ग्रंथ उघडण्यापूर्वी - "अण्णा भाऊ साठे समाज विचार आणि साहित्यविवेचन" हा ग्रंथ विकीरतक वाचकांच्या हाती देताना कर्तव्यपूर्तीच्या भावनेने मन भरून आले आहे. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या पी.एच्.डी. पदवीसाठी मी लिहिलेल्या व एप्रिल १९८५ मध्ये मान्य झालेल्या शोय प्रबंधावर हा ग्रंथ प्रामुख्याने आधारला असला तरी हा जसाच्या तसा प्रबंध नव्हे. अनेक व्यावहारिक अडचणी, पृष्ठ मर्यादा यामुळे मूळ लेखनाची संक्षिप्त प्रत केवळ नाईलाजाने आपल्या हाती द्यावी लागत आहे. असे करण्यामुळे लेखनाचा प्रवाह काही ठिकाणी कदाचित खंडीत झाल्यासारखा वाटेल अथवा सुयोग्य स्पष्टीकरणा- शिवाय अंतीम मतेच समोर आली आहेत याची जाणीव आहे. मूळ लेखन शक्य तेवढे स्वयंस्पष्ट असल्यामुळे व एका निखळ, तटस्थ सौंदर्यशोधकाशिवाय लेखकाची खास अशी कोणतीही भूमिका नसल्यामुळे ग्रंथातील मांडणी, मते समजून घेण्यास लेखक उत्सुक आहे. १९७४ ते १९८४ या दहा वर्षांत हे सारे लेखन झालेले असल्यामुळे काल व संदर्भाच्या मर्यादाही वाचक ध्यानात घेतील अशी अपेक्षा आहे. हे लेखन करत असताना सहाय्यभूत झालेल्या अनेक संस्था, व्यक्ती, ग्रंथालये, सहकारी, मित्र, विद्यार्थी, नातेवाईक या सर्वांच्या माझ्यावरील लोभाचे कृतज्ञतेने स्मरण होत आहे. ते सारे माझ्या मागे नसते तर माझ्यासारख्या बेशिस्त माणसाकडून हे लेखनकार्य पूरे झाले नसते याची जाणीव आहे. विशेषतः डॉ. आप्पासाहेब पवार, डॉ. बापूजी साळुंखे, प्राचार्य भगवानराव बाबर यांचा धाक; डॉ. एस्. एस्. भोसलेसरांचे मार्गदर्शन, प्रा. केशव मेश्राम, डॉ. भालचंद्र फडके, प्रा. नरहर कुरूंदकर, श्री. बाबुराव बागूल, डॉ. गंगाधर पानतावणे, डॉ. म. भि. चिटणीस, श्री. राम कोलारकर, प्रा. माधव माळी, प्रा. के. एस्. नाईक, प्रा. म. द. हातकणंगलेकर, श्री. शंकर सारडा, डॉ. अच्यूत माने, दया पवार, पु. ल. देशपांडे, लक्ष्मण माने, शांताराम गरुड, प्रा. वैजनाथ महाजन, प्रा. विजय निंबाळकर यांच्याशी वेळोवेळी झालेल्या चर्चेमुळे माझी या विषयाकडे पाहण्याची दृष्टी अधिक व्यापक बनू शकली. प्राचार्य एम्, डी. देशपांडे, प्रा. डॉ. वि. रा. तोडकर, प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे आणि प्रा. डॉ. सदानंद मोरे व श्री. नारायण सुर्वे यांनी ग्रंथ प्रकाशनापूर्वी आस्थेने वाचून मोलाच्या सूचना केल्या. अण्णा भाऊ कुटुंबिय आक्का, शांता, शकू, मधू, शंकर भाऊ, यानी प्रेमाने मदत केली. लोकवाङ्मय प्रकाशनाचे विद्यमान अध्यक्ष व माझे जेष्ठ स्नेही अॅड. कॉ. गोविंदराव पानसरे, व्यवस्थापक प्रकाश विश्वासराव यौनी आग्रह केला नसता तर कदाचित ग्रंथ प्रकाशित व्हायला अजून अवधी लागला असता. वरीलपैकी कोणाचेही व्यवहारीक आभार मानण्या इतका मी त्यांच्या पासून दूर उभा नाही. सर्वांचे मनापासून आभार. 'प्रबोधन' तासगाव जि. सांगली ४१६ ३१२. प्रा. डॉ. बाबुराव गुरव