Gost Eka Bajetchi

Gost Eka Bajetchi


Book Preview


₹100.00 ₹120.00
Price in USD: $1.14

‘गोष्ट एका बजेटची’ :– हसऱ्या क्षणांतून जीवनाचे बोलके दर्शन साहित्य म्हणजे केवळ गंभीर विचारांचे, दुःखद अनुभवांचे किंवा तात्त्विक चिंतनाचे व्यासपीठ नाही. साहित्य हसवतेही, खेळवतेही आणि नकळत विचार करायला भाग पाडते. प्रदीप जोशी यांचा ‘गोष्ट एका बजेटची’ हा पहिला कथासंग्रह हे याचे उत्तम उदाहरण ठरतो. शालेय जीवनापासून सुरू झालेली लेखनाची आवड सेवानिवृत्तीनंतर नव्या जोमाने उमलली. लेखनाचा वारसा सासरे प्र. दि. शिराळकर यांच्याकडून मिळाला, मित्र सुधीर कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले आणि पत्नी सुरेखा यांच्या प्रोत्साहनाने या संग्रहाचा जन्म झाला. पाठीशी आई-वडिलांचे आशीर्वाद असल्याने ही निर्मिती अधिक सक्षम झाली. या सर्व भावबंधांचा स्पर्श वाचकाला प्रत्येक कथेत जाणवतो. संग्रहात एकूण २१ कथा आहेत. हसवणाऱ्या, गुदगुल्या करणाऱ्या, उपरोधिक अशा या कथा वाचताना जीवनातील अनेक विरोधाभास नजरेसमोर येतात. हास्य हा गाभा असला तरी तो पोकळ नाही; त्यामध्ये सामाजिक भाष्य, मानवी स्वभावाची उपरोधपूर्ण मांडणी आणि ग्रामीण-शहरी वास्तवाचा धांडोळा आहे. कधी ‘आडगावची स्मशानभूमी’ गावात नवी स्मशानभूमी उभारल्यानंतरच्या वादळावर हलकेच हसवते, तर ‘बदल’ शिक्षणातून एका भिकाऱ्याच्या जीवनात घडणारा परिवर्तनाचा स्पर्श देऊन डोळ्यांत पाणी आणते. कै. वा. वि. भिडे लघुकथा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेली ही कथा लेखकाच्या भावनिक जाणिवेची साक्ष देते. ‘परतीची भेटप्रत’ साहित्यिकांच्या दुनियेतल्या गमतीदार प्रसंगावर चिमटे काढते; तर ‘गण्याची पैज’ आणि ‘पोटपूजा – हॉटेल कम खानावळ’ या कथा ग्रामीण जगण्यातील खुसखुशीत गंमती उलगडतात. ‘प्रतीक्षा’ या कथेत अंत्यसंस्काराच्या प्रतिक्षेत असलेल्या लोकांचा आणि रंगतदार सभेचा विरोधाभास वाचकाला विचार करायला लावतो. ‘प्रेम संमेलन’, ‘वंजारवाडीचे साक्षरता अभियान’ या कथा समाजजीवनातील हास्यास्पद वास्तव हसत-खेळत दाखवतात. या संग्रहातील ‘फ्लॅटमधील अमावस्येची रात्र’ ही अपवादात्मक भयकथा आहे. हसऱ्या कथांमध्ये अचानक आलेली ही थरारक झुळूक वाचकाला भेदरवते. तर ‘प्रेम की मैत्री’, ‘निरपेक्ष प्रेम’ या कथा मानवी नात्यांच्या गहन पैलूंचा वेध घेतात. ‘कथा मोबाईलच्या रेंजची’, ‘गाढवप्रेम’, ‘बनगरवाडीत प्लॅस्टिक बंदी’ अशा कथा जीवनातील छोट्या प्रसंगांमधून निर्माण होणाऱ्या हास्याचे रंग उधळतात. शीर्षककथा ‘गोष्ट एका बजेटची’ मात्र खास लक्षवेधी ठरते. घरातील बजेट हा साधासुधा विषय असूनही त्यामधून निर्माण होणारे संघर्ष, दुरावे आणि हास्यस्पद प्रसंग लेखकाने अतिशय सहजतेने रंगवले आहेत. या सर्व कथांचा आस्वाद घेताना वाचकाला हे उमगते की हास्य म्हणजे केवळ पोकळ हसणे नाही, तर जीवनाच्या गंभीरतेला स्वीकारण्याचा एक सुंदर मार्ग आहे. प्रदीप जोशी यांच्या कथांतील पात्रे, प्रसंग काल्पनिक असले तरी त्यांचा जीवनाशी असलेला जवळचा संबंध वाचकाला आपल्या अनुभवांची आठवण करून देतो. ‘गोष्ट एका बजेटची’ हा संग्रह वाचताना कधी पोट धरून हसू येते, कधी डोळे पाणावतात, तर कधी नकळत विचार मनात दाटून येतो. हीच तर खरी जोशी यांच्या साहित्याची ताकद आहे. प्रदीप जोशी यांनी हा पहिला प्रयत्न ज्या आत्मीयतेने वाचकांपर्यंत पोहोचवला आहे, त्यामुळे पुढेही त्यांच्याकडून असेच नवनवीन, हसरे-चिंतनशील साहित्य निर्माण होवो हीच सदिच्छा. -दिलीप भोसले

RELATED BOOKS

₹50.00 ₹100.00 50% Off
₹100.00 ₹200.00 50% Off
₹300.00 ₹420.00 29% Off
₹150.00 ₹250.00 40% Off
₹150.00 ₹215.00 30% Off