लेखकाच्या व्यक्तीमत्वाचा आरसा म्हणजे त्याचे साहित्य असते. एका बाजूला लेखक सामान्य माणूस असतो. तर दुसऱ्या बाजूला तोच प्रबोधनाची मशाल हाती घेऊन अंधाऱ्या वस्तीत गस्त घालणारा जागल्या ही असतो. माणूस निर्भय आणि निर्मळ असेल तर त्याचे विचार ही प्रकाशमान असतात. याचा प्रत्यय लेखिका वाल्मिका एलिंजे-अहिरे यांचे साहित्य वाचताना पानोपानी अनुभवायला मिळतो. आपण जे आणि जस जगतो, ते तसच्या तस बिनधास्तपणे कागदावर उतरविणारे लेखक दुर्मिळच. मात्र ही किमया करून दाखवली आहे लेखिका वाल्मिका एलिंजे-अहिरे यांनी. त्यांच्या लेखनातून उत्साहाचे, चिंतेचे आणि चिंतनाचे शब्द कायमच पाझरत राहतात. अतिशय साध्या सोप्या भाषेत त्या आपले अनुभव विश्व सर्व प्रकारच्या वाचकांच्या अनुभव विश्वाशी जोडून मोकळ्या होतात. मुद्देसूद आणि ओघवत्या शैलीतील प्रभावी मांडणीमुळे वाचकांच्या मनात घर करून राहतात. त्याच्या 'सत्यकथा' या संग्रहातील अनेक कथांवर चित्रपट निर्मिती ही होऊ शकते. इतक्या त्या नितांत सुंदर आहेत. त्यांच्या साहित्यिक क्षेत्रातील घोडदौडीस आमच्या कडून खूप साऱ्या शुभेच्छा.. दिलीप भोसले भारतीय चित्रपट लेखक दिग्दर्शक