भारतीय संतपरंपरेत काही व्यक्तिमत्त्वे अशी आहेत की, त्यांनी केवळ धर्माची नव्हे, तर संपूर्ण मानवतेची नव्याने व्याख्या केली. संत कबीर हे अशाच अद्वितीय संतांपैकी एक. त्यांच्या विचारांची व्यापकता, निर्भीडता आणि मानवी मूल्यांवरील निष्ठा ही कालातीत आहे. म्हणूनच त्यांच्या तत्त्वज्ञानाला केवळ धार्मिक चौकटीत न बांधता, ते एक मानवतावादी सामाजिक क्रांतीचे विचारविश्व म्हणून समजणे आवश्यक ठरते.याच महान संताच्या जीवनकार्याचा अभ्यासपूर्ण वेध घेणारा 'संत कबीर' हा चरित्रग्रंथ लेखक दिनकर विष्णू काकडे यांनी साकारला आहे. मराठी भाषेत संत कबीरांवर तुलनेने अल्प लेखन झालेले असताना, हा ग्रंथ त्या अभावाची पूर्तता करणारा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न ठरतो.संत कबीर यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कोणत्याही एका धर्माचा, पंथाचा किंवा जातीय चौकटीचा पुरस्कार केला नाही. त्यांच्या विचारविश्वात “माणूस” हा केंद्रस्थानी आहे. ईश्वर हा निर्गुण, निराकार, सर्वव्यापी आहे.त्याला कोणत्याही कर्मकांडात किंवा धार्मिक बंधनात अडकवू नका हा त्यांचा मूलभूत संदेश आहे.हा विचार भगवान गौतम बुद्ध यांच्या तत्त्वज्ञानाशी सुसंगत भासतो, तर सामाजिक समतेच्या दृष्टीने तो पुढे महात्मा जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारपरंपरेशीही जोडला जातो. लेखकाने या वैचारिक सलगतेचा सूचक आणि अभ्यासपूर्ण उल्लेख केला आहे.कबीरांचे दोहे हे केवळ काव्य नाही, तर ते जीवन जगण्याचे मंत्र आहेत. अत्यंत साध्या भाषेत, परंतु गूढ अर्थांनी परिपूर्ण अशा या दोह्यांमधून कबीरांनी अंधश्रद्धा, कर्मकांड, जातीयता आणि धार्मिक पाखंड यांवर कठोर प्रहार केला आहे. त्यांच्या वाणीची ताकद अशी की ती सामान्य माणसाला जशी समजते, तशीच ती विद्वानालाही विचार करायला भाग पाडते.लेखकाने कबीरांच्या या वाणीचे विश्लेषण करताना तिच्या दुधारी स्वरूपाची जाणीव करून दिली आहे. ती जागृती घडवते, पण त्याच वेळी चुकीच्या प्रवृत्तीवर प्रहारही करते.कबीरांचे जीवन हे केवळ आध्यात्मिक नव्हते; तर ते सामाजिक प्रबोधनाचे एक प्रभावी माध्यम होते. त्यांनी समाजातील विषमता, अंधश्रद्धा आणि अन्याय यांवर निर्भीडपणे टीका केली. कोणत्याही प्रकारची “भिडभाड” न ठेवता सत्य मांडण्याची त्यांची वृत्ती हीच त्यांची खरी ताकद होती.लेखक दिनकर काकडे यांनी या वृत्तीचे प्रभावी चित्रण केले आहे. त्यांनी कबीरांना केवळ संत म्हणून नव्हे, तर विचारवंत, समाजसुधारक आणि मानवी मूल्यांचे पुरस्कर्ते म्हणून मांडले आहे.'संत कबीर' या ग्रंथाची भाषा सोपी, ओघवती आणि विचारप्रवर्तक आहे. लेखकाने कबीरांच्या विशाल जीवनसागरातून निवडक, पण महत्त्वपूर्ण पैलू उचलून वाचकांसमोर ठेवले आहेत. हा प्रयत्न “सागरातून ओंजळभर पाणी” घेण्यासारखा असला, तरी त्यातही त्या सागराची गोडी आणि खोली अनुभवायला मिळते.मराठीत कबीरांवर मर्यादित लेखन उपलब्ध असताना, हा ग्रंथ संशोधक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य वाचकांसाठी मार्गदर्शक संदर्भग्रंथ ठरतो.'संत कबीर' हा ग्रंथ वाचताना वाचक केवळ एका संताचे चरित्र वाचत नाही, तर तो मानवतावाद, समता आणि विवेकाचा धडा शिकतो. कबीरांचे विचार आजही तितकेच प्रासंगिक आहेत, कारण समाजातील अंधश्रद्धा, जातीयता आणि विषमता अजूनही पूर्णपणे नाहीशी झालेली नाही.दिनकर विष्णू काकडे यांचे हे लेखन म्हणूनच केवळ माहितीपर नाही, तर ते विचारांना चालना देणारे, आत्मपरीक्षणास प्रवृत्त करणारे आणि समाजजागृती करणारे आहे.अखेर असे म्हणता येईल की,संत कबीर हे केवळ इतिहासातील व्यक्तिमत्त्व नाहीत, तर ते आजही मानवतेच्या मार्गावर प्रकाश टाकणारा अखंड दीपस्तंभ आहेत.हा विचारप्रवर्तक ग्रंथ dibho.com या आँनलाईन प्लँटफाँर्म वरती ईबुक स्वरूपात लवकरच उपलब्ध होत आहे. वाचकांनी अवश्य वाचावा. -दिलीप भोसले