“शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसतो; तर तो विद्यार्थ्याच्या अंतर्मनात भविष्याची बीजे पेरणारा संस्कारकर्ता असतो.” या विचाराला आपल्या जगण्यात अर्थ देत, शिक्षकत्वाकडे केवळ व्यवसाय म्हणून नव्हे तर जीवनव्रत म्हणून पाहणाऱ्या व्यक्तिमत्त्वांमध्ये श्रीमती पुष्पा जयगोंडा पाटील यांचे नाव आदराने घ्यावे लागते.
बी.ए., बी.एड्. शिक्षण घेतलेल्या श्रीमती पुष्पा जयगोंडा पाटील यांनी बाळासाहेब माटे माध्यमिक विद्यालय, कामथे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथे मुख्याध्यापिका म्हणून जबाबदारी सांभाळली. ३१ ऑगस्ट २०१० रोजी त्या सेवेतून निवृत्त झाल्या; परंतु त्यांच्यासाठी निवृत्ती म्हणजे शिक्षकत्वाचा शेवट नव्हता. तर, शाळेच्या चौकटीबाहेर व्यापक समाजाशी जोडले जाणाऱ्या एका नव्या पर्वाची ती सुरुवात होती. शिक्षणाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी पारंपरिक चौकटीत अडकलेली नाही. संविधान जागर, वैचारिक प्रगल्भता, ‘बिजांड ते ब्रह्मांड’, शिक्षणातील ‘ओयासिस’ यांसारख्या विषयांमधून त्यांच्या चिंतनाची व्याप्ती लक्षात येते. शिक्षण म्हणजे केवळ पाठ्यपुस्तक, परीक्षा, गुण आणि प्रमाणपत्रे नव्हेत; तर शिक्षण म्हणजे विचार करण्याची क्षमता, प्रश्न विचारण्याचे धैर्य, विवेक जागविणे, मूल्यांची जपणूक आणि समाजाशी संवेदनशील नाते निर्माण करणे या व्यापक अर्थाने त्यांनी शिक्षणाकडे पाहिले.
त्यांच्या या वैचारिक आणि शैक्षणिक प्रवासाला शिक्षणतज्ज्ञ लीलाताई पाटील, मा. यदुनाथ थत्ते आणि आंतरभारतीचे अध्यक्ष मा. चंद्रकांत शहा यांसारख्या विचारवंतांचा सहवास लाभला. या सहवासातून शिक्षकत्वाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी अधिक समृद्ध आणि व्यापक होत गेली. याच अनुभवांचे चिंतनशील प्रतिबिंब त्यांच्या ‘विद्यार्थी देवो भव’ या पुस्तकात उमटते. हे पुस्तक म्हणजे केवळ एका शिक्षिकेच्या अनुभवांचे संकलन नाही; तर अध्यापनाच्या गाभाऱ्यात प्रवेश करू इच्छिणाऱ्या शिक्षकाला अंतर्मुख करणारा एक वैचारिक प्रवास आहे. विद्यार्थ्याकडे केवळ शिकवायचा घटक म्हणून नव्हे, तर स्वतंत्र व्यक्तिमत्त्व, स्वप्ने, क्षमता आणि भावविश्व असलेला माणूस म्हणून पाहण्याची भूमिका या लेखनातून पुढे येते.
लेखनाच्या माध्यमातून त्यांनी पालक, कुटुंब आणि समाजाशीही संवाद साधला. रत्नागिरी येथून प्रसिद्ध होणाऱ्या ‘सत्यशोधक’ साप्ताहिकात त्यांनी ‘पालकत्वाचा जागर’ या विषयावर लेखमाला लिहिली. पालकत्व ही केवळ मुलांच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी नसून, त्यांच्या भावविश्वाला समजून घेण्याची आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला योग्य दिशा देण्याची प्रक्रिया आहे, ही जाणीव या लेखनाच्या केंद्रस्थानी आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध ‘सागर’ दैनिकात त्यांनी ‘कुटुंब’ या विषयावर लेखमाला लिहिली. व्यक्तीच्या जडणघडणीत कुटुंबाची भूमिका किती मूलभूत आहे, याचा विचार त्यांच्या लेखनातून पुढे येतो. अशा प्रकारे त्यांचे लेखन हे शिक्षण, पालकत्व आणि कुटुंब या तीनही घटकांना एका व्यापक सामाजिक संदर्भात जोडणारे आहे.
शिक्षक म्हणून काम करत असताना केवळ अध्यापन करण्यावर समाधान न मानता त्यांनी शिक्षणाच्या प्रक्रियेचा चिकित्सक अभ्यासही केला. महाराष्ट्र राज्य मराठी संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनांमध्ये त्यांनी शोधनिबंध सादर केले.
मालवण, येथील अधिवेशनात त्यांनी ‘इयत्ता पाचवी बालभारती भाषिक क्षमता पूर्ण करू शकेल काय?’ हा महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केला. तसेच यवतमाळ, येथील अधिवेशनात
‘निबंध लेखनातील प्रयोगशीलता’या विषयावर शोधनिबंध सादर केला.
या दोन विषयांवरूनच त्यांच्या शिक्षक म्हणून असलेल्या भूमिकेची एक महत्त्वाची बाजू स्पष्ट होते. त्या केवळ प्रचलित पद्धती स्वीकारणाऱ्या शिक्षिका नव्हत्या; तर ‘आपण जे करतो ते अधिक परिणामकारक कसे होईल?’ हा प्रश्न सातत्याने विचारणाऱ्या प्रयोगशील शिक्षिका होत्या.
त्यांच्या कार्याची दखल विविध स्तरांवर घेतली गेली. विशेष म्हणजे त्यांनी स्वतःच्या कार्यासाठी कोणत्याही प्रकारची फाईलपूर्तता किंवा पुरस्कारासाठी पाठपुरावा न करता मिळवलेले सन्मान हे त्यांच्या कार्याच्या नैसर्गिक स्वीकाराचे द्योतक आहेत.
१९९० मध्ये ‘आदर्श शिक्षिका’ हा जिल्हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. महाराष्ट्र आचार्यकुल, नागपूर आणि पूज्य मामा क्षीरसागर प्रतिष्ठान, नागपूर यांच्या वतीने, पूज्य साने गुरुजींच्या स्मृतीप्रित्यर्थ, आचार्यकुलाची मूल्ये आचरणात आणणाऱ्या शिक्षकांना दिला जाणारा राज्यस्तरीय ‘मातृधर्मी’ पुरस्कार त्यांना २००५ मध्ये प्रदान करण्यात आला. ६ एप्रिल २००३ रोजी शिक्षणतज्ज्ञ मा. राम शेवाळकर यांच्या शुभहस्ते त्यांचा सन्मान झाला, ही बाबही त्यांच्या कार्याच्या वैचारिक प्रतिष्ठेची साक्ष देते. अलीकडेच, ८ मार्च २०२५ रोजी ‘विशेष नारी सन्मान पुरस्कार’ देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. परंतु पुरस्कारांची यादी सांगून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे मोजमाप करता येणार नाही. कारण त्यांच्यासाठी पुरस्कार हा कार्याचा उद्देश नव्हता; तर कार्य करत राहणे हाच त्यांच्या जीवनाचा पुरस्कार होता.
श्रीमती पुष्पा जयगोंडा पाटील यांचे जीवन पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. त्यांनी शिक्षक म्हणून केवळ नोकरी केली नाही; तर त्यांच्या छंदांमध्ये लेखन आहे, वाचन आहे, निसर्ग आहे, पर्यटन आहे; पण या सगळ्यांच्या केंद्रस्थानी आहे माणूस.
विद्यार्थी हा त्यांच्या चिंतनाचा केंद्रबिंदू आहे. युवा हा त्यांच्या आशेचा केंद्रबिंदू आहे. महिला हा त्यांच्या सामाजिक जाणिवेचा महत्त्वाचा भाग आहे आणि शिक्षण हे या सगळ्यांना जोडणारे माध्यम आहे. त्यांच्या जीवनप्रवासाकडे पाहताना असे वाटते की, काही माणसे निवृत्त होतात; पण त्यांचे विचार निवृत्त होत नाहीत. काहींची सेवा थांबते; पण त्यांची संस्कारयात्रा थांबत नाही.
श्रीमती पुष्पा जयगोंडा पाटील यांची हीच संस्कारयात्रा आजही सुरू आहे. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना शिकवले असेल; परंतु त्यांच्या कार्याची खरी व्याप्ती त्यापेक्षा मोठी आहे. त्यांनी अनेक मनांना विचार करायला शिकवले आणि म्हणूनच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख एका पदाने, एका पुरस्काराने किंवा एका पुस्तकाने पूर्ण होत नाही. कारण त्या आहेत, शिक्षकत्वाला साधनेचे रूप देणाऱ्या शिक्षिका, विचारांना कृतीची जोड देणाऱ्या प्रयोगशील शिक्षणप्रेमी, लेखनातून समाजाशी संवाद साधणाऱ्या साहित्यप्रेमी आणि विद्यार्थ्याच्या भविष्यात स्वतःच्या आयुष्याचा अर्थ शोधणारे एक संवेदनशील व्यक्तिमत्त्व.
-दिलीप भोसले