'फक्कड' :– नोंद नसलेल्या इतिहासाची जिवंत साक्ष
साहित्य हे केवळ मनाचे रंजन करणारे साधन नाही, तर ते समाजाच्या काळजावर उमटलेला सत्याचा ठसा असते. अशा ठशांपैकी एक जळजळीत आणि अस्वस्थ करणारा ठसा म्हणजेच सचिन अवघडे यांची कादंबरी ‘फक्कड’. ही केवळ एका पात्राची कथा नाही; ती आहे हजारो-लाखो उपेक्षितांच्या कष्टी, खडतर, आणि उपेक्षित आयुष्याची सामूहिक वहिवाट. ‘फक्कड’ या एका शब्दातच असंख्य उपेक्षितांचा, वंचितांचा, आणि श्रमिकांच्या आयुष्याचा आक्रोश दडलेला आहे. हा आक्रोश केवळ उपजीविकेचा नाही; तर तो आहे माणूस म्हणून ओळख मिळवण्याच्या संघर्षाचा.
कादंबरीचा नायक ‘फक्कडराव’ हा माणदेशाच्या कडाक्याच्या दुष्काळात जन्मलेला भूमिपुत्र. त्याच्या जीवनाची सुरुवात होते ती स्थलांतराच्या विवंचनेतून, ऊसतोडणीतील कष्टातून आणि उपेक्षेच्या जखमांमधून. काही कादंबऱ्या डोळे उघडतात; काही काळीज उघडतात. ‘फक्कड’ ही त्या दुर्मिळ कादंबऱ्यांपैकी आहे जी काळीज फाडून वाचकाला अंतर्मुख करते.
सचिन अवघडे यांचे लेखन म्हणजे अनुभवांची रसरशीत पेरणी. त्यांनी भोगलेल्या वास्तवाचं शब्दशः पुनरुच्चारण. उसाच्या फडात झोपवलेली लेकरं आणि त्यांच्यावर चाल करून आलेला अजगर या एकाच प्रसंगातून लेखकाने ग्रामीण मजुरांच्या असुरक्षित जीवनशैलीचं जे मर्म सांगितलं आहे, त्याचा कुठलाही आकड्यांमधला अहवाल किंवा शासनाचा सर्व्हे येवढं प्रभावीपणे सांगू शकत नाही.
‘फक्कड’मधील प्रत्येक पान हे दुष्काळाच्या भेगांसारखं आहे. कोरडं, उबगवाणं, पण खोल अंतःकरणात जिरणारं.
ही केवळ फक्कडरावाची कथा नाही, तर संपूर्ण मातंग समाजाच्या अस्तित्वाच्या लढ्याची काव्यात्म घोषणा आहे. गावकुसाबाहेरची त्यांची वस्ती, पारंपरिक व्यवसायांचा ऱ्हास, जातीपातीच्या छुप्या गुन्ह्यांचा वारसा आणि नव्या युगातील अस्थिर अस्मिता यांचे विलक्षण चित्रण लेखकाने केलं आहे. या संघर्षातून ‘रघु’सारखा एक तरुण उमटतो, जो केकताड कापून दोरखंड तयार करण्यापेक्षा फक्कडतात्यासोबत आधुनिक काम शिकून जगू इच्छितो. ही केवळ शिक्षणाची नाही, तर स्वाभिमानाची घोषणा आहे. ही त्याची घोषणा केवळ एका पात्राची नाही, तर ती एका नव्या पिढीची अस्मितेची घोषणा आहे.
सचिन अवघडे यांची भाषा ही शास्त्रबद्ध नाही, पण शास्त्रीय वाटावी इतकी ती वास्तवाशी एकरूप आहे. गोडव्याचा खोटा मुलामा नाही, अलंकाराचा देखावा नाही पण जळजळीत आणि थेट काळजात भिडणारी ताकद आहे. त्यांची भाषा ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या परंपरेतील आहे. आणि हेच त्यांचं मोठेपण आहे त्यांनी अण्णाभाऊंप्रमाणे शब्दांनी मशाल पेटवली आहे. 'तारांबळ हेच जीवन आहे' हे विधान त्यांच्या संपूर्ण लेखनात अधोरेखित होतं. लेखक म्हणतात, "अण्णाभाऊंनी गरिबांच्या आशेची मशाल जगभर नेली, त्यांच्या शब्दांनी मलाही साहित्यिक बनवलं."
ही कबुली त्यांच्या लेखनाच्या जडणघडणीतून प्रकट होते. ही कबुली लेखकाच्या नम्रतेची आणि साहित्यविषयीच्या श्रद्धेची साक्ष आहे.
कादंबरीत ऊसतोडणीतील क्रूर अनुभव, गुन्हेगारीच्या उंबरठ्यावर उभं ठाकलेलं आयुष्य, चराटाचा धंदा, गरिबी आणि माणुसकीचा उरलेला श्वास या सगळ्याचा आशयघन पट शब्दबद्ध केला आहे. हे साहित्य आहे की दृश्यं? वाचकाला क्षणभर वाटून जातं की आपण एखादा अस्सल, हृदय हेलावणारा डॉक्युमेंट्री सिनेमा पाहतोय. पण इथे चित्रीकरण नाही, आणि कलाकार नाहीत. इथे फक्त ‘फक्कड’ आहे. खराखुरा, जिवंत अनुभव!
‘फक्कड’ ही कादंबरी वाचताना ज्यांनी वडापाव विकला आहे, झोपडीत राहून उद्या जगायची चिंता केली आहे, ऊसतोडणी केली आहे त्यांना ही कादंबरी स्वतःचीच वाटते. एकूणच, ज्यांच्या जीवनात आगीचा स्पर्श आहे, त्यांनाच ही कादंबरी भिडते. आणि ज्यांनी हे अनुभवलं नाही, त्यांच्यासाठी ही कादंबरी एक डोळस माणूस होण्याचा धडा ठरते.
‘फक्कड’ ही कादंबरी म्हणजे सामाजिक भान, आत्मकथनाची ताकद, आणि बदल घडवणाऱ्या शब्दांची चळवळ आहे. ही केवळ एका लेखकाची दुसरी साहित्यकृती नाही, तर ही आहे त्या लेखकाच्या जगण्याची स्वाक्षरी. 'फक्कड' या कादंबरीतून त्यांनी केवळ सामाजिक वास्तव मांडले नाही, तर ते बदलण्याची चुणूक देखील दाखवली आहे.
सचिन अवघडे यांनी एका जिवंत माणसाच्या जीवनाची पोतडी उलगडली आहे. ती ही अशा भाषेत की जी प्रत्येक वाचकाचे अंतरंग ढवळून काढेल, ‘फक्कड’ ही केवळ एका माणसाची कथा नाही, ती आहे एकवटलेल्या, जिद्दी आणि झगडणाऱ्या समाजाचं प्रतिबिंब. समाजाच्या तळागाळातलं आयुष्य, त्यांच्या वेदना, त्यांचे अपमान, त्यांची स्वाभिमानाची झुंज, त्यांचं माणूसपण. या सगळ्यांना साहित्याच्या पातळ्यांवर साकार करणे ही सोपी गोष्ट नव्हे. पण सचिन अवघडे यांनी ती अत्यंत ताकदीने केली आहे. त्यांच्या साहित्यिक प्रवासाला आभाळभर शुभेच्छा..!
हि कादंबरी लवकरच dibho.com या आॅनलाईन ईबुक प्लॅटफॉर्म वरती उपलब्ध होत आहे. अवश्य वाचा.