साहित्याच्या विविध प्रकारांमध्ये कथा हा प्रकार वाचकांच्या मनाला सहज भिडणारा आणि जीवनातील अनुभवांना प्रभावीपणे व्यक्त करणारा आहे. कथा केवळ मनोरंजनाचे साधन नसून ती माणसाला विचार करायला लावते, संवेदनशील बनवते आणि जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी देते. कथा लिहिण्यासाठी कल्पनाशक्ती, निरीक्षणशक्ती, भाषेवरील प्रभुत्व आणि अनुभवांची सांगड आवश्यक असते. मात्र अनेक विद्यार्थ्यांना कथा लिहिताना नेमके काय लिहावे, कथेला सुरुवात कशी करावी, घटनांची मांडणी कशी करावी आणि शेवट परिणामकारक कसा करावा, याबाबत अडचणी येतात. या अडचणींचा विचार करून लेखिका आरती लाटणे यांनी लिहिलेले ‘अशी लिहावी कथा’ हे पुस्तक विद्यार्थ्यांच्या सर्जनशील लेखनाला योग्य दिशा देणारे महत्त्वपूर्ण मार्गदर्शक ठरते. हे पुस्तक केवळ कथा सांगणारे नाही, तर कथा कशी निर्माण होते, तिची रचना कशी असते आणि विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पनाशक्तीचा वापर करून कथा कशी लिहावी, याचे मार्गदर्शन करणारे आहे. त्यामुळे या पुस्तकाचे महत्त्व साहित्यिक तसेच शैक्षणिक अशा दोन्ही स्तरांवर अधोरेखित होते. आजच्या शिक्षणपद्धतीत विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच त्यांच्या कल्पनाशक्तीला आणि अभिव्यक्ती क्षमतेला महत्त्व दिले जाते. पाठांतरावर आधारित शिक्षणापेक्षा विचार करणे, प्रश्न विचारणे, अनुभव व्यक्त करणे आणि सर्जनशीलतेचा उपयोग करणे ही कौशल्ये अधिक आवश्यक ठरत आहेत. कथा लेखन विद्यार्थ्यांच्या या सर्व क्षमतांचा विकास करण्यास मदत करते. अनेकदा विद्यार्थ्यांना एखादा विषय दिला जातो; परंतु त्या विषया भोवती कल्पना कशा गुंफाव्यात, पात्रे कशी उभी करावीत किंवा कथानकाला योग्य वळण कसे द्यावे, हे त्यांना समजत नाही. काही विद्यार्थी कल्पना चांगली असूनही भाषेच्या अडचणीमुळे प्रभावी लेखन करू शकत नाहीत. काहींच्या लेखनात सुरुवात आणि शेवट असतो; मात्र मध्यवर्ती घटनांची सुसंगत मांडणी नसते. या सर्व अडचणी लक्षात घेऊन लेखिकेने कथा लेखनाची प्रक्रिया सोप्या आणि समजण्यासारख्या पद्धतीने मांडली आहे. पुस्तकाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये कथा वाचण्याची, समजून घेण्याची आणि स्वतः कथा लिहिण्याची आवड निर्माण करणे हा आहे. कथा लेखन ही केवळ परीक्षेतील एक कृती नसून ती व्यक्तिमत्त्व विकासाची प्रक्रिया आहे, हा विचार या पुस्तकातून प्रभावीपणे पुढे येतो. कथा म्हणजे केवळ काही घटना एकत्र मांडणे नव्हे. कथेमध्ये पात्रे, प्रसंग, संघर्ष, भावना, संवाद आणि परिणामकारक शेवट यांचा योग्य समन्वय असतो. कथा जीवनातील एखादा अनुभव, सामाजिक वास्तव, कल्पनाविश्व किंवा नैतिक विचार प्रभावीपणे मांडू शकते. लेखिकेने कथा म्हणजे काय, तिची वैशिष्ट्ये कोणती आणि कथा लिहिताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, याचे मार्गदर्शन केले आहे. विद्यार्थ्यांनी कथा लिहिताना शब्दांची अनावश्यक पुनरावृत्ती टाळावी, विचार स्पष्ट ठेवावेत, घटनांची सुसंगत मांडणी करावी आणि वाचकांच्या मनात उत्सुकता निर्माण करावी, यावर भर दिला आहे. कथेचा शेवट हा तिच्या प्रभावाचा महत्त्वाचा भाग असतो. काही कथा वाचकाला विचार करायला लावतात, काही भावनिक करतात, तर काही अनपेक्षित वळणामुळे लक्षात राहतात. या सर्व बाबींचा विचार विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत करण्यात आला आहे. त्यामुळे कथा लेखनातील तांत्रिक बाबी विद्यार्थ्यांना अवघड न वाटता सहज आत्मसात करता येतात. या पुस्तकाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कथा लेखनाच्या विविध प्रकारांचा केलेला समावेश. लेखिकेने सुमारे तेरा प्रकारांच्या कथांची ओळख करून देत विद्यार्थ्यांना विविध पद्धतींनी विचार करण्याची संधी दिली आहे. यामध्ये महाप्रसादासारख्या विषयांवर आधारित कथा, लोभी कावळ्याची कथा, म्हणी किंवा वाक्प्रचारांवर आधारित कथा, शब्दांवरून कथा तयार करणे, सुरुवात किंवा शेवट पूर्ण करणे, चित्रावरून कथा लेखन आणि कल्पनाविलासावर आधारित कथा यांचा समावेश आहे. ‘मला पंख असते तर’, ‘कास पठारावरील एखादे फूल बोलू लागले तर’ अशा कल्पनांवर आधारित लेखन विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला नवे आकाश देते. अशा विषयांमुळे विद्यार्थी वास्तवाच्या पलीकडे जाऊन कल्पनाविश्व निर्माण करू शकतात. कल्पना करताना भाषेचा, प्रसंगांचा आणि भावनांचा वापर कसा करायचा, हे त्यांना शिकता येते. याशिवाय साहसी कथा, ऐतिहासिक कथा आणि वैज्ञानिक विषयांवरील कथांचाही समावेश करण्यात आला आहे. ‘राजूचे धाडस’सारख्या साहसी कथांमधून धैर्य आणि प्रसंगावधानाचा विचार पुढे येतो. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांवर आधारित कथा विद्यार्थ्यांना इतिहासाशी जोडतात. सी. व्ही. रमण यांच्या वैज्ञानिक कार्यावर आधारित कथा विज्ञानविषयक जिज्ञासा निर्माण करतात. ‘अशी लिहावी कथा’ या पुस्तकात केवळ सैद्धांतिक माहिती दिलेली नाही. सुमारे तीस उदाहरणे आणि विविध कृतींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लेखनाचा सराव करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. कोणतीही कला केवळ वाचून आत्मसात होत नाही; त्यासाठी सातत्याने कृती आणि सराव आवश्यक असतो. ही बाब लेखिकेने अचूकपणे ओळखली आहे. उदाहरणांमुळे विद्यार्थ्यांना कथालेखनाची दिशा समजते आणि कृतींमुळे त्यांना स्वतः लिहिण्याची संधी मिळते. शिक्षक या पुस्तकाचा वापर वर्गातील उपक्रमांसाठी करू शकतात. पालक मुलांना घरच्या घरी कथा लिहिण्यासाठी प्रोत्साहित करू शकतात. त्यामुळे हे पुस्तक विद्यार्थ्यांसोबतच शिक्षक आणि पालकांसाठीही उपयुक्त ठरते. चांगला लेखक होण्यासाठी चांगला वाचक होणे आवश्यक आहे. वाचनामुळे शब्दसंपत्ती वाढते, विचारविश्व समृद्ध होते आणि वेगवेगळ्या जीवनानुभवांची ओळख होते. कथा लेखनासाठी केवळ कल्पनाशक्ती पुरेशी नसते; त्याला वास्तवातील निरीक्षणाची जोडही असावी लागते. लेखिकेने विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लावण्याचा संदेश दिला आहे. आजच्या डिजिटल युगात मुले मोबाईल, इंटरनेट आणि विविध दृश्य माध्यमांमध्ये अधिक वेळ घालवतात. या परिस्थितीत पुस्तक वाचन, आजूबाजूच्या घटनांचे निरीक्षण आणि अनुभवांचे लेखन यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील माणसे, निसर्ग, घटना, समस्या आणि भावभावना यांचे बारकाईने निरीक्षण केले, तर त्यांच्या कथांना अधिक वास्तवता आणि परिणामकारकता प्राप्त होईल. आरती लाटणे यांच्या लेखनातून त्यांच्या शिक्षक म्हणून असलेल्या अनुभवाची जाणीव होते. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना सोप्या भाषेत मार्गदर्शन करणे, हा या पुस्तकाचा आत्मा आहे. लेखिकेने विद्यार्थ्यांना केवळ चांगले गुण मिळविण्यासाठी कथा लिहायला शिकवलेले नाही, तर त्यांच्या विचारांना आणि भावनांना अभिव्यक्ती देण्याचा प्रयत्न केला आहे. कथा लेखनातून विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता, सर्जनशीलता, आत्मविश्वास, भाषिक कौशल्य आणि नैतिक मूल्ये विकसित होऊ शकतात. एखाद्या पात्राच्या भूमिकेत शिरताना विद्यार्थी दुसऱ्याच्या भावना समजून घेऊ लागतो. एखादा संघर्ष मांडताना तो समस्येकडे वेगळ्या दृष्टीने पाहतो. त्यामुळे कथा लेखन हे व्यक्तिमत्त्व घडविणारे प्रभावी माध्यम ठरते. एकूणच ‘अशी लिहावी कथा’ हे केवळ कथा लेखन शिकवणारे पुस्तक नसून, उद्याच्या संवेदनशील, कल्पक आणि विचारशील पिढीच्या निर्मितीसाठी केलेला एक अर्थपूर्ण शैक्षणिक प्रयत्न आहे. - दिलीप भोसले
Read More