साहित्य हे केवळ शब्दांचे संकलन नसते, तर ते अनुभवांना अभिव्यक्ती देणारे, विचारांना दिशा देणारे आणि संवेदनशील मनाची जडणघडण करणारे प्रभावी माध्यम असते. विशेषतः बालसाहित्यामध्ये कल्पनाशक्ती, संस्कार, मूल्यशिक्षण आणि सर्जनशील विचार यांचा सुंदर मिलाफ झाला, तर त्यातून मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला मोठी चालना मिळते. याच दृष्टिकोनातून प्राथमिक शिक्षिका आणि शब्दांशी मनापासून रमणाऱ्या सौ. आरती अनिल लाटणे यांनी लिहिलेले ‘मी बोलतोय/बोलतेय’ हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी एक अनोखा, प्रेरणादायी आणि विचारसमृद्ध ठेवा ठरते. या पुस्तकामध्ये निर्जीव वस्तू, नैसर्गिक घटक, सामाजिक वास्तव आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना बोलते केले आहे. विद्यार्थ्यांनी एखाद्या वस्तूच्या किंवा व्यक्तीच्या भूमिकेत स्वतःला कल्पून स्वगत व्यक्त करावे, त्यातून विचार करावा आणि आपली अभिव्यक्ती विकसित करावी, हा या पुस्तकामागील मूलभूत हेतू आहे. त्यामुळे हे पुस्तक केवळ स्वगत लेखनाचे मार्गदर्शन करत नाही, तर मुलांना जगाकडे नव्या आणि संवेदनशील दृष्टीने पाहण्याची संधी देते. ‘आधी केले मग सांगितले’ ही उक्ती लेखिकेच्या कार्यपद्धतीला अत्यंत समर्पक ठरते. विद्यार्थ्यांना स्वगत कसे लिहावे, एखाद्या विषयात शिरून त्याचा अनुभव कसा व्यक्त करावा आणि विचारांना साध्या, सोप्या भाषेत कसे मांडावे, याचे मार्गदर्शन करण्यापूर्वी लेखिकेने स्वतः लेखनाचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे या पुस्तकातील मार्गदर्शन हे केवळ सैद्धांतिक स्वरूपाचे नसून प्रत्यक्ष अनुभवातून आलेले आहे. स्वगत लिहिताना लेखकाने स्वतःला त्या पात्राच्या जागी ठेवणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, एखादा रस्ता बोलत असेल, तर त्याने पाहिलेल्या माणसांचे जीवन, प्रवासातील बदल, अपघात, विकास आणि दुर्लक्ष यांविषयी तो बोलला पाहिजे. नदी बोलत असेल, तर तिच्या प्रवाहाबरोबरच प्रदूषण, पाणीटंचाई, पूर आणि मानवी हस्तक्षेप यांचा विचार केला पाहिजे. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना विषयाचा केवळ बाह्य परिचय होत नाही, तर त्यामागील भावविश्व आणि सामाजिक संदर्भही समजतो. मुलांवर संस्कार करणे म्हणजे त्यांच्या मनात कालबाह्य रूढी, अंधश्रद्धा किंवा निरर्थक घोकंपट्टी भरणे नव्हे. खरे संस्कार म्हणजे मुलांना नीती-अनीतीची जाणीव करून देणे, जीवनमूल्यांची ओळख करून देणे आणि तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता विकसित करणे होय. आरती लाटणे यांच्या वीस मनोगतांमध्ये हा विचार प्रभावीपणे प्रतिबिंबित होतो. पुस्तक, मोबाईल, पाटी-पेन्सिल, महापूर, शेवटचा बेंच, तोटी, पक्की सडक, पूरग्रस्त बालिका, सरकारी शाळा आणि इमारत अशा विषयांमधून मुलांना दैनंदिन जीवनातील वस्तू आणि घटनांकडे वेगळ्या नजरेने पाहता येते. या विषयांमध्ये केवळ कल्पनारंजन नाही, तर सामाजिक वास्तवाचे भान आहे. मोबाईल बोलताना तो ज्ञानाचे साधन कसा बनू शकतो आणि त्याचा अतिरेक कसा घातक ठरू शकतो, हा विचार मांडता येतो. शेवटचा बेंच विद्यार्थ्यांच्या दुर्लक्षित भावविश्वाचा प्रतिनिधी ठरू शकतो. सरकारी शाळा ग्रामीण आणि सामान्य कुटुंबातील मुलांच्या स्वप्नांची साक्षीदार बनते. अशा मनोगतांमधून मुलांच्या मनात सहानुभूती, जबाबदारी आणि सामाजिक जाणीव निर्माण होण्यास मदत होते. या पुस्तकाचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे लेखिकेने सामान्य आणि परिचित वस्तूंना विचारशील आणि भावनिक आवाज दिला आहे. आपण रोज वापरत असलेल्या वस्तूंकडे अनेकदा केवळ उपयोगाच्या दृष्टीने पाहतो. परंतु त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी, श्रम, संघर्ष आणि सामाजिक अर्थाकडे दुर्लक्ष होते. पाटी-पेन्सिल ही विद्यार्थ्यांच्या शिक्षणप्रवासाची सुरुवात दर्शवतात. रस्ता हा गावागावांना जोडणारा, माणसांच्या सुख-दुःखाचा साक्षीदार असतो. नदी जीवन देते; पण तिच्यावर होणारे प्रदूषण आणि अतिक्रमण तिच्या अस्तित्वाला धोका निर्माण करतात. इमारत शिक्षण, आश्रय, विकास आणि कधी कधी उपेक्षेची कहाणी सांगते. या वस्तूंना बोलते करताना लेखिकेने विद्यार्थ्यांना निरीक्षणशक्ती विकसित करण्याची संधी दिली आहे. एखादी वस्तू काय सांगेल, तिच्या मनात कोणते प्रश्न असतील, ती माणसांकडे कशा नजरेने पाहत असेल, याचा विचार करताना मुलांची कल्पनाशक्ती विस्तारते. या प्रक्रियेतून लेखन कौशल्याबरोबरच भावनिक बुद्धिमत्तेचाही विकास होतो. पुस्तकातील महापूर आणि पूरग्रस्त बालिकेचे मनोगत विशेष उल्लेखनीय ठरते. नैसर्गिक आपत्ती ही केवळ बातमी किंवा आकडेवारी नसते; तिच्यामागे अनेक कुटुंबांचे उद्ध्वस्त जीवन, हरवलेली स्वप्ने आणि असहाय्यतेचा संघर्ष दडलेला असतो. पूरग्रस्त बालिकेच्या मनोगतातून विद्यार्थ्यांना आपत्तीच्या मानवी परिणामांची जाणीव होऊ शकते. घर, शाळा, पुस्तके, मित्रमैत्रिणी आणि सुरक्षित बालपण गमावलेल्या मुलांच्या वेदना समजून घेण्याची संवेदनशीलता निर्माण होऊ शकते. अशा लेखनामुळे विद्यार्थ्यांना केवळ सहानुभूती वाटत नाही, तर पर्यावरण संवर्धन, आपत्ती व्यवस्थापन आणि सामाजिक सहकार्याचे महत्त्वही कळते. या पुस्तकातील राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, बहिणाबाई चौधरी, कल्पना चावला, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, रवींद्रनाथ टागोर आणि बालगंधर्व यांची मनोगते विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरतात. या व्यक्तिमत्त्वांनी आपल्या कार्यातून धैर्य, शिक्षण, ज्ञान, राष्ट्रप्रेम, सर्जनशीलता आणि संघर्षशीलतेचे दर्शन घडवले. त्यांच्या जीवनाचा परिचय केवळ माहिती म्हणून न राहता, त्यांच्या स्वतःच्या आवाजातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे. त्यामुळे इतिहासातील आणि समाजातील व्यक्ती अधिक जवळच्या वाटतात. सावित्रीबाई फुले बोलताना शिक्षणाचा अधिकार आणि स्त्री-मुक्तीचा संघर्ष सांगू शकतात. राणी लक्ष्मीबाई धैर्य आणि स्वाभिमानाची प्रेरणा देऊ शकतात. कल्पना चावला विद्यार्थ्यांना आकाशाच्या पलीकडे स्वप्ने पाहण्याचे बळ देऊ शकतात. बहिणाबाई चौधरींच्या मनोगतातून ग्रामीण जीवन, श्रम आणि लोकभाषेचे सौंदर्य अनुभवता येते. अशा मनोगतांमधून विद्यार्थ्यांना यश म्हणजे केवळ प्रसिद्धी नव्हे, तर संघर्ष, सातत्य आणि समाजासाठी केलेले योगदान आहे, हे समजते. आज विद्यार्थ्यांसाठी अनेक पुस्तके उपलब्ध असली तरी निबंध, भाषण, उतारे किंवा स्वगत लिहिताना अनेक विद्यार्थी गोंधळतात. विषय समोर असतो; पण सुरुवात कशी करावी, विचारांची मांडणी कशी करावी, परिच्छेद कुठे घ्यावा आणि शेवट प्रभावी कसा करावा, याबाबत त्यांना मार्गदर्शनाची गरज असते. ‘मी बोलतोय/बोलतेय’ या पुस्तकामध्ये लेखिकेने या सर्व बाबींचा विचार केला आहे. विषयाची सुरुवात, आशयाची क्रमबद्ध मांडणी, योग्य शब्दांची निवड, परिच्छेदांची रचना आणि प्रभावी समारोप यांचे मार्गदर्शन पुस्तकातून मिळते. भाषा साधी, सोपी आणि विद्यार्थ्यांना सहज आत्मसात करता येईल अशी आहे. त्यामुळे हे पुस्तक प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरते. या पुस्तकाचे वाचन केल्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही विषयावर विचार करण्याची आणि तो स्वतःच्या शब्दांत व्यक्त करण्याची सवय लागेल. पाठांतरावर अवलंबून न राहता स्वतःची मते, भावना आणि निरीक्षणे मांडण्याचा आत्मविश्वास नक्कीच निर्माण होईल. त्यामुळेच हे पुस्तक म्हणजे, विद्यार्थ्यांच्या मनात विचारांची बीजे पेरून त्यांना सर्जनशील, संवेदनशील आणि विवेकी नागरिक बनविण्याच्या दिशेने टाकलेले एक अर्थपूर्ण पाऊल आहे. -दिलीप भोसले
Read More