जेव्हा सांस्कृतिक संचित माणसाचे रूपांतर गुलामीत करते, तेव्हा इतिहास बदलला जातो. वास्तवातील अनेक सत्ये दडपली जातात. अशी इतिहासातील सत्ये शोधून काढणे हे प्रतिभावंतापुढे आव्हान असते. त्यासाठी अफाट वाचन व सूक्ष्म निरीक्षण आवश्यक असते. कमालीची संवेदनशीलता, चौफेर वाचन व आंबेडकरी विचारावरील निष्ठा ही तर बा.ना. धांडोरे यांच्यासारख्या प्रतिभावंताची खरी ओळख आहे. दैन्य, दारिद्र्य, भूक, उपासमार, अवहेलना, अगतिकता हे सारे बाजूला ठेवून इतिहासातील महारांचे शौर्य, पराक्रम त्यांनी शोधून काढले आहेत. त्यांनी हे काम राजहंसासारखे केले आहे. ऐतिहासिक सत्याला धक्का न लागता त्यांचे पराक्रम कथेच्या चौकटीत बसवले आहेत. दलित साहित्यात हे प्रथमच घडते आहे. एक नवीनच पाऊलवाट या प्रतिभावंताने निर्माण केली आहे. एवढेच नव्हे तर एकूणच साहित्याला त्यांनी नवे परिमाण दिले आहे. - प्रा. डॉ. वामन जाधव