'माझी पत्रकारिता' :– पत्रकारितेच्या खऱ्या चेहऱ्याचा आरसा पत्रकारिता हा व्यवसाय नाही, तर तो एक श्वास आहे. सत्याशी, काळाशी आणि जनतेशी प्रामाणिक राहण्याची शपथ आहे. प्रदीप जोशी यांचा “माझी पत्रकारिता” हा ग्रंथ म्हणजे त्यांच्या वीस वर्षांच्या पत्रकारितेचा प्रवास, संघर्ष, कडू-गोड अनुभव, आणि लेखनाशी असलेली निष्ठा यांचे एक आत्मीय चित्रण आहे. शालेय जीवनातील वार्षिक अंकापासून सुरू झालेली लेखनयात्रा एका वाचकाच्या पत्राने चैतन्यमय झाली. एका सामान्य माणसाच्या समस्येला लेखणीने आवाज दिला आणि प्रशासन हलले. तेव्हा जोशींच्या अंतरात्म्यातील पत्रकार जागा झाला. हा क्षण जणू पहिल्या पावसाच्या थेंबासारखा; त्यातूनच भविष्यातील नद्या, सरिता, महापूर जन्माला आले. “लेखन हा माझा प्रांत” असे ते म्हणतात, आणि खरंच हा प्रांत त्यांनी वसा मानून जोपासला. कविता, कथा, पुस्तक परीक्षणे यांपासून ते वृत्तपत्रीय लेखनापर्यंतचा प्रवास, त्यांच्या लेखणीच्या बहुविधतेचे द्योतक आहे. त्यांनी जेव्हा पत्रकारितेत प्रवेश केला, तेव्हा हा व्यवसाय आजच्या सारखा वेगवान नव्हता. मोबाईल, चॅनेल्स नव्हते; एका बातमीचे वजन, तिचा ठसा समाजाच्या मनावर खोलवर उमटत असे. जोशींनी या जबाबदारीची जाणीव ठेवून सामाजिक, विधायक पत्रकारिता केली. “माझी पत्रकारिता” हे पुस्तक म्हणजे आठवणींची एक पेटीच आहे. प्रत्येक पानावर एक प्रसंग उलगडतो, एखादा जुना फोटो झळकतो, एखादा विस्मरणात गेलेला गंध पुन्हा दरवळतो. त्यांच्या जुन्या डायरीने जणू परिसाचा स्पर्श दिला आणि विस्मरणाच्या धुक्यात हरवलेले प्रसंग पुन्हा जिवंत झाले. झोपेतून उठून प्रसंग टिपण्याची त्यांची तळमळ म्हणजे या व्यवसायाशी असलेली खरी प्रामाणिकता आहे. पत्रकारिता त्यांच्या दृष्टीने फक्त व्यावसायिक क्षेत्र नाही, तर ते एक व्रत आहे. “लेखणीने लोकांना दुखावलेले असते, मग त्या आठवणी पुन्हा जाग्या कराव्यात का?” हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारला. पण उत्तर एकच आले. पत्रकारिता हे व्यसन आहे, एकदा लागले की सुटत नाही. आणि म्हणूनच त्यांनी आपले अनुभव, संघर्ष, यश-अपयश यांचे वास्तव चित्रण वाचकांसमोर मांडले. आजच्या वेगवान तंत्रज्ञानाच्या युगात बातम्या क्षणात येतात-जातात, त्यांचे वजन कमी झाले आहे. पण वीस वर्षांपूर्वी एक बातमी छापली की लोक प्रत्यक्ष पत्रकार शोधायला घरापर्यंत येत. जिल्हाधिकारी बैठकीला सुरुवात करण्यापूर्वी “प्रेस इज हिअर” म्हणत असत. हीच त्या काळातील पत्रकारितेची प्रतिष्ठा. जोशींनी ही प्रतिष्ठा आपल्या प्रामाणिक लेखणीने जपली आहे. एकूणच “माझी पत्रकारिता” हे पुस्तक म्हणजे एका पत्रकाराचे आत्मचरित्र नव्हे तर एका काळाचे साक्षीदार आहे. यात पत्रकारितेतील संघर्ष आहेत, व्यावसायिक वास्तव आहे, कौटुंबिक जीवनात असलेला ताण आहे, पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे या व्यवसायाशी असलेली अमर्याद निष्ठा आहे. प्रदीप जोशी यांचे हे लेखन पुढच्या पिढीला केवळ प्रेरणा नाही तर पत्रकारितेच्या खऱ्या चेहऱ्याचा आरसा दाखवेल यात शंका नाही. -दिलीप भोसले