डॉ. राजश्री पाटील :– स्त्रीभान, साहित्य आणि समाजसेवेचा अविरत प्रवास
डॉक्टरकी ही केवळ रुग्णोपचारापुरती मर्यादित नसून, ती एक व्यापक सामाजिक जबाबदारी आहे, याची जाणीव ठेवून आपले संपूर्ण जीवन या कार्याला वाहून घेणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. राजश्री पाटील.
BAMS (आयुर्वेदाचार्य) ही वैद्यकीय पदवी मिळवून गेली दोन दशके त्या खिद्रापूर-जुगुल या सीमाभागात वैद्यकीय सेवा करत आहेत. पण त्यांचा दृष्टीकोन फक्त औषधोपचारांपुरता मर्यादित नाही; तर स्त्रियांच्या मानसिक आणि शारीरिक व्याधींच्या मुळाशी जाऊन त्यावर उपाय शोधणे, स्त्रीआरोग्याबाबत जागृती निर्माण करणे हा त्यांचा खरा ध्यास आहे.
त्यांच्या लेखनाची दिशा व ताकदही या अनुभवातूनच आकार घेत आहे. ग्रामीण समाजाचे वास्तव, स्त्रीच्या वेदना, तिचे सामर्थ्य आणि वैद्यकीय क्षेत्रातील संघर्ष हे सारे त्यांच्या कथांमध्ये, कवितांमध्ये आणि कादंबऱ्यांमध्ये प्रतिबिंबित होते. ‘तिच्यातली ती’, ‘कथाकंद’, ‘बोचऱ्या सुया’, ‘देहदंश’, ‘कोरोना कॉकटेल’ यांसारखे कथासंग्रह असोत, की ‘ती अजूनही जळत आहे’ हा स्त्रीच्या दाहक वास्तवाचा साक्षीदार ठरलेला कवितासंग्रह सर्वत्र त्यांच्या संवेदनशील, स्त्रीवादी भानाचा ठसा उमटलेला आहे.
‘…आणि चांदणे उन्हात हसले’ या कादंबरीत त्यांनी डॉ. मंदा आणि डॉ. प्रकाश आमटे यांच्या जीवनातील प्रेम-अनुबंध उलगडून समाजसेवेतील त्यागमय वाटचाल वाचकांसमोर ठेवली आहे. ‘सुमनांजली’ व ‘राजोळी’ या चारोळ्यांतून त्यांची काव्यात्म संवेदनशीलता खुलते. तसेच “कोण मोठे? कोण लहान?” हा बालकथासंग्रह व बालकविता संग्रहही प्रकाशनाच्या मार्गावर आहे.
त्यांच्या साहित्याला प्राप्त झालेले सन्मान हे केवळ गौरवचिन्हे नाहीत, तर त्यांच्या लेखनाच्या परिणामकारकतेचे आणि सामाजिक महत्त्वाचे द्योतक आहेत. ‘तिच्यातली ती’ ला मिळालेले पलूस ग्रामीण साहित्य पुरस्कार, अक्षरसागर मंचाचा विशेष ग्रंथ पुरस्कार, संत गाडगेबाबा पुरस्कार, ‘देहदंश’ला मिळालेला ग्रामीण साहित्य संमेलनाचा पुरस्कार, ‘बोचऱ्या सुया’साठी मिळालेला द.म.सा.चा विशेष पुरस्कार हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. त्याशिवाय पद्मश्री नारायण सुर्वे पुरस्कार, शांता शेळके मानदेशी पुरस्कार, महिला जागृती पुरस्कार, वैद्यकीय सेवा पुरस्कार अशा असंख्य गौरवांनी त्यांच्या साहित्यसेवेची पावती दिली आहे.
डॉ. राजश्री पाटील यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू म्हणजे स्त्री. तिच्या वेदना, तिचे प्रश्न, तिचा संघर्ष आणि तिचे सबलीकरण. त्यांच्या कथांमधली स्त्री ही बळी ठरलेली नाही, तर प्रश्न विचारणारी, समाजासमोर आरसा धरून उभी राहणारी आणि संघर्षातून नवे आयुष्य उभारणारी आहे.
डॉ. पाटील या डॉक्टर म्हणून ग्रामीण स्त्रियांच्या आरोग्य समस्यांना उपाय शोधतात; लेखिका म्हणून समाजाचे दाहक वास्तव टिपतात; समाजसेविका म्हणून लोकांना सबलीकरणाचा मार्ग दाखवतात. त्यांच्या लेखनात आणि कार्यात एकाचवेळी उपचार, जाणीवा आणि क्रांतीची बीजे दडलेली आहेत.
त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व हे केवळ बहुपेडी नाही तर एक प्रेरणादायी चळवळ आहे. जी पुढच्या पिढ्यांना साहित्य आणि समाजकार्यासाठी नवे भान देत राहील.