Ovya Dinyanchya

Ovya Dinyanchya


Book Preview


₹150.00 ₹200.00
Price in USD: $1.71

'ओव्या दिनांच्या' :- आपल्या जाणिवांचा आणि मूल्यांचा दिनविशेष आजच्या घाईगर्दीच्या, तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या जगात माणूस दिवसेंदिवस यांत्रिक होत चालला आहे. जीवनातील साधेपणा, संवेदना आणि संस्काराच्या जागा आता कृत्रिमतेने व्यापल्या जात आहेत. अशा काळात एखादे पुस्तक जिथे कवितांच्या माध्यमातून आपला इतिहास, संस्कृती, समाज आणि माणूसपणाचा धागा पकडते, त्या संग्रहाचं मोल शब्दात मांडणं कठीण आहे. सुधीर शेरे लिखित ‘ओव्या दिनांच्या’ हा असा एक वेगळा आणि ठसा उमटवणारा कवितासंग्रह आहे, जो केवळ साहित्यप्रेमींसाठी नव्हे, तर शिक्षण, संस्कार, सामाजिक जाणीव आणि मूल्य-शिक्षण यांची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी एक मौल्यवान ठेवा आहे. सण-वार, जयंत्या, पुण्यतिथ्या, संस्था स्थापना दिवस, जागतिक आरोग्य दिन, पर्यावरण दिन, महिला दिन, मानवाधिकार दिन, विज्ञान दिन हे सर्व दिवस आपल्याला कोणत्या ना कोणत्या ऐतिहासिक, सामाजिक किंवा वैज्ञानिक मूल्यांची आठवण करून देतात. मात्र ही माहिती केवळ कॅलेंडरात मर्यादित राहते, शालेय भाषणापुरतीच उरते, परंतु तिचं खरं मोल कधीच जाणवलं जात नाही. म्हणूनच सुधीर शेरे यांनी हीच माहिती कवितेत ओवली. त्यांनी या ‘दिनविशेष’ दिनांकांना केवळ माहितीपुरते न पाहता, त्यांचा ऐतिहासिक, सामाजिक व मूल्यदृष्टिकोनातून अभ्यास केला. आणि त्यानंतर ते रूपांतरित केलं एक सुसंस्कृत, प्रबोधनपर कवितासंग्रहात. ‘ओव्या दिनांच्या’ मध्ये. ही एक अत्यंत विचारपूर्वक व मनापासून साकारलेली साहित्यिक तपश्चर्या आहे. सुधीर शेरे हे शिक्षक. शिक्षकी पेशा ही केवळ ज्ञान देण्याची भूमिका नसून, संस्कारांची शिदोरी बांधणारा एक समाज निर्माता असतो. त्यांच्या या भूमिकेचा अनुभव त्यांच्या लेखनात ठायी ठायी दिसून येतो. त्यांच्या कवितांचा जन्म झाला तो शाळेतील कामकाजाच्या निमित्ताने. अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या विविध दिनविशेषांच्या माहिती संकलनातून. ते म्हणतात, “प्रत्येक वेळी ही माहिती परिपूर्ण, पण संक्षिप्त हवी असते. आणि कविता स्वरूपात असेल तर जास्त परिणामकारक ठरते.” या शिक्षकाच्या अंतःकरणातून स्फुरलेले विचार, कालांतराने विद्यार्थ्यांच्या, सहकाऱ्यांच्या पसंतीस उतरले आणि पुढे पुस्तक म्हणून प्रकाशित होण्याइतपत परिपक्व झाले. या संग्रहातील प्रत्येक कविता आष्टाक्षरी ओवी छंदात बांधलेली आहे. चार चरणांची एक रचना आणि त्यातही पाच कडवी, हा शिस्तबद्ध बांधणीचा नमुना आहे. ही शिस्त केवळ छंदामधली नाही, तर विषय मांडणीतीलही आहे. प्रत्येक रचनेत दिनविशेषाचं स्वरूप, त्यामागचा ऐतिहासिक संदर्भ, त्याचं सामाजिक महत्त्व, वर्तमानाशी नातं आणि संदेशरूप सादरीकरण असा एक अभ्यासपूर्ण क्रम पाळण्यात आलेला आहे. ही रचना पद्धती केवळ सौंदर्यशास्त्रीय नाही, तर ती संस्कारशास्त्राची एक जबाबदारीही पेलते. अशा प्रकारे 'ओव्या दिनांच्या' या संग्रहातून माहिती, मूल्ये आणि संवेदना या तीन अंगांचा एकत्रित प्रवास आपल्यासमोर उभा राहतो. सुधीर शेरे यांनी केवळ भारतापुरता मर्यादित विषय घेतला नाही. त्यांनी युनेस्को घोषित जागतिक दिन यांची निवड केली. ज्यामध्ये मानवता, विज्ञान, पर्यावरण, दुर्बल घटक, आरोग्य, सेवा आणि शांतता हे मूलभूत मानवी मूल्ये केंद्रस्थानी आहेत. अशा निवडीमुळे या संग्रहाला केवळ स्थानिक नसून जागतिक विचारांची कवितात्म मांडणी मिळते. त्यातही त्यांनी समन्याय, समदृष्टी आणि सममूल्य हे त्रिसूत्र पाळलं आहे. ज्यामुळे प्रत्येक विषयाला समान महत्त्व मिळतं. ही गोष्ट त्यांच्या लोकशाहीवादी, समतावादी विचारधारेचं प्रतिक आहे. जिथे माहिती तांत्रिक झाली, तिथे कधी कधी ओवीची गेयता कमी झाली. पण या त्रुटीबद्दल लेखकाने अत्यंत प्रामाणिकपणे "हा दोष मी पदरात घेतो" अशी कबुली दिली आहे. ही नम्रता त्यांच्या साहित्यिक प्रामाणिकतेचं प्रतीक आहे. त्याचप्रमाणे, 'राष्ट्रीय युवा दिन' या कवितेत एक कडवं अधिक झालं पण तेही त्यांनी अपवाद म्हणून स्पष्ट केलं. स्वतःच घालून घेतलेले बंधन पाळताना त्यांनी अचूकता व काटेकोरता राखली. ही गोष्ट त्यांच्या साहित्यप्रेमाचं आणि तपश्चर्येचं लक्षण आहे. ‘ओव्या दिनांच्या’ या संग्रहात आपल्याला फक्त कवी दिसत नाही, तर संवेदनशील शिक्षक, सामाजिक भान असलेला विचारवंत आणि एक संस्कार करणारा संस्कृती-वाहक असा त्रिसंवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा संगम दिसतो. हे पुस्तक म्हणजे कवितेच्या माध्यमातून घडवलेली मुल्यशिक्षणाची नवी वाट आहे. या संग्रहाचा प्रत्येक दिवस, प्रत्येक कविता म्हणजे एका नव्या उजेडाची खिडकी आहे. जिथून आपण स्वतःच्याच आयुष्याच्या, समाजाच्या आणि संस्कृतीच्या नव्या अर्थाकडे पाहू शकतो. ‘ओव्या दिनांच्या’ या कवितासंग्रहात कवितेला माहितीचा अर्थ, संस्काराचा आधार आणि सामाजिक संवेदनांचा स्पर्श लाभलेला आहे. ही कविता म्हणजे फक्त काव्य न राहता, ती एक सामाजिक दस्तऐवज, शिक्षणसंहिता आणि मानवमूल्यांची पाठशाळा आहे. हे पुस्तक वाचताना प्रत्येकाला आपल्या शिक्षकाचे, शाळेतील भाषणाचे, समाजकार्याच्या उपक्रमाचे, आपल्या आजूबाजूच्या माणसांचे स्मरण होईल. आणि एकदा का ही आठवण जागी झाली की ही कविता तुमचं मन अधिक संवेदनशील आणि समजूतदार करेल. ‘ओव्या दिनांच्या’ हे केवळ कवितांचं पुस्तक नाही, तर ते आपल्या जाणीवांचा आणि मूल्यांचा दिनविशेष आहे.

RELATED BOOKS

₹80.00 ₹100.00 20% Off
₹60.00 ₹100.00 40% Off
₹130.00 ₹150.00 13% Off
₹20.00 ₹30.00 33% Off
₹60.00 ₹100.00 40% Off