आपला भारत देश स्वतंत्र व्हावा म्हणून आपल्या छातीचा कोट करून, सातारच्या प्रतिसरकार स्थापनेत सहभागी झालेले, आझाद हिंद सेनेसारखी स्वतःची फौज निर्माण करणारे, इंग्रज सरकारचा खजिना आणून त्यातून क्रांतीचा एल्गार घुमवणारे, सातारचा तुरुंग फोडून बाहेर पडणारे आणि स्वातंत्र्यानंतर सर्वसामान्य लोकांना न्याय मिळावा, दुष्काळी भागातील जमिनींना पाणी मिळावे म्हणून सरकारवर प्रहार करणारे पद्मभूषण डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांचे हे मुलांना सुसंस्कारीत करणारे जीवन चरित्र आहे. सांगली जिल्ह्यातील विटा येथे गेली ४१ वर्षे अक्षर क्रांतीची चळवळ जोपासणारे, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक रघुराज मेटकरी यांनी अण्णांच्या जीवनाचे, स्वभावाचे विविध पदर प्रत्ययकारीरित्या उलघडलेले आहेत. हे पुस्तक उभ्या देशाला प्रेरणा देणारे आहे. उत्तम कांबळे ज्येष्ठ साहित्यिक पूर्वाध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन