काही पुस्तकं वाचताना आपण वाचत नाहीच… आपण त्यात हरवून जातो… त्यातल्या शब्दांच्या सावल्या आपल्याला मिठीत घेतात, अन त्यातून एक गूढ, चैतन्यदायी प्रकाश झिरपत राहतो. सतीश सोळांकूरकर यांचा ‘चंद्रसायीचा साजण’ हा ललित लेखसंग्रह म्हणजे अशीच एक अद्भुत, अतींद्रिय वाटचाल आहे. ‘सावी’पासून ‘सावलीचे घरटे’, ‘केशर दिव्याची माळ’ आणि आता ‘चंद्रसायीचा साजण’… या शीर्षकांतच शब्दांचा नाजुक पाऊस आपल्याला पावसाळी तळ्यात घेऊन जातो. धुनी पेटवावी, तंद्री लागावी आणि मग शब्द जागे व्हावेत.. ही या संग्रहाची पहिली झलक. सतीशजी स्वतःच म्हणतात, ‘वाट पाहणारी ती… आणि वाट पाहायला लावणारा तो… नकळत आतमध्ये येऊन बसतात… बोलत राहतात…’ या संवादात वाचक कधी सामील होतो हे त्यालाही कळत नाही. शब्दांनी सजलेलं हे घर ‘कथा’ नसूनही ‘कथेचा देह’ घेऊन येतं. त्या देहात काव्याचा प्राण ओतलेला असतो. त्यामुळे हे लेखन फक्त गोष्ट नाही, तर तो एक सुंदर अनुभवगंध आहे. आपल्या आयुष्यात येणाऱ्या पात्रांना आपण काहीतरी देणं लागतो.. हा आदरणीय शंकर वैद्य सरांचा विचार इथे शब्दशः जाणवतो. या संग्रहातील प्रत्येक लेख हा अशाच एका ‘अधुऱ्या’ हिशेबाचा भाग आहे. तो पूर्ण होईपर्यंत ती पात्रं, ती सावली, ती स्त्री, तो सैनिक, ती फकीराची कुटी आपल्याला वेढून राहतात. या ललित लेखांमधलं गूढ केवळ भासात्मक नाही. स्मशान, फकीराची कुटी, उंबर-पिंपळ, शांभवी नदी ही सारी दृश्य एका अदृश्य धाग्याने एकमेकांशी बांधलेली आहेत. शिव आणि शक्तीचा अदृश्य संगम, तिच्या आणि त्याच्या नात्यातला मौन स्पर्श, स्वप्नांतूनही पलीकडे जाणारं एका क्षणाचं चैतन्य. हे सगळं वाचताना ध्यानावस्थेत गेल्यासारखं वाटतं. ‘चंद्रसायीचा साजण’ ही केवळ प्रेमकथा नाही, तर हे ‘प्रेमाचे ललित तपस्वी लेखन’ आहे. ती निर्मल ललना, तिचे स्वप्नगारूड, त्याचे धीरगंभीर सैनिकपण, फकीराची शांतता.. या साऱ्याच रूपांतून प्रेमाचा एक नवा अर्थ उमगतो. गूढ नेहमीच भीतीदायक नसतं, कधी ते विस्मयकारीही नसतं.. ते इथे प्रसन्न आहे, स्पर्शाहून अधिक जिव्हाळ्याचं आहे. चंद्राच्या सायीसारखं.. थोडं गार, थोडं शीतल, पण अंतर्मन तापवणारं. या संग्रहाची निर्मितीदेखील अशीच सुंदर आहे. अनघा प्रकाशनातील श्री. मुरलीधर नाले (बाबा) आणि अमोल नाले यांनी या पुस्तकाला ज्या जिव्हाळ्याने आकार दिला आहे, तो जाणवतो. श्री. सतीश भावसार यांच्या मुखपृष्ठाने या शब्दकळेला दृष्यकळा दिली आहे. सतीशजींचे शब्द कधी कधी त्यांच्या मित्रमंडळींवरही अवलंबून असतात.. अशोक बागवे सरांचं आधारवचन, सागर तळाशीकर, संदेश ढगे, साहेबराव ठाणगे, अशोक गुप्ते, प्रकाश पाटील, नारायण लाळे, मनिष पाटील, केशव कासार, दिलीप पाटील, कॅप्टन वैभव दळवी.. या सगळ्या नात्यांनी ‘चंद्रसायीचा साजण’ आणखी जिवंत केला आहे. तसेच लेखकाच्या आईपासून ते आत्मज राजसपर्यंत आणि त्यांच्या जीवनसाथी सौ. सत्यवतीपर्यंत.. सगळ्यांची सावली या लेखनाला कवेत घेते. त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये घराघरांतून येणारी ओल दिसते. या संग्रहाच्या पानांतून आपल्या हृदयात एक गूढमय चंद्रप्रकाश उतरतो. प्रत्येक लेख, प्रत्येक वाक्य, प्रत्येक थांबा काहीतरी सांगून जातो, पण अपूर्णच ठेवतो. ही अपूर्णता हीच या ललितलेखांची पूर्णता आहे. सतीश सोळांकूरकर यांनी हे पुस्तक देऊन आपल्या अनुभवविश्वातल्या सावल्या, उजेड आणि चंद्रप्रकाश आपल्या पर्यंत आणला आहे. त्यांच्या पुढच्या प्रत्येक लेखनात अशीच निर्मलता, अशीच गूढ सौंदर्यपूर्णता लाभो हीच माझ्यासह सर्व रसिकांच्या मनातील सदिच्छा... -दिलीप भोसले