इतिहास म्हणजे सत्याचा शोध. काल्पनिक तथा रंजक घटनांचे त्याला वावडे असते. काही संशोधक इतिहासाची मोडतोड करून स्वतःला इतिहास संशोधक म्हणून गोंजारीत असतात. आयु. बा. ना. धांडोरे सत्याचा शोध घेऊन मांडणी करतात. उपेक्षित बहुजन समाजातील विरांचा पराक्रम आतापर्यंत दडपलेला होता. तो प्रकाशात आणण्याचे काम त्यांच्या 'नागवंश' ह्या कथासंग्रहात केलेले आहे. कोठेही भावनावश न होता सत्यालाप करीत नाहीत. तीच गोष्ट 'माणसातला राजा' राजर्षी शाहू महाराज ह्या छोटेखानी ग्रंथातही दिसून येते. भारतभूवर सम्राट अशोक, सम्राट हर्षवर्धन, छत्रपती शिवाजी महाराज, छ. राजर्षी शाहू महाराज आदी प्रजाहित दक्ष लोककल्याणकारी राजे होऊन गेले आहेत. त्यांचा इतिहास सदैव प्रेरणादायी, स्फूर्तिदायकच आहे. राजर्षी शाहू महाराज सामान्यातल्या सामान्य माणसाला उपेक्षित बहुजनांना आपले का वाटतात ? तर त्यांनी राजेपणाचा अवडंबर न मांडता जनतेच्या सुखदुःखात सहभागी झाले. वंचितांना जवळ केले. त्यांना उमेद दिली. त्यांच्या अंतःकरणात महाराजांविषयी मोठे स्थान आहे. हेच सदर संग्रहातल्या वेगवेगळ्या कथांतून जाणवते. आगळा वेगळा 'माणसातला राजा' ही उपाधी त्यांना उगाच दिलेली नाही. योगीराज वाघमारे ज्येष्ठ साहित्यिक, सोलापूर