मराठी कवितेच्या विशाल प्रवाहात काही कविता अशा असतात, ज्या अलंकारांनी नव्हे तर अनुभवांनी समृद्ध असतात. त्या कवितांमध्ये कृत्रिमतेचा आभास नसतो; असते ती केवळ जीवनाची प्रामाणिक धग, संवेदनशील मनाची तगमग आणि जगण्याच्या अनेक छटांना शब्दांत पकडण्याची आर्त धडपड. अँड. राजकुमार उदगांवे यांचा ‘हिंदोळा’ हा काव्यसंग्रह अशाच प्रकारच्या भावस्पर्शी आणि अंतर्मुख करणाऱ्या कवितांचा जिवंत दस्तऐवज आहे.व्यवसायाने वकील असलेले अँड. उदगांवे हे प्रत्यक्ष साहित्यक्षेत्रातील व्यावसायिक व्यक्तिमत्त्व नसले, तरी त्यांच्या अंतर्मनात एक हळवा, संवेदनशील आणि सतत शब्दांशी संवाद साधणारा कवी दडलेला आहे. हीच बाब ‘हिंदोळा’ या संग्रहाला वेगळेपण प्रदान करते. कारण ही कविता “कवी” म्हणून प्रसिद्ध होण्याच्या महत्त्वाकांक्षेतून जन्मलेली नाही; तर ती जगण्याच्या अनुभवांतून, अंतर्मनाच्या हळव्या स्पंदनांतून आणि शब्दांवर असलेल्या निस्सीम प्रेमातून निर्माण झालेली आहे.‘हिंदोळा’ हे शीर्षक अत्यंत अर्थवाही आहे. हिंदोळा म्हणजे सतत हेलकावे घेणारी अवस्था. आनंद आणि दुःख, प्रेम आणि विरह, भूतकाळ आणि वर्तमान, गांव आणि शहर, निसर्ग आणि विकास, एकांत आणि गर्दी यांच्या दरम्यान मन सतत हेलकावत राहते. या संग्रहातील कविता याच मानसिक हिंदोळ्याचे प्रतिबिंब आहेत.अँड. उदगांवे यांच्या कवितेतील सर्वात प्रभावी पैलू म्हणजे आठवणींची हळवी किनार. बालपणीच्या गावाच्या आठवणी, त्या काळातील निरागसता, माणुसकीचा ओलावा आणि आजच्या शहरी जीवनातील एकाकीपणा यांचा त्यांनी अत्यंत सूक्ष्मपणे वेध घेतला आहे. गावाकडच्या मातीतली उब आणि शहरातील नात्यांचा कोरडेपणा यांच्यातील संघर्ष त्यांच्या कवितेतून प्रकर्षाने जाणवतो. त्यामुळे ‘हिंदोळा’ हा केवळ कवितासंग्रह राहत नाही; तर तो बदलत्या सामाजिक वास्तवाचा भावनिक आरसा बनतो.या संग्रहातील कविता वाचताना सतत जाणवते की कवीच्या मनात जीवनाबद्दल खोल आस्था आहे. त्यांना शब्दांवर प्रेम आहे, पण त्या शब्दांचा दिखाऊ बडेजाव नाही. त्यांच्या कविता साध्या भाषेत लिहिलेल्या असल्या तरी त्या आशयाने अत्यंत समृद्ध आहेत. “शब्दांची फुले” आणि “शब्दांची शस्त्रे” या दोन प्रतिमा त्यांच्या कवितेचे अचूक स्वरूप स्पष्ट करतात. एका बाजूला कोमल भावना आहेत, तर दुसऱ्या बाजूला वास्तवावर नेमका प्रहार करणारी जाणीव आहे.वकिलीसारख्या व्यस्त व्यवसायातून साहित्य साधना करणे ही खरंच तारेवरची कसरत आहे. पण अँड. उदगांवे यांनी या संघर्षाला कवितेची ताकद बनवले आहे. न्यायालयात शब्दांचा वापर तर्कासाठी होतो; तर कवितेत तेच शब्द भावना व्यक्त करण्यासाठी फुलतात. ही द्वंद्वात्मकता त्यांच्या कवितांना एक वेगळा आशयगर्भपणा प्रदान करते.त्यांच्या कवितेत जीवनाची प्रवाहीता सतत जाणवत राहते. कोणत्याही ठराविक चौकटीत अडकून न राहता जीवनाला मुक्तपणे अनुभवण्याची त्यांची वृत्ती अत्यंत महत्त्वाची आहे. “जीवन कोणत्याही आकृतिबंधात अडकत नाही” ही जाणीव त्यांच्या कवितांना मुक्तछंदाची सहजता आणि विचारांची व्यापकता देते.कवीची संवेदनशीलता विशेषतः वेदनांच्या अभिव्यक्तीत अधिक प्रभावी ठरते. “जगतानाच्या वेदना जेव्हा शब्दांचे रूप घेतात तेव्हा त्या वेदनांचे सोनं होतं” ही भावना त्यांच्या संपूर्ण संग्रहात विखुरलेली दिसते. त्यांच्या कविता वेदनेचे प्रदर्शन करत नाहीत; तर त्या वेदनेला अर्थ देतात. त्यामुळेच त्या वाचकांच्या काळजाला स्पर्श करतात.काव्यभाषेच्या दृष्टीने पाहता, अँड. उदगांवे यांची भाषा अत्यंत सहज, संवादात्मक आणि जिवंत आहे. अनावश्यक अलंकार किंवा अवघड प्रतिमांचा वापर न करता त्यांनी थेट मनाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. ही साधेपणातील ताकद त्यांच्या कवितांना अधिक प्रभावी बनवते.त्यांच्या कवितांमध्ये ग्रामीण संवेदनशीलतेचा गंध आहे. गावाकडच्या जगण्यातील ओलावा, निसर्गाशी असलेले नाते, नात्यांची उब आणि बदलत्या काळामुळे निर्माण झालेली पोकळी यांचे चित्रण अत्यंत जिवंतपणे समोर येते. त्याचवेळी आधुनिक शहरी जीवनातील धावपळ, एकटेपण आणि भावनांचे विस्कटलेले धागेही त्यांनी तितक्याच प्रभावीपणे मांडले आहेत.‘हिंदोळा’ हा संग्रह वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, कवी आपल्या भावनांशी पूर्ण प्रामाणिक आहे. तो कुठेही बनावटपणाचा आधार घेत नाही. त्यामुळे त्यांच्या कविता वाचताना त्या “लिहिलेल्या” वाटत नाहीत; तर त्या “जगलेल्या” वाटतात.अँड. राजकुमार उदगांवे यांचा ‘हिंदोळा’ हा काव्यसंग्रह म्हणजे एका संवेदनशील, संघर्षशील आणि माणुसकीवर प्रेम करणाऱ्या मनाचा भावनिक प्रवास आहे. जीवनाच्या असंख्य अनुभवांना शब्दांच्या हिंदोळ्यावर अलगद झुलवत वाचकांच्या मनात चिंतनाची नवी जागा निर्माण करणारा हा संग्रह मराठी कवितेच्या प्रवाहातील एक महत्त्वपूर्ण आणि आशयघन टप्पा ठरतो. जो वाचकांच्या अंतर्मनात दीर्घकाळ हलत राहतो.-दिलीप भोसले