मराठी कवितेत संध्याकाळ ही केवळ वेळ नसते; तर ती एक अवस्था असते. मनाची, आठवणींची आणि अंतर्मुखतेची. सतीश सोळांकूरकर यांचा ‘तिन्हीसांजेची भुलावण’ हा कवितासंग्रह याच अवस्थेचा, याच मधल्या वेळेचा काव्यमय दस्तऐवज आहे. ‘रुजवात’ या दीर्घकवितेनंतर आणि तिच्या थोड्याशा आधी लिहिलेल्या कवितांचा हा संग्रह असल्यामुळे, तो एका संक्रमणकाळाचा, एका भावनिक व वैचारिक वळणाचा साक्षीदार ठरतो. ‘तिन्हीसांज’ म्हणजे दिवस संपून रात्र पूर्णपणे उतरायच्या आधीचा क्षण. जिथे उजेड शिल्लक असतो, पण अंधाराची चाहूल लागलेली असते. या संग्रहातील कविता याच क्षणात उभ्या राहतात. त्या ना पूर्ण प्रकाशाच्या आहेत, ना संपूर्ण अंधाराच्या; त्या भुलावणाऱ्या, थबकवणाऱ्या आणि आत खेचून घेणाऱ्या आहेत. म्हणूनच या कवितांमध्ये अवेळी अंग भरून येणे, स्मशानशांतता, पहाटवाऱ्याची हाक, निसटून जाणे अशा प्रतिमा भेटतात. या संग्रहाची भावनिक ताकद म्हणजे त्यामागे उभे असलेले नातेसंबंधांचे, आधारांचे आणि ऋणभावनेचे जाळे. कवी स्पष्टपणे सांगतो की, तिन्हीसांजेची भुलावण सोसताना झालेली घालमेल त्याने एकट्याने झेललेली नाही. संदेश, नितीन, केशव यांसारखे मित्र; आई, पत्नी आणि मुले या सगळ्यांनी त्याची संध्याकाळ त्याला हवी तशी मांडू दिली आहे. त्यामुळे या कविता एकटेपणातून जन्मलेल्या असल्या, तरी त्या एकाकी नाहीत. त्या सहवासातून, समजूतदारपणातून आणि मूक पाठिंब्यातून आकार घेतात. अनिल कुसूरकर यांची उपस्थिती या संग्रहात अदृश्य असली तरी ती सतत जाणवत राहते. कविता लिहिण्याआधी आणि नंतरही आजूबाजूला असणारा हा स्नेह या कवितांना एक वेगळी ऊब देतो. त्याचप्रमाणे कविवर्य अशोक बागवे सरांचा मार्गदर्शक हात या कवितांच्या लयीवर सतत ठेवलेला आहे. शब्दांची लय बिघडू नये, भावनांचा तोल ढळू नये म्हणून. ही जपणूक दुधावरच्या घट्ट सायीसारखी न दिसणारी, पण अत्यंत आवश्यक. भाषिकदृष्ट्या ‘तिन्हीसांजेची भुलावण’ हा संग्रह अतिशय सूक्ष्म आणि संयत आहे. इथे मोठ्या घोषणा नाहीत, ठळक विधानं नाहीत; तर इथे आहे हळुवार विराम, निसटते क्षण आणि आत खोलवर जाणारी शांतता. स्मशानशांतता उतरत जाणे, पहाटवाऱ्याची हाक, बांधाबांध आणि आवराआवर या प्रतिमा वाचकाला बाहेरच्या जगातून आतल्या अवकाशात घेऊन जातात. कविता कुठे पोहोचते, हे कळत नाही; पण ती पोहोचते खूप आत. या संग्रहातील कवितांमध्ये ‘आधी हाताला चटके’ हा अनुभव स्वीकारलेला आहे. वेदना, घालमेल, अस्वस्थता या सगळ्या टाळल्या जात नाहीत; उलट त्यांना सामोरे जातच ही कविता आकार घेते. म्हणूनच ही भुलावण गोड नाही, मोहक नाही ती थोडीशी बोचरी आहे, थोडीशी अस्वस्थ करणारी आहे. पण नेमकी याच ठिकाणी या कवितेची प्रामाणिकता आहे. एकूणच ‘तिन्हीसांजेची भुलावण’ हा कवितासंग्रह म्हणजे कवीच्या जीवनातील, मनातील आणि कवितेतील एका मधल्या वेळेचा आलेख आहे. दिवस आणि रात्र यांच्या मधे जसा एक थांबा असतो, तसाच हा संग्रह जीवनाच्या प्रवासातला एक शांत, खोल आणि अंतर्मुख थांबा आहे. तो वाचकाला भुलवतो पण हरवत नाही; उलट स्वतःकडे पाहायला भाग पाडतो. आणि म्हणूनच ही भुलावण दीर्घकाळ मनात रेंगाळत राहते. -दिलीप भोसले