काही पुस्तकं वाचताना आपल्याला असं वाटत नाही की आपण काहीतरी वाचतोय; उलट असं वाटतं की काहीतरी आपल्याला आठवतंय. ‘सावलीचे घरटे’ हा सतीश सोळांकूरकर यांचा ललितलेख संग्रह असाच आहे. तो शब्दांचा संग्रह नाही, तर स्मृतींची, स्वप्नांची आणि आत खोल दडलेल्या हळव्या क्षणांची एक शांत आवर्तनं निर्माण करणारा अनुभव आहे. ‘सावी’ नंतर आलेला हा संग्रह म्हणजे त्या आधीच्या लेखनाचा पुनरुच्चार नाही, तर त्याच भावविश्वाचा अधिक गहिरेपणाने उमललेला विस्तार आहे. ‘सावी’ सोबत असलेली स्वप्नमालिका इथेही आहे, पण ती आता अधिक स्थिर, अधिक साक्षात झाली आहे. स्वप्नांच्या जागी आठवणी उभ्या राहिल्या आहेत. ज्या स्पष्ट दिसतात, हातात पकडता येतात आणि तरीही निसटून जातात. गाव, आजोळ, बालपणाचा काळ. हे सगळं लेखकाच्या आजूबाजूला केवळ फिरत नाही, तर त्याच्यातूनच बोलत राहतं. लेखन करताना लेखक आठवणी सांगत नाही; तर तो त्या पुन्हा अनुभवतो. म्हणूनच हे लेखन आत्मकथन न वाटता, वाचकाच्या स्वतःच्या आयुष्याशी हात मिळवून बसतं. कुठेतरी आपलाही गाव, आपलाही भूतकाळ, आपल्याही माणसांचे चेहरे या ओळींमधून डोकावत राहतात. या संग्रहातल्या दोन व्यक्तिरेखा विशेष लक्ष वेधून घेतात. एक कुठल्यातरी अज्ञात शत्रूचा माग काढत येणारी; आणि दुसरी स्वप्नासारखी डोळ्यांत साठवून ठेवलेली. या दोघींचं अस्तित्व ठाम नाही, स्पष्ट नाही, पण त्यांच्यातील भावबंध अत्यंत नाजूक आहे. तो शब्दांत सांगितला जात नाही, पण जाणवत राहतो. या नात्यातील अलवारता, अस्वस्थता आणि मौन या संग्रहाला एक सूक्ष्म भावनिक ताण देतात. ज्येष्ठ कवी प्रा. अशोक बागवे यांची प्रस्तावना या पुस्तकासाठी एक सुस्पष्ट प्रकाशवाट ठरते. कविता आणि ललितलेखन यांमधील सीमारेषा किती हळवी आणि पारदर्शक असते, याचा ते नेमका वेध घेतात. सोळांकूरकर यांच्या लेखनामागील निर्मितीप्रक्रिया, त्यांचे शब्दांशी असलेले नाते आणि संवेदनशीलतेची शिस्त हे सगळं प्रस्तावनेतून अधिक गहिरं होत जातं. हा संग्रह सागर तळाशीकर यांना अर्पण केलेला असणंही अर्थपूर्ण आहे. गाव, आजोळ आणि मैत्री यांचं नातं इथे केवळ व्यक्तिगत राहत नाही; तर ते स्मरणांच्या सामूहिक प्रवाहात मिसळून जातं. भटाच्या विहिरीचा रहाट, त्या आवाजात मिसळलेली बालपणाची शांतता या सगळ्या गोष्टी वाचताना नकळत डोळ्यांसमोर तरळत राहतात. डिंपल पब्लिकेशनचे अशोक मुळे, निर्मितीची जबाबदारी जपणारे कौतुक मुळे आणि मुखपृष्ठ साकारणारे सतीश भावसार या सगळ्यांच्या सहभागामुळे ‘सावलीचे घरटे’ केवळ वाचण्यासारखं नाही, तर जपून ठेवण्यासारखं पुस्तक बनलं आहे. शब्दांबरोबर रंगही येथे बोलके झाले आहेत. पण या सगळ्या गोष्टींपलीकडे, या संग्रहाचा खरा आत्मा आहे ‘घरटे’. सावलीचं घरटं म्हणजे ऊन टाळण्यासाठीचं ठिकाण नाही; तर ते माणसाच्या आतल्या थकव्याला विसावा देणारी जागा आहे. हृदयाच्या खोप्यात बांधलेलं, श्वासांच्या लयीवर हलणारं, पिसांसारख्या शब्दांनी सजलेलं हे घरटं आहे. त्यातूनच बिंब आणि प्रतिबिंब, वियोग आणि योग, शब्द आणि मौन यांचा संवाद घडत राहतो. ‘सावलीचे घरटे’ हे पुस्तक वाचून संपत नाही. ते वाचकाच्या आत निवांतपणे राहू लागतं कधी आठवणींसारखं, कधी स्वप्नासारखं, तर कधी फक्त एक शांत सावली म्हणून. हेच या संग्रहाचं खरं यश आहे. -दिलीप भोसले