पानकणीस च्या निमिताने. बालाघाटाच्या कडाकपाऱ्यातून ओघळणाऱ्या पाण्याचं निखळ नातं जपत काळ्या वावराशी इमान राखून प्रबुद्ध विचारांच्या समतावादी चळवळीशी बांधिलकी जपून प्रस्थापितांच्या आणि सनातनी प्रवृत्तीच्या मुळावर घाव घालणारे माझे साहित्यीक बंधू रविंद्र शिंदे यांच्या 'पानकणीस' काव्यसंग्रहाच्या निमित्ताने दोन शब्द स्मृतीशेष प्रशांतकुमार शिंदे यांच्या जन्मदिनाच्या स्मरणार्थ हे तिसरे साहित्यपुष्प वाहिले आहे. परिवर्तनाच्या चक्राला गती मिळावी हा मुळ उद्देश प्रमाण मानून प्रज्ञासुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीची बांधिलकी जपण्याचा स्तुत्य उपक्रम म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कवी रविंद्र शिंदे दुःखितांचे दुःखवले झेलणारा पलिता आहे. उगीच कुणास सलाम ठोकणारा नाही. हरहुन्नरी, प्रतिभावंत आहे कृषिप्रधान देशामध्ये जेव्हा वास्तवातल्या गोष्टी हृदयाच्या स्पंदनावर हात ठेवून, आत्मभान ठेवून साहित्य अपत्याला जन्म देतो. त्यामागे त्यागाची किनार असते तशीच भावुकता आणि ऋणानुबंध असतात. काळ्या वावराच्या गर्भारपणाची वेदना 'पानकणीस' मधून उठते, याची दखल माझ्यासारख्या समिक्षक समाजमित्राने घेतली आहे. कथाकार म्हणून त्यांचा 'तिवडा' कथासंग्रह वाचला, तो खुप भावला. जीवन जगण्याचे यथार्थ दर्शन त्यातून झाले आहे. कवी रविंद्र शिंदे फक्त शासकिय सेवेत लेखाजोख्याचा ताळेबंद मांडीत नाहीत तर वास्तवात भरडली जाणारी शेळ्यामेंढ्यासारखी माणसे, शेतकरी, शेतमजूर इ. च्या जीवनाचा व वेदनेचे वास्तव चित्रण करून ताळेबंद मांडतात. बळीराज्याच्या घर्मबिंदुचे उगवलेलं पानकणीस, तृणपाण्यातून पोटरीच्या वर येतानाचा आनंद आहे जो नित्यनियमाने गुंजारव करीत डंख मारण्याऱ्या मुग्यांचा नसून परिमळाचा आहे. राबराब राबलेल्या लडिवाळ हाताचा स्पर्श नामशेष झालेल्या स्मृतीत आणताना साकाळलेले मनातले भाव आन् राखणीला आलेलं शेत पाखरांनी खाऊ नये म्हणून पापण्याच्या आडून कटाक्ष टाकणारा आटोळ्यावरचा राखणदार कवी रविंद्र शिंदे यांच्या पानकणसातून जाणवतो लाचारी, विषमता, शोषण, गरीबी, कुपोषण, भुकबळी अशा भेदांच्या भिंती नेस्तनाबुत करणाऱ्या महामानवाच्या निळ्या दिंडीत स्मृतीशेष प्रशांतकुमार शिंदे यांची राजहंसी पताका फडकत राहील अशी मला आशा वाटते. आपल्या हातून प्रबोधन, परिवर्तनाची चळवळ, बहुजनांच्या भल्यासाठी रूजत राहील याची शाश्वती वाटते. रविंद्र शिंदे यांची नवसमाज रचनेच्या संघर्षातील चिंतनाच्या वाटेने जाणारी पायवाट, समतेच्या महामार्गाने जाईल याची मला खात्री वाटते. कवी तात्यासाहेब सोनवणे (जागल्या) बदलापूर, जि. ठाणे