कथाप्रकारात मान्यता पावलेले जयराज खुने यांनी कथेबरोबरच कविता, स्वकथन, समीक्षा, व्यक्तिचित्रण असे विविध साहित्य प्रकार हाताळले असून आंबेडकरी विचार शोध आणि जाणिवा या ग्रंथाच्या माध्यमातून वैचारिक वाड्मय क्षेत्रातही पदार्पण करत आहेत. त्याबद्दल त्याचे अभिनदन..! जयराज खुने यांचे आंबेडकरी विचार, बुद्ध तत्वज्ञान, भारतीय लोकशाही, साहित्य, समाज, संस्कृती व जातीय राजकारण, पक्ष, संघटना, शिक्षण व आरक्षण नीती इ. चिंतनाचे विषय असून सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून या विषयावर सदर ग्रंथातून चर्चा करण्यात आलेली आहे. भारतीय स्वातंत्र्य, हैदराबाद मुक्तिसंग्राम, मराठवाड्याचा विकास, झालेली विविध आंदोलने, स्वतंत्र भारतातील आरक्षण निती व एकूणच देशाच्या जडणघडणीतील बाबासाहेबांचे योगदान अगदी अभ्यासपूर्ण विश्लेषणातून, साधार जयराज खुने यांनी या ग्रंथातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रबुद्ध समाज निर्मितीसाठी निर्माण केलेल्या सामाजिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक व संरक्षण इ. संघटना आज मोडकळीस आल्याने बौद्ध समाज दुर्बल होत असल्याची खंत लेखक व्यक्त करतात व सर्वांना भीमपथावरून वाटचाल करण्याचे आवाहनही करतात. जयराज खुने यांनी बौद्ध समाजाच्या स्थिती गतीचे वास्तव मुलगामी - पद्धतीने व विश्लेषणात्मकपणे मांडले असून आंबेडकरी विचार शोध आणि जाणिवा या वैचारिक ग्रंथातून आविष्कृत झालेल्या विचाराचा फायदा वाचक, अभ्यासकांना नक्कीच होईल, असा सार्थ विश्वास वाटतो. प्रा.डॉ.सी.डी. कांबळे मराठी विभागप्रमुख सी.बी. खेडगीज कॉलेज, अक्कलकोट जि. सोलापूर.