'वाचू आनंदे' :- वाचनसंस्कृतीचे पुनरुज्जीवन पुस्तक म्हणजे फक्त अक्षरांचा गठ्ठा नसतो; तर ते जीवनाचे श्वास असतात, विचारांचे पंख असतात, आणि मनाला दिलासा देणारे निःशब्द मित्र असतात. प्रदीप जोशी यांचे ‘वाचू आनंदे’ हे पुस्तक अशा मित्रपरिवाराचा परिचय करून देणारे आहे. वाचन हा लेखकाचा जीवनभराचा छंद, आणि त्या छंदातून उमललेली ही अक्षरयात्रा. यातून आजच्या वाचनसंस्कृतीला नवी दिशा मिळावी हा अंतःकरणाचा संकल्प यात स्पष्ट जाणवतो. आजचा काळ मोबाईलच्या पडद्यामागे गुरफटला आहे. वाचनाची आवड जणू गाळात रुतू लागली आहे. अशा वेळी ‘वाचू आनंदे’ हे पुस्तक वाचकांसाठी दीपस्तंभासारखे उभे राहते. लेखकाने आपल्या संग्रहातील पंचवीस निवडक पुस्तकांचा परिचय करून दिला आहे. कथा, कविता, अनुवादित साहित्य. विविध प्रकारांचा समावेश करून वाचकांना समृद्ध साहित्यविश्वात नेण्याचा प्रयत्न केला आहे. हे परीक्षण नाही, तर पुस्तकांकडे वाचकांना ओढून नेणारे सर्जनशील निमंत्रण आहे. लेखकाने स्वतःच्या आयुष्यभराच्या वाचनप्रेमातून साधलेले अनुभव या ग्रंथातून सांडले आहेत. “वाचाल तर वाचाल” हा विचार जसा काळाच्या ओघात विसरला जातोय, तसा या पुस्तकातून तो पुन्हा एकदा नव्याने जागा होतोय. ‘वाचू आनंदे’ यातील लेख म्हणजे फक्त पुस्तकांची यादी नाही, तर वाचक व लेखक यांच्यातील हृदयस्पर्शी संवाद आहे. प्रत्येक पुस्तकाची चांगली बाजू अधोरेखित करून लेखकाने वाचकांच्या मनात जिज्ञासेची नवी ठिणगी पेटवली आहे. ‘वाचू आनंदे’ वाचताना असे वाटते की आपण एका अक्षरबागेत फिरत आहोत. या बागेत फुललेली प्रत्येक फुले म्हणजे एक पुस्तक. काही सुवासिक कवितेची, काही गोड गप्पांच्या कथेची, तर काही विचारांच्या गगनाला भिडणाऱ्या उंच वृक्षांची. वाचक त्या बागेत पाऊल टाकतो आणि प्रत्येक पानातून नव्या सुगंधाचा अनुभव घेतो. ही बाग म्हणजे केवळ सौंदर्याचा अनुभव नाही; तर तणावग्रस्त मनाला शांततेचा शीतल झरा आहे. प्रवासात सोबतीला एखादे पुस्तक असावे, म्हणजे डोळ्यांत नवा उजेड आणि हृदयात नवी आशा जागृत होते ही जाणीव या पुस्तकातून ठळकपणे उमटते. प्रदीप जोशी यांचे ‘वाचू आनंदे’ हे पुस्तक म्हणजे वाचनसंस्कृतीचा पुनर्जन्म आहे. नव्या लेखकांना प्रोत्साहन, वाचकांना नवे मार्गदर्शन आणि समाजाला वाचनाचे महत्त्व पुन्हा स्मरविण्याचा हा प्रयत्न आहे. आजच्या गोंगाटी, धावपळीच्या काळात हे पुस्तक सांगते, “पुस्तकांचा हात धरलात, तर आयुष्याचा प्रवास अधिक अर्थपूर्ण, अधिक सुंदर होईल.” म्हणूनच वाचकांनी हे पुस्तक आवर्जून वाचावे. -दिलीप भोसले