'पेरणी' हा कथासंग्रह वाचकांच्या हाती देताना वाचक (विशेषतः जैन) तो कितपत स्वीकारतील याबद्दल मी स्वतः साशंक आहे. कारण माझ्या कथा धीट, विद्रोही, पुरोगामी विचाराच्या, बंडखोरी करतानाच परिवर्तनाच्या वाटेवरून जाणाऱ्या असतात. 'पेरणी' मधील कथा तशाच आहेत. स्पष्ट, थेट बोलणाऱ्या ! जे चांगल आहे ते आहेच! पण चांगल्याच्या आडून येणारं काही त्रासदायकही आहे... समाजात ते असतंच. स्वाभाविकच या कथा रुढ पारंपारिक विचारांना धक्का देणाऱ्या, परिवर्तनासाठी कृती करणाऱ्या, कर्मकांडाविरोधी भूमिका घेताना चाकोरी मोडून जुन्या मूल्यांची पुनर्मांडणी करणाऱ्या आहेत. या पुनर्मांडणीत मानवी मूल्यांचा आधुनिक विज्ञाननिष्ठ विचार आलेला आहे. माणसं स्वार्थी, लबाड, ढोंगी असतात. ती चुकतात, चुकणारच. या स्वाभाविकतेचा स्वीकार करणं, त्यातून बदलणं म्हणजेच मानवतेच्या वाटेवरून दोन पावलं पुढं जाण! खऱ्या अर्थानं सम्यक्त्वी होणं! या कथा समकालीन जैन कथा आहेत, हे खरेच. पण या कथा फक्त जैन समाजापुरत्याच नाहीत... तर माणूस म्हणून असणाऱ्या सार्वत्रिक अनुभवाला स्पर्श करणाऱ्या आहेत.