'कोरोना कॉकटेल' :- एका भयभीत काळाचा साहित्यिक हिशेब इतिहास हा केवळ राजे-रजवाड्यांचा किंवा युद्धांचा नसतो, तर तो मानवाच्या जगण्याचा हिशेब असतो. कोरोना काळ हा मानवजातीच्या स्मरणात एक अद्वितीय टप्पा म्हणून कायमचा कोरला गेला आहे. या काळाने जगाला थांबवलं, घड्याळाच्या काट्यांना खुंटवलं, आणि जीवनाचा ताल उध्वस्त केला. या सगळ्या ताणतणाव, वेदना, भय आणि अनुभवांना डॉ. राजश्री पाटील यांनी ‘कोरोना कॉकटेल’ या ग्रंथात शब्दबद्ध करत वाचकांसमोर मांडलं आहे. या ग्रंथाची वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे त्याची प्रकारवैविध्यपूर्ण रचना. कथा, लघुकथा, अल्पकथा, निबंध, ललितलेख, पत्रलेखन, नाट्यछटा, अनुभवकथन, विनोदी लेख, कविता, चारोळ्या, हायकु – अशा विविध साहित्यप्रकारांचा सुरेख मिलाफ या पुस्तकात दिसतो. हे पुस्तक म्हणजे एकाच प्रकाराचे जेवण नाही तर विविध रसांनी परिपूर्ण अशी सकस थाळी आहे. कधी गोड, कधी कडू, कधी तिखट, कधी आंबट. ‘कॉकटेल’ ही संकल्पनाच मुळी याच विविधतेचं प्रतीक आहे. लॉकडाऊनमध्ये सगळं थांबलं असलं, तरी मन थांबलं नव्हतं. लोकांनी मोबाईल, सोशल मीडियाचा आधार घेतला. डॉ. पाटील यांनी या संधीला साहित्याचं रूप दिलं. ‘कारंटाईन’ ही कथा पुरस्काराने गौरवली गेली. ‘अम्मा बुला रही है’ सारख्या कथांमधून मानवी दुःखाच्या तीव्र छटा टिपल्या गेल्या. ‘मज मी सापडले’ हा निबंध आत्मशोधाचा अनुभव देतो. ‘कोरोनाची वरात’ हा विनोदी लेख पु. ल. देशपांडे यांच्या शैलीला अभिवादन करतो. ‘एका परिचारिकेचं डायरी पान’ हे अनुभवकथन कोरोना योद्ध्यांच्या त्यागाचं दस्तऐवजीकरण ठरतं. याशिवाय पत्रलेखन, लघुनाट्य, कौटुंबिक प्रसंग, कविता अशा विविध प्रयोगांमधून लेखिकेने करोनाकाळातील प्रत्येक धागा टिपण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकातील लेखनाचा ठळक पैलू म्हणजे भावनिक खोली. आईला मूल भेटू न शकणं, मृत्यूच्या छायेतून लिहिलेल्या ओळी, घराघरातील भीतीचा अनुभव, वैद्यकीय सेवेच्या आघाडीवर झुंजणारे योद्धे. हे सर्व वाचताना वाचक पुन्हा त्या दिवसांत शिरतो. मन गलबलून जातं. पण पुस्तक फक्त शोककथा सांगत नाही; त्यात हसू आहे, विनोद आहे, उपरोध आहे. लॉकडाऊनमध्ये मानवी मनाने भीतीला हसण्यात रूपांतरित करण्याचा प्रयत्न केला, त्याचे काही सुरेख नमुने या लेखनातून उमटतात. ‘कोरोना कॉकटेल’ हे पुस्तक डॉक्युमेंटरी प्रकारचं साहित्य आहे. यात साहित्यिक सौंदर्याबरोबरच इतिहासदर्शी दस्तऐवज म्हणूनही मूल्य आहे. कथा आणि निबंध यात सामाजिक वास्तवाचा ठसा आहे. कविता, चारोळ्या यात भावनांचा स्फोट आहे. नाट्यछटा आणि विनोदी लेख यात विनोदातून वास्तवाचं दर्शन आहे. या मिश्रणामुळे हे पुस्तक केवळ एकसुरी राहत नाही, तर वाचकाला सतत नवीनतेचा अनुभव देते. ‘कोरोना कॉकटेल’ हे केवळ साहित्य नसून मानवतेच्या लढ्याचा, भीतीचा आणि जगण्याच्या जिद्दीचा दस्तऐवज आहे. पुढील पिढ्यांना कोरोना काळ समजावून सांगण्यासाठी हे पुस्तक उपयोगी ठरेल. डॉ. राजश्री पाटील यांनी स्वतःचे अनुभव, समाजाचे दर्शन आणि साहित्यिक प्रयोग यांचा मिलाफ करून एक वेगळा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हे पुस्तक साहित्य रसिकांसाठी तर आहेच, पण एक ऐतिहासिक स्मृती म्हणूनही वाचनीय ठरतं. -दिलीप भोसले