साहित्य हे केवळ करमणुकीचे साधन नसून, ते समाजाच्या विविध थरांत घडणाऱ्या घटना, व्यथा, संघर्ष आणि आशयघनतेची जाणीव करून देणारे प्रभावी माध्यम आहे. वृंदा कांबळी लिखित ‘प्राक्तनरंग’ या लघुकादंबरी संग्रहात अशाच दोन वेगळ्या, पण अंतर्बाह्य एकमेकांशी जोडल्या गेलेल्या कथा आहेत. एकीकडे ग्रामीण भागातील नाट्यकलावंताच्या संघर्षमय जीवनाची झलक आपल्याला पहायला मिळते, तर दुसरीकडे एक संवेदनशील लेखक आपल्या अस्तित्वासाठी कसा लढा देतो आणि त्या लढ्यात कसा हरवतो, याचे सूक्ष्म चित्रण पाहायला मिळते. प्रत्येक कलेच्या मागे असणारी कठीण साधना, कलाकाराच्या मनातील भावनिक आंदोलन, त्याच्या जगण्याच्या वेदना आणि संघर्षाचे कटू सत्य या कादंबऱ्यांमधून उलगडले आहे. एका बाजूला नाट्यक्षेत्रातील उपेक्षित कलावंताची वेदना आहे, तर दुसरीकडे लेखनसृष्टीत टिकून राहण्यासाठी धडपडणाऱ्या लेखकाचे अपयश आहे. दोन्ही कादंबऱ्या मानवी भावनांच्या गहिऱ्या छटा दाखवतात आणि प्रेक्षक वा वाचक यांच्या अपेक्षांसाठी झगडणाऱ्या कलाकाराच्या जीवनावर प्रकाश टाकतात. कला ही जीवनाचा अविभाज्य भाग आहे, पण त्या कलेच्या मागे असलेला कलाकार मात्र अनेकदा दुर्लक्षित आणि उपेक्षित राहतो. ‘प्राक्तनरंग’ ही कादंबरी ग्रामीण नाट्यकलावंतांच्या आयुष्यावर प्रकाश टाकते. "इतरांच्या मुखांना रंग लावणारा कलाकार स्वतःच्या आयुष्यात दुःखाचा गडद रंग सहन करतो," ही संकल्पना खूप प्रभावीपणे येथे मांडली आहे. नाना जोशी हा एक प्रतिभावान ग्रामीण नाट्यकलावंत आहे. तो आपल्या साध्या सरळ स्वभावाने आणि नाट्यक्षेत्रातील निष्ठेने जीवन जगतो. त्याच्या आयुष्याची कहाणी उलगडताना लेखिकेने संवाद तंत्राचा प्रभावी वापर केला आहे. संवाद हे केवळ पात्रांच्या तोंडून निघणारे शब्द नसून, ते त्यांच्या भावनांचे, संघर्षाचे आणि वेदनेचे प्रतिबिंब असते. नाना जोशीच्या जीवनकहाणीतून एक व्यापक वास्तव अधोरेखित होते. कलाकार हा समाजाला आनंद देतो, मनोरंजन करतो, त्याच्या कलेने लोकांचे जीवन समृद्ध करतो, पण स्वतः मात्र आर्थिक, सामाजिक आणि मानसिक संकटांमध्ये सापडतो. त्याचा त्याच्या कलेवरील प्रचंड विश्वास आणि त्याची त्यागभावना या गोष्टींमुळे त्याला कित्येक संकटांना सामोरे जावे लागते. कादंबरीत छबी आणि वरुणराजा ही दोन महत्त्वाची पात्रे आहेत, जी नानाच्या जीवनाशी जोडलेली आहेत. त्यामुळे कथानक तीन स्तरांवर उलगडत जाते. नानाच्या आयुष्याच्या संघर्षाची कथा, छबीच्या नजरेतून बघितलेली त्याची भावना, आणि वरुणराजाच्या दृष्टिकोनातून समोर आलेले समाजाचे वास्तव. कला हे सुखद जीवनाचे माध्यम असले, तरी त्यात जगणारे कलाकार मात्र दु:खाच्या गर्तेत लोटले जातात. नाना जोशीसारख्या नाट्यकलावंतांना समाजात विशेष स्थान मिळत नाही. त्यांनी रंगभूमीवर केलेले योगदान जितके महत्त्वाचे असते, तितकीच त्यांच्या आयुष्याची दैन्यता जाणवते. "तुम्ही रंगमंचावरचा अभिनय पाहता, पण आमच्या जीवनातील वास्तव पाहत नाही," ही त्यांची खंत लेखिकेने खूप प्रभावीपणे मांडली आहे. समाजातील हा विरोधाभास, कलाकाराच्या प्रतिभेची आणि त्याच्या उपेक्षित जीवनाची वेगळी बाजू. कादंबरीत ठळकपणे अधोरेखित केली आहे. ‘उदयास्त’ ही कादंबरी एका लेखकाच्या अस्तित्वासाठी चाललेल्या संघर्षाची कहाणी आहे. लेखन ही केवळ कला नसून, ती आत्मशोध आणि आत्मअभिव्यक्तीचे साधन आहे. पण लेखन करताना लेखकाला फक्त स्वतःपुरते जगता येत नाही; त्याला समाज, वाचक, साहित्यविश्व यांची दखल घ्यावी लागते. लेखक लिहितो तेव्हा त्याला स्वतःच्या अंतःकरणात साठलेल्या भावना, विचार आणि अनुभव शब्दांत उतरवायचे असतात. पण या संघर्षात त्याला अनेकदा स्वतःशी झगडावे लागते. लेखकासाठी सर्वात मोठी अडचण म्हणजे त्याच्या कलेसाठी मिळणारी मान्यता आणि प्रसिद्धी. कादंबरीत दाखवलेले वास्तव हे अत्यंत कटू आहे. लेखनशैली कितीही चांगली असली, संवेदनशील विचार कितीही गहिरा असला, तरी प्रकाशनविश्वात यश मिळवण्यासाठी बाजारूपणा आवश्यक ठरतो. आजच्या स्पर्धात्मक युगात प्रसिद्धीच्या मोहात पडलेला लेखक कधी संवेदनशीलतेपासून दूर जातो, तर कधी अपेक्षित प्रसिद्धी मिळाली नाही, म्हणून निराश होतो. आजच्या काळात वाचकांच्या बदलत्या अभिरुचीमुळे अनेक लेखक अडचणीत सापडतात. लोकांना हलकंफुलकं, मनोरंजनात्मक लेखन आवडतं, तर गहिरे, विचारप्रवर्तक साहित्य दुर्लक्षित केलं जातं. यामुळे लेखकाला स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न भेडसावतो. "मी लिहितोय, पण कुणासाठी?" हा प्रश्न लेखकाला सतावत राहतो. जर त्याची कलाकृती लोकांपर्यंत पोहोचत नसेल, तर तो नाउमेद होतो. या संघर्षातून काही लेखक चुकीच्या मार्गाने जातात. साहित्याच्या दर्जाकडे दुर्लक्ष करून फक्त प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात. याचा परिणाम म्हणजे साहित्याचा आत्मा हरवतो आणि संवेदनशील लेखकाचा अस्त होतो. ‘उदयास्त’ मध्ये मृत लेखकाच्या स्मृतींशी त्याच्या परमप्रिय मित्राने केलेला संवाद हा कादंबरीचा विशेष पैलू आहे. हा संवाद केवळ लेखकाचा मृत्यू दाखवत नाही, तर एका युगाचा अंत दर्शवतो. जिथे संवेदनशीलता हळूहळू नष्ट होत चालली आहे. वृंदा कांबळींच्या ‘प्राक्तनरंग’ या लघुकादंबरी संग्रहाने नाट्यक्षेत्र आणि साहित्यविश्वातील दोन महत्त्वाचे विषय हाताळले आहेत. कलाकार आणि लेखक या दोघांच्या संघर्षमय जीवनाचे वास्तव. ‘प्राक्तनरंग’ नाट्यक्षेत्रातील अभावग्रस्त कलाकारांचे जीवन उलगडते, तर ‘उदयास्त’ साहित्यविश्वातील लेखकाच्या अस्थिर भविष्याचे वास्तव दाखवते. दोन्ही कादंबऱ्या एकाच तत्त्वावर आधारलेल्या आहेत. "कलेच्या जगात कलाकाराची किंमत त्याच्या कलेसाठी असते, पण त्याच्या जीवनासाठी नाही." या कथा वाचकांना अंतर्मुख करतात. समाजाने कलाकार आणि साहित्यिक यांच्याकडे अधिक संवेदनशीलतेने पाहायला हवे, हा संदेश या पुस्तकातून प्रभावीपणे पोहोचतो. लेखिकेने संवाद तंत्राचा उत्तम उपयोग करून ह्या दोन कहाण्या रेखाटल्या असून, या कादंबऱ्या वाचकांच्या मनात कायमस्वरूपी उमटणारा ठसा उमटवतात.