एकोणिसावे शतक म्हणजे भारत देशात आभाळाच्या उंचीचे महापुरुष निर्माण करणारे शतक. या शतकात जन्मलेले सर्व महापुरुष जागतिक कीर्तीचे होते. महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, लोकमान्य टिळक महात्मा फुले शाहू महाराज, क्रांतिसिंह नाना पाटील किती नावे घ्यावीत! यामध्ये तेजस्वी ताऱ्यासारखे चमकून गेले, ते कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा पृथ्वीच्या जन्मापासून अज्ञान अंधकारात धडपणाऱ्या बहुजन समाजाला शिक्षणाचे आणि ज्ञानाचे जीवनसौंदर्य प्राप्त व्हावे, म्हणून अण्णा रात्रंदिवस झटले. ज्ञानाचे अमृत घडे त्यांनी सर्वसामान्यात वाटले. गरिबांच्या झोपडीत विचारांची ज्योत पेटवली. माणसाला स्वत्त्वाची जाणीव शिकवली, त्यामुळे खेड्यापाड्यातील हजारो घराना संस्कृतीची पालवी फुटली. विज्ञानवादी पुरोगामी महाराष्ट्र हे अण्णांच्या रयत शिक्षण संस्थेची यशोगाथा आहे. रघुराज मेटकरी या आमच्या मित्रांनी अण्णांचे चरित्र इथे अतिशय रसाळ भाषेत लिहिले आहे. रघुराज मराठी साहित्याचे गाढे व्यासंगी आहेत. विटा येथे गेली ४१ वर्षे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची चळवळ चालवतात. कर्मवीरांच्यावरची सर्व पुस्तके वाचून मेटकरी यांनी हे अण्णांचे जीवन चरित्र साकारले आहे. हे चरित्र अभ्यासक, वाचक आणि संशोधक सर्वांच्या हृदयात अण्णांच्या कार्याची ज्योत पेटवेल. प्रेमळ, मुत्सद्दी, मिश्किल तरीही ध्येयनिष्ठ कर्मवीर अण्णा रघुराजनी एवढ्या सोप्या शब्दात मांडले आहेत ते वाचकांना आपले वाटतील असा मला विश्वास वाटतो. प्रा. डॉ. मोहन राजमाने प्राचार्य संत गाडगे महाराज महाविद्यालय, कराड