राजमाता - “जनतेची आई, न्यायाची मूर्ती, स्वराज्याची दीपस्तंभ…” स्वराज्याच्या इतिहासात, तलवारींच्या झंकारात आणि रणगर्जनांच्या गर्जनेत एक आवाज नेहमीच अलगद ऐकू येतो.. तो आहे अहिल्याबाईंच्या करुणा, निष्ठा आणि न्यायाचा! आपला संसार, आपली प्रजा, आपली प्राचीन संस्कृती यांना त्यांनी जिवापाड जपलं. शूर राजा असावाच लागतो असं नाही, तर मातृत्वातूनही राज्य घडवता येतं याचा आदर्श त्यांनी मांडला. या पुस्तकात आपण अहिल्याबाईंच्या जीवनप्रवासाला भिडतो. एका साध्याश्या मुलीपासून ते सम्राज्ञी होण्यापर्यंतचा प्रवास, पतीच्या मृत्यूनंतरही खचून न जाता पित्याप्रमाणे राज्यकारभार सांभाळणारी ती वीर माता. नर्मदातीरावरील घाट, मंदिरे, धर्मशाळा त्यांच्या दूरदृष्टीचा, श्रद्धेचा आणि लोककल्याणाच्या ध्यासाचा ठसा आजही पिढ्यान्पिढ्या दिसतो. ही केवळ एक चरित्रकथा नाही, तर ही आहे कणखर मातृत्वाची, सक्षमता आणि सेवाभावाची जिवंत साक्षी. प्रत्येक पान वाचताना आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं एक चित्र. 'राजमाता' अहिल्याबाई होळकर.. नर्मदेच्या पवित्र प्रवाहासारखी निर्मळ, स्थिर, पण अविरत वाहणारी! आजच्या काळातही त्यांच्या जीवनातून आपल्याला बळ, दिशा आणि प्रेरणा मिळते. कारण निष्ठा आणि माणुसकी यांना काळाचं बंधन नसतं! -दिलीप भोसले