फातिमा शेख :- विस्मरणात गेलेल्या क्रांतिकारक स्त्रीचे पुनर्लेखन इतिहास हा केवळ सत्ताधीशांचा, राज्यकर्त्यांचा किंवा विजयशाली नायकांचा असतो, अशी एक रूढ समजूत दीर्घकाळ प्रचलित राहिली आहे. परंतु समाजाच्या परिवर्तनाच्या प्रक्रियेत जे असंख्य हात मोलाची कामगिरी बजावत असतात, त्यांची नोंद इतिहास अनेकदा घेत नाही. अशाच दुर्लक्षित, पण क्रांतीच्या केंद्रस्थानी उभ्या असलेल्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे फातिमा शेख. दिनकर काकडे लिखित फातिमा शेख हे चरित्र अशा विस्मरणात गेलेल्या क्रांतिकारक स्त्रीच्या जीवनकार्याचा शोध घेणारे, इतिहासाला नवा न्याय देणारे महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. सामान्यतः फातिमा शेख यांची ओळख महात्मा जोतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्यातील सहकारी इतकीच मर्यादित राहिली आहे. मात्र या पुस्तकाच्या माध्यमातून लेखकाने ही मर्यादा भेदून फातिमा शेख व त्यांचे बंधू उस्मान शेख यांच्या सामाजिक, शैक्षणिक व मानवी योगदानाचे व्यापक दर्शन घडविले आहे. मालेगाव (जि. नाशिक) येथील जुलाहा (विणकर) समाजातून आलेल्या फातिमा व उस्मान शेख यांचे बालपण दारिद्र्य, दुष्काळ व अनाथत्वाच्या छायेत गेले. १८५७ च्या उठावानंतर निर्माण झालेल्या अस्थिरतेत पुण्यात स्थलांतर करावे लागलेल्या या भावंडांनी गंजपेठेत गफ्फार बेग यांच्या आश्रयाने नवे आयुष्य उभे केले. याच ठिकाणी उस्मान शेख व जोतिराव फुले यांची मैत्री निर्माण झाली. ही मैत्री पुढे भारतीय सामाजिक इतिहासाची दिशा बदलणारी ठरली. ब्राह्मण समाजाच्या सामाजिक दबावामुळे फुले दांपत्याला घराबाहेर काढण्यात आल्यानंतर उस्मान शेख यांनी त्यांना केवळ आसरा दिला नाही, तर संसार उभा करून दिला, आर्थिक मदत केली आणि स्वतःच्या वाड्यात शाळा, प्रौढ शिक्षण केंद्र व बालहत्या प्रतिबंधक गृहासाठी जागा उपलब्ध करून दिली. हा केवळ सहकार्याचा नव्हे, तर सामाजिक क्रांतीतील सक्रिय सहभागाचा इतिहास आहे. फातिमा शेख या सुरुवातीला अशिक्षित असल्या तरी शिक्षणाची ओढ, समाजसेवेची जिद्द आणि स्त्री-मुक्तीची जाणीव यांमुळे त्या स्वतः शिकल्या, प्रशिक्षित शिक्षिका झाल्या आणि पुढे मुख्याध्यापिकेपर्यंत पोहोचल्या. सावित्रीबाईंच्या अनुपस्थितीत शाळेची जबाबदारी समर्थपणे पेलून त्यांनी प्रशासकीय क्षमता, नेतृत्वगुण आणि शैक्षणिक समज दाखवून दिली. ब्रिटिश अधिकारी व शिक्षणतज्ज्ञांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा करणे, हे त्यांच्या कर्तृत्वाचे ठोस प्रमाण ठरते. फातिमा शेख यांचे कार्य केवळ शिक्षणापुरते मर्यादित नव्हते. मुस्लिम समाजातील स्त्री शिक्षणाला होणाऱ्या तीव्र विरोधाला न जुमानता त्या मोहल्ल्यांतून फिरून पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत. सनातनी समाजाकडून होणारा शाब्दिक व शारीरिक छळ सहन करूनही त्या मागे हटल्या नाहीत. विधवा महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या बालहत्या प्रतिबंधक गृहात सुईणीचे प्रशिक्षण घेऊन त्यांनी प्रत्यक्ष सेवाकार्यात सहभाग नोंदविला. लेखक दिनकर काकडे यांनी या ग्रंथात फातिमा शेख यांचे जीवनकार्य मांडताना केवळ घटनात्मक निवेदन न करता त्यामागील वैचारिक भूमिका ठसविली आहे. कबीरांचे दोहे, तुकारामांचे अभंग, मुक्ता साळवेचा निबंध यांचा संदर्भ देत “ईश्वर एकच, मानवता हाच खरा धर्म आणि शिक्षण हेच समाजमुक्तीचे साधन” हा विचार प्रवाहीपणे अधोरेखित केला आहे. १८५७ च्या उठावाचा व १८१८ च्या भीमा-कोरेगाव युद्धाचा इतिहास जोतिराव फुलेंच्या विचारविश्वाशी जोडून मांडण्याची लेखकाची हातोटी विशेष उल्लेखनीय आहे. फातिमा शेख हा ग्रंथ म्हणजे केवळ एका स्त्रीचे चरित्र नव्हे, तर तो स्त्री, दलित व अल्पसंख्याक यांच्या संयुक्त संघर्षाचा दस्तऐवज आहे. ज्यांनी इतिहास घडविला, पण ज्यांच्यावर इतिहासाने अन्याय केला अशा व्यक्तिमत्त्वांना शब्दरूप देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. फातिमा शेख व उस्मान शेख यांचे योगदान अधोरेखित करून हा ग्रंथ फुले चळवळीचे आंतरधर्मीय, मानवी आणि समतावादी स्वरूप अधिक ठळक करतो. एकूणच, फातिमा शेख हे पुस्तक माहितीपूर्ण, संदर्भसमृद्ध आणि प्रेरणादायी आहे. समाजपरिवर्तनाच्या इतिहासात स्त्रियांचे व अल्पसंख्याकांचे योगदान समजून घेण्यासाठी, तसेच फुले-आंबेडकरी विचारपरंपरेची व्यापकता जाणून घेण्यासाठी हा ग्रंथ अत्यंत आवश्यक व वाचनीय ठरतो. -दिलीप भोसले