साहित्य हे मानवी मनाच्या भावनांचा आरसा असते. एखादा कवितासंग्रह हा केवळ शब्दांचा संग्रह नसून, तो कवीच्या अंतःकरणातील संवेदनांचा झंकार असतो. कवयित्री सुषमा यशवंत वाडकर यांचा 'काजवा' हा कवितासंग्रह असाच एक भावनिक, वैचारिक आणि सौंदर्यात्मक अनुभवांचे मिश्रण आहे. 'काजवा' हे शीर्षक स्वतःच एका गूढ, निखळ आणि प्रेरणादायी भावनेचा प्रत्यय देते. 'काजवा' अंधारात चमकतो, तसाच हा संग्रहही विचारांच्या गडद रात्रीत शब्दांचे दिवे लावतो. कवयित्रीच्या कवितांमध्ये आयुष्याच्या विविध टप्प्यांचे प्रतिबिंब उमटते. कधी उत्साहाचा प्रकाश, कधी विरहाची सावली, कधी स्वप्नांची उधळण तर कधी वास्तवाच्या जखमा. या संग्रहातील कविता जणू भावनांच्या वलयांनी विणलेल्या मोत्यांची माळ आहेत. 'असा मी' या कवितेत आत्मपरिचयाचा शोध आहे, तर 'साथ तुझी प्रेमाची' घट्ट वीण बांधते. 'आरंभ' एका नव्या प्रवासाची चाहूल देते, आणि 'जा माहेरा जा पाखरा' हळव्या मनाच्या भावना उलगडते. 'प्रतिक्षा' आणि 'इतिश्री प्रतिक्षेची' या कवितांमधून मनात साचलेल्या वाट पाहण्याच्या भावना उमटतात. कवयित्रीच्या कवितांमध्ये निसर्ग हा एक महत्त्वाचा घटक आहे. 'श्रावण', 'वळीव गारा', 'ढगांची पालखी', 'पाऊस तुझ्या शहरावरती', 'भेट पावसातली' अशा कवितांमधून निसर्गाचा उत्कट अनुभव येतो. पाऊस, वारा, गारवा आणि चातकासारखी प्रतीक्षा यांना शब्दरूप देताना कवयित्रीचे निसर्गावरील प्रेम स्पष्ट होते. या कवितासंग्रहात नातेसंबंधांवरही सुंदर प्रकाश टाकण्यात आला आहे. 'मैत्रीण भेट', 'माझे घर', 'अपूर्व नाते' यांसारख्या कवितांमध्ये नात्यांतील हळवेपणा आणि जवळीक दिसते. 'फ्लॅट संस्कृती' आणि 'वहिवाट' या कवितांमधून बदलत्या जीवनशैलीची जाणीव होते. 'ध्येयवादी', 'स्वप्न अपूरे', 'सूर पुन्हा कंठी यावे', 'मी पुन्हा येणार आहे' या कवितांमधून जिद्द, संघर्ष आणि नव्या उमेदिची प्रेरणा मिळते. जीवनात अनेकदा पराभव, वेदना आणि निराशा येते, पण त्या सर्वातून मार्ग काढत पुढे जाण्याचा संदेश या कविता देतात. कवयित्रीची भाषा ही सहज, प्रवाही आणि भावनाशील आहे. त्यात कोठेही अलंकारांचा अतिरेक नाही, तरीही त्यांच्या शब्दांना स्वतःची लय आहे. त्यांच्या कवितांमध्ये साधेपणा असूनही गहनता आहे. वाचकांशी संवाद साधण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. 'काजवा' हा केवळ कवितासंग्रह नाही, तर हा एक अनुभव आहे. कधी प्रेरणादायी, कधी हळवा, कधी आत्मचिंतन करणारा. सुषमा यशवंत वाडकर यांच्या लेखणीतील संवेदनशीलता, निसर्गाच्या प्रती असलेलं प्रेम आणि मानवी भावनांचे सूक्ष्म दर्शन यामुळे हा संग्रह मनाच्या गाभ्यात प्रकाश टाकणारा ठरतो. प्रत्येक वाचकाने या प्रकाशकिरणांचा अनुभव घ्यावा आणि आपल्या भावविश्वात एक नवीन प्रकाशझोत पेटवावा.