प्रवास म्हणजे फक्त विविध ठिकाणांचे दर्शन नसते, तर तो असतो मनाचा आणि अनुभवांचा एक गूढ प्रवास. लेखक प्रदीप जोशी यांचे ‘देवभूमी’ हे प्रवासवर्णन वाचताना वाचक केवळ हिमाचलच्या बर्फाच्छादित डोंगरदऱ्यांत फिरत नाहीत, तर त्यांच्या मनातील लहानपणीची स्वप्ने, कौटुंबिक नात्यांची ऊब, वयामुळे आलेली शंका-भिती आणि त्यावर मात करत मिळवलेला आनंद या सगळ्याचा सहप्रवासी होतो. लेखकाची यात्रा केवळ हिमाचलच्या सिमला, कुलू-मनाली, आटारी बॉर्डर, अमृतसर इतकीच मर्यादित नाही. तर ती एका स्वप्नपूर्तीची यात्रा आहे. कॉलेज जीवनात उराशी बाळगलेले ‘एक दिवस मी हे डोंगर, ही देवभूमी पाहणार’ हे स्वप्न, वयाच्या सदुसष्ठीनंतर प्रत्यक्षात उतरते. इथे प्रवास हा नुसता ‘ट्रीप’ राहत नाही, तर वेळेच्या लांब पल्ल्याला दिलेले एक उत्तर ठरतो. “कुठल्याही स्वप्नाला वेळ येईपर्यंत थांबावे लागते.” कुटुंबासोबतचा हा प्रवास म्हणजे आयुष्याच्या ऋतूंचेही एक दर्शन घडवतो. तीन ज्येष्ठ नागरिक, दोन युवा आणि दोन लहान मुली. या सहप्रवासात एकाच वेळी अनुभवाची जडणघडण, उत्साहाची तरलता आणि निरागसतेचे हास्य एकत्र येते. बर्फाच्या थंडीमध्ये शरीर थकते, पण शेकोटीभोवती जमलेली ही कुटुंबीयांची ऊब मनाला उबदार ठेवते. श्वसनाचा त्रास, तब्येतीच्या मर्यादा, पोटाचे आजार या सगळ्यांमधूनही नात्यांची काळजी, मुलगी-जावयाची जबाबदारी आणि पत्नीची निःशब्द साथ प्रवास अधिक अर्थपूर्ण करते. या प्रवासात निसर्गाचेही वेगवेगळे रंग उमलतात. सिमल्यात पोचताच पडणारा बर्फ म्हणजे निसर्गाचा स्वतःचा लाल गालिचा. जणू तोच म्हणतो, “तुम्ही आयुष्यभर वाट पाहिलीत, आता मी तुम्हाला माझ्या श्वेत आलिंगनात सामावून घेतो.” आटारी बॉर्डरवरील देशभक्तीची शपथ, सुवर्ण मंदिराची दैवी शांतता, जालियनवाला बागेची शोकांतिका हे सारे अनुभव देवभूमीच्या प्रवासाला भावनिक गहिरेपण देतात. तरीही लेखक वास्तव लपवत नाहीत. प्रवास कंपन्यांची फसवणूक, हॉटेलमधील असमाधानकारक सोयी, अचानक बदललेली ठिकाणांची यादी ही प्रवासातील कटू सत्येही ते मोकळेपणाने मांडतात. परंतु, योग्य नियोजन, आगाऊ बुकिंग आणि सततचा पाठपुरावा यामुळे प्रवास आनंदमय होतो, हा अनुभव वाचकाला प्रेरणादायी ठरतो. ‘देवभूमी’ हे प्रवासवर्णन शेवटी जीवनाविषयी एक तत्त्वज्ञानच सांगून जाते. प्रवास म्हणजे केवळ स्थळे पाहणे नाही, तर आपल्यातील नाती पुन्हा शोधणे, आठवणींचा गाठोडा भरून आणणे आणि अपूर्ण स्वप्ने पूर्ण करणे हा एक जीवनोत्सव आहे. प्रदीप जोशींची ही देवभूमीची सफर आपल्याला पटवून देते की, वय काहीही असो, स्वप्ने कधीही थकू देऊ नयेत. -दिलीप भोसले