलभ केल्या आहेत. जातक कथा म्हणजे केवळ गोष्टी नाहीत.. त्या आहेत बोधिसत्वाच्या दहा पारमिता. दान, शील, नैष्कर्म्य, प्रज्ञा, वीर्य, क्षांति, सत्य, अधिष्ठान, मैत्री आणि उपेक्षा. या दहा पारमिता म्हणजे प्रत्येक माणसाने जीवनात जोपासायच्या मूल्यांची सुंदर माळ! दान हे श्रीमंतीचे नव्हे, तर मनाच्या मोठेपणाचे प्रतीक आहे. शील हे बाह्य वर्तनाचे नव्हे, तर अंतरंगाच्या निर्मळतेचे. नैष्कर्म्य हे विरक्तीचे नव्हे, तर शुद्ध विचारांच्या एकांताचे. प्रज्ञा म्हणजे विद्वत्तेचे नव्हे, तर लोककल्याणाची समज. वीर्य हे केवळ शारीरिक ताकद नव्हे, तर सद्कर्माचे सामर्थ्य. क्षांति म्हणजे दुर्बलतेची नव्हे, तर सज्जनतेची महानता. सत्य म्हणजे सोयीचे नव्हे, तर निष्ठेचे. अधिष्ठान म्हणजे हट्ट नव्हे, तर निश्चयाचे सामर्थ्य. मैत्री म्हणजे स्नेह नव्हे, तर विश्वबंधुत्वाची अनुभूती. आणि उपेक्षा म्हणजे तटस्थता नव्हे, तर असत्य, अज्ञान, अपवित्रतेचा तिरस्कार! या दहा पारमिता म्हणजेच बोधिसत्वत्वाचे पहिले पाऊल आहेत. त्या प्रत्येकाने जोपासल्या, तर प्रत्येक माणूसच एक चालता-बोलता बोधिसत्व होऊ शकतो. मानवाला सरळ उपदेश रुचत नाही, पण गोष्ट मनाला भिडते. जातक कथा या मानवाच्या अंतर्मनातील सद्गुणांना पाणी घालतात. यातून समाजहिताची बीजं उगवतात. डी. एल. कांबळे यांनी मूळ पाली गाथा, त्यांचा सुबोध काव्यानुवाद, नेमकी शब्दसंपत्ती, अर्थ, संदर्भ टिपा आणि चित्रांची जोड देऊन या कथांना नवी जीवनकृती दिली आहे. एका साध्या गोष्टीतून माणूस काय शहाणपण शिकतो, हा या कथांचा खरा चेहरा आहे. व्यभिचार, कपट, स्वार्थ यांचा नाश आणि दया, करुणा, प्रज्ञा यांचा विजय हेच या कथांचे अखंड सार आहे. डी. एल. कांबळे हे केवळ लेखक नाहीत, ते धम्मयोद्धा आहेत. निवृत्तीनंतर अनेकांनी विश्रांती घेतली असती, पण कांबळे साहेबांनी बुद्धधम्माचा दीप अजून उजळवला. त्यांच्या ‘धम्मपद गाथा आणि कथा’ या सात खंडांनी मराठी वाचकांना पाली वाङ्मयाचा अमूल्य ठेवा दिला. त्यांच्या शैलीत प्रगल्भता आहे, प्रसन्नता आहे, आणि एक सहजता आहे जी कुणालाही वाचनात गुंतवून ठेवते. जातक कथा सांगतात की बोधिसत्व एकदा जन्मून महापरिनिर्वाण पावला नाही. तर तो प्रत्येक सद्गुणात पुन्हा पुन्हा जन्म घेतो. हा ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाला हा प्रश्न पडतो की, आपण आपल्या जीवनात कोणती पारमिता जोपासणार? आजच्या स्पर्धेच्या, असहिष्णुतेच्या, अस्वस्थतेच्या काळात या कथांचा गोडवा आपल्याला संयम, करुणा आणि बंधुभाव शिकवतो. जातक कथा म्हणजे एक जिवंत दीपस्तंभ आहे जो अंधारात हरवलेल्या माणसाला पुन्हा प्रकाशाकडे घेऊन जातो. डी. एल. कांबळे यांच्या हातून ‘बोधिसत्वाच्या जातक अट्ठकथा’ हे केवळ साहित्य नव्हे, तर धम्मपदाचा प्रसाद घरोघरी पोहोचला आहे. या कथांच्या वाचनातून आजच्या मुलांनीही दहा पारमितांचा अभ्यास करून स्वतःला बोधिसत्वत्वाच्या वाटेवर नेणे. हेच या महान ग्रंथाचे खरे सार्थक ठरेल. - दिलीप भोसले