मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशन समोरील एका पुस्तक दुकानात काही वर्षापूर्वी नेहमीप्रमाणे नवीन एखादे पुस्तक मिळते का पहात असताना 'Healthy at Hundred' अशा शिर्षकाने माझे लक्ष वेधले. ते पुस्तक चाळल्यावर निरोगी दिर्घायुष्याची गुरुकिल्ली सापडल्याचा आनंद झाला. या पुस्तकाचा लेखक जॉन रॉबिन्स हा जगातील आहार आणि जीवनशैलीचा आपल्या आरोग्याशी असलेला संबंध उलगडून दाखविणारा आघाडीचा तज्ञ म्हणून ओळखला जातो. लेखकाने सर्वत्र वृध्दापकाळाविषयी असलेल्या समजुतींना धक्का देत वृध्दापकाळात व्यक्तींना येणारी विकलांगता, दौर्बल्य आणि व्याधी नैसर्गिक व अपरिहार्य नसून योग्य आहार आणी जीवनशैलीचा अवलंब करून वृद्धापकाळातही प्रत्येक व्यक्ती निरोगी, आनंदी व दिर्घायुष्यी होवू शकते हे जगातील चार मानवी समूहाच्या उदाहरणातून दाखवून दिले आहे. आधुनिक काळात मानवाने निरनिराळ्या शोधाद्वारे दुष्काळ, भूक आणि साथीच्या रोगांवर मात करून माणसाचे आयुर्मान वाढविले आहे. परंतू उतार वयात विकलांग बनून आजारपणात बहुतेक वृद्धांना आपला वृध्दापकाळ घालवावा लागत असल्यामुळे आपण आपल्या आयुष्याची वर्षे वाढविण्याऐवजी मरणाची प्रक्रीया लांबविली आहे असे वाटते. लेखकाने पुढारलेल्या औद्योगिक पाश्चात्य देशातील लोकांचा प्रक्रीया केलेला पोषणमूल्य रहित आहार व बैठी जीवनशैली कशी घातक आहे हे दाखवून ज्या चार मानवी समूहांनी निसर्गाशी असलेले तादात्म्य राखत योग्य आहार आणि जीवनशैलीतून निरोगी दिर्घायुष्य प्राप्त केले आहे त्यांचे अनुकरण केल्यास आपल्यापैकी प्रत्येकाला दिर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य मिळवता येईल व आयुष्याच्या अखेरपर्यंत आनंदी, सकारात्मक जीवन जगता येईल हे दाखवून दिले आहे. हे पुस्तक प्रत्येक वाचकास निश्चितच आरोग्यदायी ठरेल.