सु. ला. माने यांच्या "सौंदतीच्या वाटेवर" या काव्यसंग्रहाने भारतीय समाजाच्या एका गंभीर आणि निष्ठुर वास्तवावर प्रकाश टाकला आहे. लेखकाने आपले काव्यलेखन केवळ शौर्य, भक्ती किंवा लोकगीतापुरते सीमित न ठेवता, समाजातील पीडित वर्गाच्या असहाय्य वेदनांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे. देवदासी परंपरेच्या नावाखाली हजारो स्त्रियांच्या जीवनाची आहुती पडत आहे. रात्री देवाची दासी म्हणून ओळखली जाणारी आणि दिवसा जोगवा मागत फिरणारी स्त्री भारतीय समाजव्यवस्थेतील दुर्दैवी विसंगतीचे उदाहरण आहे. लेखकाला या परंपरेतील शोषण, अनिष्ट रूढी, आणि अमानवी प्रवृत्ती बघून चीड येते. या परंपरेमुळे भारतीय लोकशाहीवर लागलेली कीड कधी संपणार, हा प्रश्न माने विचारतात. अशा निष्ठुर व्यवस्थेचा अंत व्हावा आणि या भगिनींना न्याय मिळावा, यासाठीच लेखकाने या काव्यसंग्रहाची निर्मिती केली आहे. "सौंदतीच्या वाटेवर" हा केवळ साहित्याचा प्रपंच नसून एक सामाजिक चळवळ आहे, जी पीडितांच्या दुःखांना आवाज देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते. -दिलीप भोसले भारतीय चित्रपट लेखक दिग्दर्शक