इतिहास म्हणजे केवळ राजे, युद्धे आणि तारखा नाहीत; तर इतिहास म्हणजे काळाच्या ओघात दुर्लक्षित झालेल्या असंख्य जीवनकथा, ज्या योग्य वेळी उजेडात आल्या तर समाजाला दिशा देतात. इतिहासरूपी सागराच्या तळाशी दडलेले हिरे क्वचितच वर येतात. दिनकर काकडे यांचे ‘शूरवीर सरदार गोविंद गोपाळ गायकवाड’ हे चरित्र असेच एक मौल्यवान रत्न आहे, जे इतिहासाच्या गर्भातून बाहेर येऊन समाजासमोर उभे राहते. महार समाजाचे शौर्य, बुद्धिकौशल्य आणि निष्ठा भारतीय इतिहासात जाणीवपूर्वक झाकली गेली. परंतु सत्य कितीही काळ दडपले गेले, तरी ते एक दिवस प्रकाशात येतेच. लेखकाने या चरित्रातून नेमके तेच काम केले आहे. दडपलेल्या इतिहासाला न्याय देण्याचे. गोविंद गोपाळ गायकवाड हे केवळ एक योद्धा नव्हते; तर ते स्वराज्यनिष्ठेचे जिवंत प्रतीक होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पारखणाऱ्या नजरेने या महार योद्ध्यातील शूरत्व ओळखले आणि त्याला स्वराज्यनिर्मितीच्या लढ्यात सामावून घेतले. गोविंद गायकवाड यांनीही आपल्या कर्तृत्वाने, इमानदारीने आणि असीम त्यागाने सरदारपदापर्यंत मजल मारली. ही वाटचाल सहजसोप्या संधींची नव्हती, तर जातीच्या जोखडात अडकवलेल्या समाजातून उठून उभी राहिलेली संघर्षगाथा होती. लेखकाने महार समाजाच्या इतिहासातील विरोधाभास अतिशय प्रभावीपणे मांडला आहे. एकीकडे शौर्य, निष्ठा आणि बलिदान; तर दुसरीकडे जातीय अन्याय, उपेक्षा आणि अमानुष वागणूक. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात स्वराज्य पोरके झाले आणि पेशवाई काळात महार समाजाची झालेली वाताहत वाचकाच्या मनात अस्वस्थता निर्माण करते. “त्यागाचे बक्षीस म्हणून जातीयता” हे वाक्य या चरित्राचे मध्यवर्ती दुःख अधोरेखित करते. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात गोविंद गायकवाड यांच्यावर टाकलेली जबाबदारी रामशेज किल्ल्याचे किल्लेदारपद, बुरहानपूर मोहिमेतील संपत्ती रायगडावर सुरक्षित पोहोचवण्याची जबाबदारी ही त्यांच्या विश्वासार्हतेची साक्ष आहे. अशा जबाबदाऱ्या केवळ शूर व्यक्तीकडे नव्हे, तर अत्यंत निष्ठावान व्यक्तीकडेच सोपवल्या जातात. लेखकाने या प्रसंगांचे वर्णन करताना इतिहास आणि भावना यांचा समतोल राखला आहे. या पुस्तकाचे सर्वात मोठे बलस्थान म्हणजे लेखकाची वैचारिक भूमिका. दिनकर काकडे केवळ चरित्र लिहित नाहीत; तर ते इतिहासातील अन्यायावर बोट ठेवतात. “ज्यांचे योगदान इतिहासाने नाकारले, त्यांना साहित्याच्या माध्यमातून न्याय द्यायचा” ही त्यांची भूमिका प्रामाणिक आहे. संदर्भग्रंथांच्या आधारे, परंतु स्वतःच्या संवेदनशील दृष्टिकोनातून त्यांनी गोविंद गायकवाडांचे व्यक्तिचित्र उभे केले आहे. भाषा ओघवती, परिणामकारक आणि भावनिक आहे. कुठेही अतिरंजित गौरव नाही, तर संयत पण ठाम मांडणी आहे. त्यामुळे हे पुस्तक केवळ महार समाजापुरते मर्यादित राहत नाही; तर ते समग्र समाजासाठी आत्मपरीक्षण करणारे ठरते. आजच्या पिढीसाठी हे चरित्र प्रेरणादायी आहे. स्वराज्य, राष्ट्रप्रेम, निष्ठा आणि त्याग या मूल्यांची उजळणी करणारे हे पुस्तक इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांत नसलेल्या नायकाला मानाचं स्थान देतं. ‘शूरवीर सरदार गोविंद गोपाळ गायकवाड’ हे पुस्तक म्हणजे केवळ एक चरित्र नव्हे, तर दडपलेल्या इतिहासाविरुद्ध उभा राहिलेला वैचारिक आवाज आहे. इतिहासाला न्याय देणाऱ्या, समाजप्रबोधन करणाऱ्या आणि वाचकाला अंतर्मुख करणाऱ्या या ग्रंथाचे मनःपूर्वक स्वागत करावे असेच आहे. -दिलीप भोसले