Lekhaniche Zhare

Lekhaniche Zhare


Book Preview


₹80.00 ₹100.00
Price in USD: $0.94

साहित्य हे समाजाचा आरसा असते. जीवनातील अनुभवांचे चिंतन, अंतःकरणातील भावनांचा ओघ आणि वैचारिक प्रगल्भता यांचा समन्वय म्हणजे उत्तम साहित्य. सौ. सुरेखा कांबळे यांच्या 'लेखनीचे झरे' या ललित लेखसंग्रहात याच साहित्यिक मूल्यांचा सुंदर संगम पहायला मिळतो. वाचन, चिंतन, स्वानुभव आणि वैचारिक सखोलतेच्या आधारे साकारलेल्या या संग्रहाचे प्रत्येक पान एका नवनवीन विचारप्रवाहाची साक्ष देत वाचकांना अंतर्मुख करायला लावते. सुरेखा कांबळे यांचा हा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची ओढ जपणाऱ्या या लेखिकेची कहाणी फिनिक्स पक्षा प्रमाणे राखेतून उभारी घेण्यासारखी आहे. त्यांच्या घरातील आई-वडील अडाणी होते, त्यामुळे शिक्षणाचा गंधही नसलेल्या कुटुंबातून त्या शिकल्या. त्यांच्या वडिलांनी अत्यंत कष्ट करून मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी पार पाडली. शालेय जीवनात दप्तर, वह्या-पुस्तकांशिवाय शिक्षण घेत असताना त्या मुलीच्या वाट्याला आलेली कटू परिस्थिती शब्दांत मांडणे कठीण आहे. रस्त्यावर पडलेल्या तुटक्या पेन्सिलीने लिहिण्यापासून ते विना चपला शाळेत जाण्यापर्यंतच्या त्यांच्या जीवनप्रवासात शिक्षणाची जिद्द आणि आत्मविश्वास ठळकपणे दिसतो. दहावीपासून एम.ए. आणि बी.एड. पर्यंतच्या शिक्षणाच्या प्रवासात त्यांनी आर्थिक अडचणींवर मात केली. बी.एडच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या दहा हजार रुपयांची व्यवस्था करताना आई बेशुद्ध पडली, मात्र वडिलांनी शेतीतून कर्ज उचलून त्यांचे शिक्षण पूर्ण करून दाखवले. शिक्षक म्हणून काम करताना कांबळे यांनी विद्यार्थ्यांच्या वाचनसंस्कृतीसाठी विशेष योगदान दिले. शिक्षकांमध्ये लेखनाची गोडी निर्माण करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी होताना त्या नेहमीच बक्षीसे पटकावत गेल्या. वाचन, लेखन आणि चिंतन यांचा त्यांच्या लेखनात विलक्षण प्रभाव आहे. ‘विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमता वाढविण्यासाठी मी केलेले प्रयत्न’ या लेखात त्यांनी विद्यार्थ्यांच्या मध्ये वाचन संस्कृती रुजवण्यासाठी राबवलेले उपक्रम अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडले आहेत. एकच पाठ्यपुस्तक वाचून विचार प्रगल्भ होत नाहीत, तर साहित्य सागरात पोहणे शिकायला हवे, ही त्यांची धारणा वाचकांच्या मनाला भिडते. या संग्रहातील लेख विविध विषयांना स्पर्श करणारे आहेत. त्यात मराठी व्याकरणाचे महत्त्व, साहित्यिक व्यक्तिमत्त्वांचा परिचय, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे प्रयोग यांचा समावेश आहे. कुसुमाग्रजांच्या साहित्यातील चिंतनशीलता, उत्कटता आणि राष्ट्राभिमान यांचे विश्लेषण करताना त्यांच्या कवितांतील सौंदर्याचा संदर्भ देऊन लेखिकेने सखोल विचार मांडले आहेत. तसेच राजर्षी शाहू महाराजांच्या समाजकार्याचा गोषवारा मांडताना त्यांच्या शिक्षणविषयक धोरणांवर प्रकाश टाकला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मानवतावादी भूमिका आणि साहित्यिक योगदानाचे सुद्धा त्यांनी समर्पक विश्लेषण केले आहे. इंदिरा संत यांच्या कवितांमधून स्त्री जीवनातील अनेक पैलूंवर मार्मिक भाष्य करताना लेखिकेने कवयित्रीच्या सृजनशीलतेचा प्रभावी मागोवा घेतला आहे. त्यांच्या ‘झाडे झाडासारखी वागतात, माणूस माणसासारखा का वागत नाही?’ या वाक्यातून लेखिकेची पर्यावरणविषयक संवेदनशीलता दिसते. श्री स्वामी शिवानंद सरस्वती यांचा विचार उद्धृत करताना लेखिकेने विचार, कृती आणि भाषेवरील संयमाचे महत्त्व मांडले आहे. उत्तम विचाराने व्यक्तिमत्त्व घडते, हा त्यांचा दृष्टिकोन त्यांच्या लेखनात ठळकपणे जाणवतो. लेखिकेने आपल्या लेखणीतून समाजमनावर सकारात्मक संस्कार घडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची लेखनशैली ओघवती असून अनुभवांवर आधारित आहे. तळमळीने केलेले चिंतन आणि अभ्यासपूर्ण संदर्भ यामुळे लेख अधिक परिणामकारक झाले आहेत. सुरेखा कांबळे यांच्या यशस्वी साहित्यिक प्रवासामध्ये त्यांचे पती निवास कांबळे यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यांनी पत्नीला लेखनासाठी सर्वतोपरी मदत केली. गरिबीतून शिक्षण पूर्ण करून पत्नीच्या साहित्यिक झेपेसाठी सहकार्य करणारे निवास कांबळे हे आदर्श पतीचे उदाहरण आहेत. सौ. सुरेखा कांबळे यांच्या मते, मराठी विषय शिकवणाऱ्या शिक्षकांनी केवळ व्याकरण शिकवून थांबता कामा नये. काव्यलेखन, वाचन कौशल्य, भाषण आणि अभिनय यांची गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत. सुरेखा कांबळे यांचा 'लेखनीचे झरे' हा ललित लेखसंग्रह जीवनातील अनुभवांचे प्रतिबिंब आहे. त्यांच्या लेखनातून जीवनातील संघर्ष, जिद्द, सकारात्मकता आणि विचारशक्ती यांचा वेध घेतला जातो. हा संग्रह केवळ वाचनासाठी नसून विचारप्रवर्तक प्रेरणा देणारा ठरतो. त्यांच्या आगामी साहित्य प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. त्यांनी या लेखणीच्या प्रवाहातून वाचकांच्या मनात प्रेरणेचा झरा सतत सुरू ठेवावा, अशी अपेक्षा आहे.

RELATED BOOKS