लोकसंस्कृतीच्या अविष्कारांमध्ये लावणीचे स्थान अनन्यसाधारण आहे. ती केवळ शृंगारिक काव्यप्रकार नव्हे, तर तिच्यात समाजमनाचे प्रतिबिंबही स्पष्ट दिसते. काळाच्या ओघात लावणीने अनेक रूपे घेतली. कधी भक्तिरसात न्हालेली, कधी ऐतिहासिक घटनांना स्वर देणारी, तर कधी शृंगाराचा उत्कट आविष्कार सादर करणारी. प्रा. रमाकांत दीक्षित यांच्या लावण्य-गीत या संग्रहाने लावणीच्या या प्रवासाचा एक वेगळाच पदर उलगडला आहे. लावणीच्या मूलतत्त्वांना धरून, त्यांनी आपल्या रचनांना ‘लावण्य-गीत’ हे वेगळे आणि अर्थपूर्ण विशेषण जोडले आहे. या संकल्पनेत एक सौंदर्यशास्त्रीय दृष्टी आहे. लावणी हा प्रकार साधारणतः सोळाव्या शतकात उदयास आला. संत मन्मथस्वामी यांच्या लावणीत भक्तिरस होता. परंतु, पुढे पेशवाईच्या काळात लावणीने अधिक शृंगारिक रूप घेतले. रामजोशी, होनाजी बाळा, परशराम, सगनभाऊ यांसारख्या शाहिरांनी लावणीला नवा चेहरा दिला. लावणी तमाशाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचली आणि तिची लोकप्रियता शिखरावर पोहोचली. इंग्रजी राजवटीत पठ्ठे बापूराव, भाऊ फक्कड, हैबती शाहिर यांनी सामाजिक आणि व्यंगात्मक अंगाने लावणी रचली. नंतरच्या काळात ग.दि. माडगूळकर, जगदीश खेबुडकर, पी. सावळाराम यांनी चित्रपटांतून लावणीला लोकप्रियतेच्या कळसावर नेले. लावणी केवळ शृंगारात रमणारी नव्हती. तिच्यात समाजभानही होते. दुष्काळ, सामाजिक परिस्थिती, बदलते काळ यावरही लावणी रचली गेली. मात्र, काळाच्या ओघात शृंगाराची बाजू अधिक ठळक होत गेली. प्रा. रमाकांत दीक्षित यांनी या संग्रहात लावणीच्या शृंगारिकतेला वेगळ्या दृष्टिकोनातून सादर केले आहे. त्यांनी प्रारंभी शृंगारप्रधान कविता केल्या, परंतु त्या पारंपरिक लावणीसारख्या नव्हत्या. म्हणूनच त्यांनी त्याला 'लावण्य-गीत' असे नाव दिले. लावणीची निर्मिती करताना ‘मुखडा’ हा महत्त्वाचा भाग असतो. ‘जवळी घ्या चांदणी’ ही त्यांची पहिली रचना याच प्रक्रियेतून जन्माला आली. 'लावण्य-गीत' म्हणजे फक्त शृंगारिक गीत नव्हे, तर सौंदर्याचा, साजशृंगाराचा एक गीतमय अविष्कार. सौंदर्याची अनुभूती घेण्याची लावणीची ही परंपरा ‘लावण्य-गीत’मध्ये नवी उंची गाठते. लावणीतील शृंगार हा निव्वळ वासनेतून आलेला नसतो. त्यामध्ये सौंदर्याची उपासना असते, एक सात्त्विक आकर्षण असते. मात्र, आधुनिक काळात काही प्रमाणात लावणीचा दर्जा घसरला आहे. स्त्री-पुरुष नातेसंबंधांचे अतिरंजित चित्रण, अंगप्रदर्शनावर भर देणारी दृष्यात्मकता यामुळे लावणीने तिचे मूळ सौंदर्य गमावले, असे वाटते. याच पार्श्वभूमीवर लावण्य-गीत हा प्रयोग महत्त्वाचा ठरतो. हा संग्रह शृंगाराचा साज घेऊनही, अश्लीलतेपासून दूर राहतो. लावणीला तिच्या मूळ सौंदर्यात सादर करण्याचा हा प्रयत्न आहे. लावणी केवळ मनोरंजनापुरती मर्यादित राहू नये. तिच्यात सामाजिक भान असावे, विचारांची खोली असावी. आजच्या काळात संपूर्ण कुटुंब एकत्र बसून लावणी ऐकावी, असा प्रयत्न काही कलावंत करत आहेत. अशा प्रयत्नांना लावण्य-गीत सारख्या प्रयोगांची साथ मिळाली, तर लावणीला नवचैतन्य मिळू शकेल. 'लावण्य-गीत' हा फक्त एक काव्यसंग्रह नाही. तो लावणीच्या मूलभूत सौंदर्याचा शोध घेणारा, त्याला नव्या संवेदनशीलतेने मांडणारा एक प्रवास आहे. लावणीला केवळ शृंगाराच्या चौकटीत न पाहता, तिच्या संपूर्ण रूपाची जाणीव करून देणे हेच या संग्रहाचे खरे यश म्हणावे लागेल.