'माणूस महान' हे तत्त्व आणि तत्त्वज्ञान आंबेडकरी तत्त्वज्ञानाने अनेकांनेकानी आत्मसात केल्यानंतर माणूसपणाचं गाणं गाणाऱ्या अनेकांनी येथे शब्दसंगर पेटता ठेवला. बाबासाहेबांच्या स्वातंत्र्य-समता-बंधुता आणि न्याय या तत्त्वज्ञानाने शोषितांची मने सुसंस्कारित झाल्यानंतर आपणच जग हे मरणप्राय-यातनामय कसे आहे हे कळू लागले आणि साक्षात - प्रत्यक्षात अनुभवलेल्या जीवनाविषयी हे 'ब्रोकन मॅन' बोलू लागले. यातूनच स्वशक्तीचा आत्मस्वर त्याच्या साहित्यातून उमटू लागला. या आत्मकथेचे लेखक जयराज खुने यांच्याच भाषेत बोलायचे झाले तर 'भूक आणि स्वाभिमान' असा दुहेरी संघर्ष करीत माणसं जगू लागली. या जगण्याच्या व्यथा-कथा- कहाण्या जीवन जाणिवा बनल्या. या जाणिवेची एक कहाणी म्हणजे जयराज खुने यांचे 'स्वत्वसंगर' हे आत्मकथन होय. - डॉ. संपत गायकवाड