कविता ही फक्त भावनेची अभिव्यक्ती नसून ती जीवनाचा आरसा देखील असते. जीवनातील चढउतार, सामाजिक संघर्ष, शोषण, अन्याय तसेच प्रेम, माया आणि आत्मविश्वास यांची साक्ष देणारा काव्यप्रकार ही कविता असते. ‘माझ्या मनातले निखारे’ हा विद्या राजेंद्र मोरे यांच्या कवितांचा संग्रह त्यांच्या जीवनातील तत्त्वज्ञानाचा, अनुभवांचा आणि संघर्षाचा एक महत्त्वपूर्ण दस्तावेज आहे. विद्या मोरे यांच्या साहित्यिक प्रवासाची सुरुवात साधीशी असली तरी ती संघर्षमय जीवनाच्या अनुभवांनी फुलली आहे. त्यांच्या घरात शिक्षणाला फारसा वाव नसला तरी लेखनाची आवड लहानपणापासून होती. 2012 मध्ये फेसबुकवर त्यांनी पहिली कविता पोस्ट केली तेव्हा त्यांच्या कवितांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. त्यांच्या कविता वास्तववादी असून जीवनातील अनुभवांवर आधारित आहेत. कविवर्य नामदेव ढसाळ यांच्या प्रभावाखाली विद्या मोरे यांनी विद्रोहाच्या छटांनी नटलेल्या कविता लिहिल्या. नामदेव ढसाळ यांच्या कवितांचे समाजशास्त्रीय दर्शन त्यांच्या लेखणीला दिशा देणारे ठरले. त्यामुळे त्यांच्या कवितांतून शेतकरी, महिला कामगार, वंचित समाज यांचे दु:ख आणि संघर्ष अधोरेखित होतात.