"बोचऱ्या सुया" :– बोचतात… पण जागंही करतात! "सुई" म्हणजे एकाच वेळी उपचार करणारी… आणि टोचणारीही. 'बोचऱ्या सुया' वाचताना.. यातूनच निर्माण होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक वेदनांचा प्रत्यय येतो. लेखिकेच्या लेखणीच्या सुईने वाचकाच्या मनालाच टोचणी लागते." ‘बोचऱ्या सुया’ हा कथासंग्रह केवळ कथा किंवा अनुभवांचे शब्दांकन नाही, तर ग्रामीण भारतातल्या स्त्रीजीवनाचे अस्सल, प्रखर आणि विदारक दर्शन घडवणारा एक आरसा आहे. ग्रामीण भागात वैद्यकीय सेवेसारखा व्यवसाय करताना आलेल्या अनुभवांचे शब्दांकन डॉ. राजश्री पाटील यांनी अतिशय संवेदनशील, ओघवत्या आणि समर्पक शैलीत केले आहे. या केवळ ‘केसेस’ नाहीत. तर या आहेत कहाण्या.. ज्या अंगावर काटा आणतात, प्रश्न विचारायला लावतात आणि अंतर्मुख करतात. लेखिकेने एका डॉक्टरच्या भूमिकेपलीकडे जाऊन, एक साक्षीदार, एक विचारवंत, एक सामाजिक कार्यकर्ती, आणि एक स्त्री म्हणून या सर्व गोष्टी अनुभवल्या आहेत. म्हणूनच त्यांचं लेखन मनाच्या आत खोलवर भिडतं. ग्रामीण भागात आजही बाईला स्वतःच्या देहाची जाणीव नाही. तिच्या शरीराच्या नैसर्गिक गरजांपासून ते लैंगिक ज्ञानाच्या अभावामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांपर्यंत डॉ. राजश्री यांनी अत्यंत ठाम आणि नाजूक शब्दांत बोलून दाखवलं आहे. यातील एक कथा — "Intact hymen" चा उल्लेख करत, लैंगिक अज्ञानामुळे होणारी एक वेगळीच त्रासदायक स्थिती उलगडते, जिथे स्त्री आणि पुरुष दोघेही अंधारात असतात. "आई" होण्याचा स्त्रीचा आंतरिक आकांत आणि त्यातही समाजाने लादलेली मुलगा हवा यासारखी बेगडी संस्कृती.. या पुस्तकात वारंवार ठसठशीतपणे समोर येते. एका केसमध्ये मुलगी झाल्यामुळे ६ वर्षांची चिमुरडीही हतबल होऊन रडते, हे दृश्य डोळ्यासमोर उभं राहतं आणि समाज किती खोलवर स्त्रीविरोधी विचारांनी पछाडलेला आहे हे स्पष्ट होतं. अनेक केसेसमध्ये बाईचं मातृत्व परिस्थितीपुढे हार मानताना दिसतं. काही वेळा मूल मारण्याचा विचार केला जातो, काही वेळा समाजाच्या बंधनांमुळे त्याग करावा लागतो. पण डॉक्टर म्हणून लेखिकेचं हृदय आणि कर्तव्य दोन्ही एका विलक्षण ताळ्यावर असतात. त्या त्यांच व्रत जपत राहतात, कुठे कठोर, कुठे सौम्य... पण सदा सजग. कधी बाळंतपणासाठी आलेली स्त्री लग्न न करताच बाळंत होते, तर कधी बाळाचा जीव वाचवण्यासाठी लेखिका समाजाशीही संघर्ष करतात. ही सगळी सत्यकथा आहे. कल्पना नव्हे. आणि म्हणूनच 'Truth is stranger than fiction' हे वाक्य अगदी तंतोतंत लागू पडतं. एका कथेतील बाई हॉस्पिटलमधल्या टेबलवर झोपण्याऐवजी जंगलात बाळंत व्हायला पसंती देते. कारण, "मी टेबलावर झोपतच नाही." या एका वाक्यात इतकी भयंकर अंधश्रद्धा, असुरक्षितता आणि अज्ञान भरलेलं आहे की, हसावं की रडावं असा प्रश्न पडतो. लेखिकेच्या भाषेतील मिश्कीलपणा या गंभीर कथांनाही हलकीशी चव देतो, पण बोचरी सुई मात्र टोचल्याशिवाय राहत नाही. पुस्तकात एक कथा अशीही आहे जिथे पुरुष डॉक्टरचा अनुभव विनोदी पद्धतीने मांडला आहे. पेशंट डॉक्टरला कसा त्रास देतो, गृहित धरतो. हे सगळं विनोदातून आलेलं असलं तरी त्यातही एक सामाजिक सत्य आहे. जसं काही एका डॉक्टर जोडप्याचं दुःख, समाधान, संताप आणि आशावाद सर्व काही यातून वाहत जातं. 'बोचऱ्या सुया' वाचताना जाणवतं, हे पुस्तक म्हणजे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील स्त्री जीवनाच्या विविध छटांचं चित्रण आहे. ही 'ती' आहे.. जी अज्ञानी आहे, तरी ममत्वाने भरलेली आहे; जी अंधश्रद्धेने पछाडलेली आहे, तरी नव्या विचारासाठी आत खोल कुठेतरी तयार आहे; जी खूप सहन करते.. पण कुठेतरी उभारी घ्यायची तिची ताकदही आहे. या कथांतून केवळ वेदना व्यक्त झालेल्या नाहीत, तर काही ठिकाणी सुखद परिवर्तनाचं चित्रही उमटलं आहे. जसं की व्यसनी नवऱ्याचं परिवर्तन, मुलींचं आत्मनिर्भर होणं, आणि अनाथ मुलाच्या आयुष्यात आलेलं आशादायी वळण. ही आशा, ही शक्यता… लेखिकेला आणि वाचकाला दोघांनाही धीर देते. डॉ. राजश्री पाटील यांची भाषा कुठेही आक्रस्ताळी होत नाही. ती ओघवती, अनुभवाच्या खोलीशी सुसंगत आहे. त्या प्रसंग मांडताना कुठेही अति नाटकीपणा करत नाहीत. केवळ सत्य. त्यामुळेच हे लेखन हृदयाला भिडतं. त्यांनी डॉक्टर म्हणून वैद्यकीय भूमिका निभावताना अनेक सामाजिक भूमिका स्वीकारल्या आहेत. बाई म्हणून, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून, समुपदेशक म्हणून, कधी-कधी तर त्यांनी ‘आई’सारखी माया दाखविली आहे! ‘बोचऱ्या सुया’ हे पुस्तक म्हणजे ग्रामीण भारताच्या सामाजिक आरोग्याचं निदान करणाऱ्या एका डॉक्टर लेखिकेचं सर्जनशील आणि संवेदनशील आत्मकथन आहे. यातून डॉक्टर म्हणून त्यांच्या हातात असलेल्या सुईंनी केवळ शरीर नव्हे तर समाजही टोचला आहे. आणि म्हणूनच ‘बोचऱ्या सुया’ हा केवळ एक कथासंग्रह नाही, तर ते समाजाच्या खोलवर गेलेल्या आजारांवर बोट ठेवणारे वैद्यकीय सत्यकथन आहे. एक सुज्ञ डॉक्टर, एक संवेदनशील लेखिका, आणि एक जिवंत साक्षीदार म्हणून डॉ. राजश्री पाटील यांना सलाम! त्यांच्या पुढील लेखनप्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!