आंबेडकरी कथा प्रांतात रुळलेले जयराज खुने आता पहिल्यांदाच 'मी माझ्या भूमीच्या शोधात' या कवितासंग्रहाद्वारे काव्य प्रांतात दाखल होत आहेत. मी प्रारंभीच त्यांचे मनःपूर्वक स्वागत करतो. "लेखणी मुक्त केली बाबांनी, ती लिहितेच नवं, फाडतेय जुनं इतिहासाचं पान, उद्याच्या उज्ज्वल पिढीसाठी," असा नवऊर्जास्रोत घेऊन ही कविता प्रकाशपुंज झाली आहे. गतानुगतीकतेची वादळं पचवून व्यवस्थेनं उभारलेल्या जातीजातींच्या भिंती ती उद्ध्वस्त करू पाहते. नामांतर लढ्यातील शहिदांच्या आत्मसमर्पणाच्या खुणा अंतरात जपत आंबेडकरी चळवळीतील गटबाजीवर ही कविता आसूड ओढते. हे सर्व गुलाम घोडेबाजाराला हाकले पाहिजेत अन् सर्वांनी सर्वांसह हा रथ ओढला पाहिजे, अशी तिची प्राज्ञा आहे. "निखाऱ्यानं निखारा पेटावा तसा, इथला प्रत्येक शब्द पेटतोय, विषमता जाळण्यासाठी" असा बुलंद आत्मविश्वास घेऊन व्यवस्था विध्वंसाला ती सिद्ध होताना दिसते. विचाराचं शस्त्र घेऊन परिवर्तनाच्या चळवळीत लढणाऱ्या सैनिकासारखी तिची जिद्द आहे. बुद्ध, फुले, शाहू अन् आंबेडकरी विचारांचा आदर्श हा या कवीचा ध्येयपथ असल्याने "माझा शब्द... दडपलेल्या काळजातला हुंकार" आहे. अशा अस्मितेचा जळजळीत उद्गार म्हणजे जयराज खुने यांची कविता होय. "मी पाहतोय... विस्तीर्ण पसरलेले निळे आकाश तथागतासारखा शांतीचा संदेश देताना..." कारण प्रज्ञेचं बी, शीलाचं पाणी, करुणेचं खत घालून या कवीला नवं जेतवन फुलवायचं आहे. "निघालो आहे देश आणि माझ्या उज्ज्वल भविष्यासाठी, मुक्तीदात्यानं दाखविलेल्या दिशेने" असा निळ्या उजेडाचा आत्मलक्षी आशावाद पेरणारी ही कविता म्हणूनच लक्षणीय ठरेल, यात शंका नाही. जयराज खुने यांचा काव्यप्रवास अधिक समृद्ध होवो ह्याच सम्यक शुभेच्छा... - रविचन्द्र हडसनकर