डिसेंबर २०१४ च्या सुरुवातीला रघुराज मेटकरी या पूर्णतः अनोळखी व्यक्तीकडून १५ लेखांचे एक बाड आले. धावपळ कमी झाल्यावर, निवांत वेळ मिळेल तेव्हा पाहू असे ठरवले. पण दोन-तीन वेळा त्यांच्याकडून 'वाचले का?' अशी विचारणा करणारा फोन आला. तेव्हा काहीशा अनुत्साहाने नजर टाकायला घेतले. एक-दोन लेख वाचूनच नकार कळवता येईल असे वाटले. पण आणखी एक, आणखी एक असे करत आठ-नऊ लेख वाचून संपवले. त्या दिवशी रात्री डॉ. दाभोलकरांच्यावरील लेख एका दैनिकासाठी लिहायचा होता. तो दुसऱ्या दिवशीवर ढकलला आणि उर्वरित लेख त्याच रात्री वाचून संपवले. दुसऱ्या दिवशी सकाळी रघुराज मेटकरी यांना कळवले, 'जानेवारीपासून महिन्यातून दोन वेळा 'माझे विद्यार्थी' ही लेखमाला साधना साप्ताहिकातून प्रसिद्ध करू आणि २४ डिसेंबरला साने गुरुजींची जयंती येते तेव्हा त्याचे पुस्तक साधना प्रकाशनाकडून आणू.' मेटकरी गुरुजी भरभरून आभाराचे बोलले खरे, पण त्यांचा विश्वास पूर्णतः बसला नसावा. म्हणून त्यांनी चार-पाच दिवसांनी पुन्हा फोन करून विचारले, 'आपण सर्व लेख प्रसिद्ध करणार आहोत का?' मी म्हणालो, 'हो, सर्व लेख नियमित अंकांतून... नंतर पुस्तकातून आणि 'हरीश व गिरीश' हा लेख बालकुमार दिवाळी अंकातून.' त्यांना हे सारे स्वप्नवत वाटले असावे. पण त्या लेखांचा माझ्यावरचा परिणामच असा होता की, ते तीन निर्णय एका धडाक्यात घेताना माझ्या मनात जराही संभ्रम नव्हता. आणि अर्थातच, पहिल्याच लेखापासून सर्व प्रकारच्या, सर्व स्तरांतल्या वाचकांनी ही लेखमाला डोक्यावर घेतली. ठरवल्याप्रमाणे २४ डिसेंबरला गुरुजींच्या कर्मभूमीत (अंमळनेरला) पुस्तकाचे प्रकाशनही झाले आणि त्यानंतर तीनच महिन्यांनी दुसरी आवृत्ती आली आहे. विनोद शिरसाठ साधना, संपादक