साहित्य हे समाजाचा आरसा असते, आणि त्याच्या माध्यमातून विचार, भावना आणि संस्कारांची देवाणघेवाण केली जाते. रूपककथा हा साहित्यप्रकार याच हेतूने अधिक प्रभावी ठरतो. मराठी साहित्यात वि. स. खांडेकर यांनी या प्रकाराला विशेष मान्यता मिळवून दिली. वृंदा कांबळी यांचा "अस्तित्व असेही" हा कथासंग्रह कथा आणि रूपककथांचा अद्वितीय मिलाफ आहे. या कथासंग्रहातील प्रत्येक कथा समाजाच्या विविध पैलूंना उजाळा देणारी आहे. कथा आणि रूपककथा या दोन्ही साहित्यप्रकारांमध्ये काही मूलभूत फरक आहेत. सामान्य कथेत पात्रे, घटना आणि कथानक यांचा मुख्य भर असतो. यात व्यक्तिरेखांच्या मनोव्यापाराचा सखोल अभ्यास केला जातो, तर रूपककथा ही प्रामुख्याने सूचक आणि प्रतीकात्मक असते. कथांचा मुख्य उद्देश वाचकाचे मनोरंजन आणि त्याच्या भावविश्वाला स्पर्श करणे असतो, तर रूपककथांमध्ये तत्वज्ञान, नीतिमूल्ये आणि जीवनाच्या मूलभूत सत्यांचे दर्शन घडवले जाते. कथा तुलनेने सरळ भाषेत सांगितली जाते, तर रूपककथा काव्यात्मक आणि गूढ शैलीतून साकारली जाते. कथेमध्ये पात्रे माणसांच्या रूपात असतात, तर रूपककथांमध्ये प्राणी, पक्षी, झाडे, निर्जीव वस्तू यांना मानवी स्वभाव आणि भावना दिल्या जातात. कथा आणि रूपककथा हे दोन्ही साहित्यप्रकार वेगवेगळ्या गरजांसाठी महत्त्वाचे आहेत. कारण मनोरंजन, अनुभवांची मांडणी, भावनिक गुंतवणूक, व्यक्तिरेखांचे जिवंत चित्रण हे कथांचे वैशिष्ट्य आहे. सामाजिक प्रश्न, मानसिकतेचे विविध पैलू, जीवनातील घटनांचे विश्लेषण यासाठी कथा प्रभावी ठरते. तर लहानशा गोष्टीतून मोठा आशय मांडायचा असल्यास रूपककथा हे प्रभावी साधन आहे. जीवनातील विसंगती, तत्त्वज्ञान, मूल्यबोध आणि गहन विषय मांडण्यासाठी रूपककथा अधिक योग्य ठरते. "अस्तित्व असेही" हा कथासंग्रह केवळ मनोरंजन करणारा नाही, तर तो वाचकाला अंतर्मुख करणारा आहे. यातील कथा आणि रूपककथांमधून साहित्य, कला, समाज, तत्वज्ञान आणि मानवी प्रेरणांचा वेध लेखिका वृंदा कांबळी यांनी अतिशय मार्मिकपणे घेतलेला आहे. यांच्या या कथासंग्रहाला वाचक निश्चितच उत्स्फूर्त प्रतिसाद देतील अशी अपेक्षा आहे.