डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ ही केवळ एका समाजाच्या मुक्ततेची कथा नाही; तर ती संपूर्ण मानवजातीच्या पुनर्रचनेचा वैज्ञानिक आणि नैतिक आराखडा आहे. परंतु दुर्दैवाने, या व्यापक चळवळीचा इतिहास अनेकदा साचेबंद चौकटीत बंदिस्त करून मांडला गेला. ‘माझ्या आठवणी’ हे विष्णू परशराम काकडे यांचे आत्मस्मरण त्या साच्यांना छेद देत, बाबासाहेबांच्या चळवळीचा तळागाळातून आलेला जिवंत अनुभव समाजासमोर ठेवते.१९२० ते १९५६ हा कालखंड म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अखंड ज्ञानसाधनेचा, सामाजिक संघर्षाचा आणि मानवी मूल्यांच्या पुनर्स्थापनेचा कालखंड. या काळातील चळवळ समजून घ्यायची असेल, तर ती केवळ राजकीय किंवा घटनात्मक चौकटीत न पाहता, तथागत गौतम बुद्धांच्या धम्मविचाराशी जोडून पाहणे आवश्यक ठरते. लेखकाने याच धाग्याला धरून बाबासाहेबांच्या चळवळीचे वैज्ञानिक, बुद्धिवादी आणि मानवकेंद्रित स्वरूप प्रभावीपणे अधोरेखित केले आहे.धम्म म्हणजे धर्माच्या संकुचित अर्थाने मांडलेली संकल्पना नव्हे, तर मानवी जीवनाच्या सर्वंकष पुनर्रचनेचा विचार हा बौद्धिक गाभा बाबासाहेबांच्या संपूर्ण आंदोलनाचा पाया होता. ‘माझ्या आठवणी’ या पुस्तकातून हे स्पष्ट होते की बाबासाहेबांचे चिंतन हे श्रद्धेवर नव्हे, तर वास्तवावर आधारित होते. त्यामुळेच त्यांची चळवळ सामाजिक न्यायापुरती मर्यादित न राहता, जागतिक मानवमूल्यांच्या पातळीवर उभी राहते.या पुस्तकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे बाबासाहेबांच्या चळवळीतील अज्ञात नायकांवर टाकलेला प्रकाश. इतिहासात बहुतेकदा नेतृत्व केंद्रस्थानी असते; परंतु चळवळ जिवंत ठेवणारे असंख्य अशिक्षित, अर्धशिक्षित, खेडूत, कष्टकरी कार्यकर्ते दुर्लक्षित राहतात. विष्णू काकडे यांच्या आठवणी त्या दुर्लक्षित वर्गाचे मौन फोडतात. बाबासाहेब स्वतः या कार्यकर्त्यांबद्दल कृतज्ञतेने बोलत असत ही बाब लेखकाने अनुभवाच्या पातळीवरून अत्यंत संवेदनशीलतेने मांडली आहे.मार्टिन ल्युथर किंग यांच्या आंदोलनाशी केलेली तुलना वाचकाला अंतर्मुख करते. किंग यांच्या मागे संपूर्ण समाज उभा होता; परंतु बाबासाहेबांच्या लढ्यात त्यांचाच समाज अनेकदा संपूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभा राहू शकला नाही ही कटू वस्तुस्थिती लेखक प्रामाणिकपणे मांडतो. तरीही बाबासाहेब आपल्या ध्येयापासून ढळले नाहीत, कारण त्यांचा विश्वास सामान्य, स्वाभिमानी, कष्टकरी माणसांवर होता.रिपब्लिकन पक्षाचे सक्रीय कार्यकर्ते म्हणून गुरूजींनी बाबासाहेबांच्या विचारांना केवळ ऐकले नाही, तर जगले. त्यांची लाकूड वखार ही केवळ व्यवसायाची जागा नव्हती; तर ती बाबासाहेबांच्या विचारांचे चालते-बोलते चर्चाकेंद्र होते. सामाजिक प्रश्नांवरील संवाद, कार्यकर्त्यांची उठबस, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न या साऱ्यांचे केंद्र म्हणजे ती वखार. लेखक स्वतः त्या अनुभवाचा साक्षीदार असल्यामुळे लेखनाला आत्मीयतेची आणि विश्वासार्हतेची धार येते.पुत्र दिनकर काकडे यांनी या आठवणी ग्रंथरूपात आणून पुढील पिढीसाठी जपल्या, हे कार्य अत्यंत स्तुत्य आहे. कारण अशा स्मृती केवळ वैयक्तिक नसतात; तर त्या चळवळीच्या सामूहिक इतिहासाचा अमूल्य दस्तऐवज असतात.‘माझ्या आठवणी’ हे पुस्तक म्हणजे आत्मकथनापेक्षा अधिक आहे. ते बाबासाहेबांच्या चळवळीचा तळागाळातून आलेला सामाजिक इतिहास आहे. हे पुस्तक वाचताना वाचक केवळ माहिती घेत नाही, तर एका संघर्षशील काळात मानसिकरीत्या सहभागी होतो. त्यामुळेच हे पुस्तक अभ्यासक, कार्यकर्ते आणि नव्या पिढीसाठी अनिवार्य वाचन ठरते.-दिलीप भोसले