कविता ही केवळ शब्दांची गुंफण नसते; ती मनाच्या खोल कप्प्यांतून उमटलेली एक नादमधुर लय असते. ती कधी भावनांचे अविष्कार करते, कधी संवेदनांना स्पर्शून जाते, तर कधी आत्मशोधाचा आरसा बनते. प्रा. रमाकांत दिक्षित यांचा 'सांजगंध' हा कवितासंग्रह याच संकल्पनेचा उत्कृष्ट नमुना आहे. ‘सोनपर्व’ नंतरच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर वाचकांच्या हाती आलेला हा दुसरा कवितासंग्रह केवळ शब्दांमधून जाणवणाऱ्या भावविश्वाची साक्षच देत नाही, तर काव्यसौंदर्याच्या एका वेगळ्या उंचीवर नेतो. या संग्रहाचे 'सांजगंध' हे शीर्षकच या कवितासंग्रहाच्या संकल्पनेची साक्ष देते. सांजगंध म्हणजे संध्याकाळी दरवळणारा सौम्य, मोहक सुवास; जो दिवसभराच्या धावपळीला विसरायला लावतो आणि मनाला शांत, समाधानी करणाऱ्या भावावस्थेत घेऊन जातो. हा सुवास कधी जुन्या आठवणींना उजाळा देतो, तर कधी भविष्याच्या स्वप्नांना साकारतो. 'सांजगंध' या कवितासंग्रहातील कवितांचे स्वरूप लयबद्ध, अर्थपूर्ण आणि विविध शैलींनी नटलेले आहे. काही कविता केवळ सहा ओळींच्या आहेत, तर काहींची लांबी सव्वीस ओळींपर्यंत जाते. लघुकविता आणि दीर्घकविता या दोन्ही प्रकारांचा समावेश असल्यामुळे हा संग्रह विविध काव्यप्रकारांशी आपली जवळीक साधतो. यातील कविता कधी सहजपणे अंतर्मनातून उमटलेल्या आहेत, तर कधी दीर्घ विचारांती, चिंतनातून घडलेल्या आहेत. काही कविता अशा आहेत ज्या एखाद्या कल्पनेच्या बियाण्याप्रमाणे मनात रुजल्या आणि कालांतराने त्या कल्पनांना शब्दकलेचा साज चढला. ही वेगळी रचनाशैली कवीच्या स्वाभाविक आणि सहज प्रवाही प्रतिभेचे दर्शन घडवते. कविता हृदयाचा आरसा असते, आणि या आरशात कवीचे भावविश्व स्पष्ट दिसते. 'सांजगंध' हा संग्रहही याला अपवाद नाही. यातील कविता वैयक्तिक भावनांना स्पर्श करणाऱ्या आहेत, पण त्याचबरोबर त्या सामाजिक जाणिवाही मांडतात. या कवितांमध्ये विविध विषयांना स्पर्श केला आहे—आईचे वात्सल्य, निसर्गाचे सौंदर्य, जीवनातील संघर्ष, प्रेमाचा गोडवा, विरहाची वेदना, आणि अस्तित्वाचा शोध. कधी ही कविता सौम्य असते, जणू एखाद्या शांत संध्याकाळी मंद वाऱ्यासारखी; तर कधी ती भावनांच्या तांडवात गुंतलेली असते, जणू एखाद्या वादळी रात्रीसारखी. कवी म्हणतात की, "शब्द माणसाच्या मनाचा आधार असतो," आणि म्हणूनच कविता ही फक्त शब्दांचा खेळ नसून ती मनाच्या गाभ्यातून उमटणारा स्वर आहे. ही कविता अनेकदा चांदण्यात रेंगाळताना दिसते. त्या चांदण्यातही वेगवेगळ्या संवेदना प्रकट होतात. कवितेतील सौंदर्य आणि ताकद तिच्या प्रतिमांमध्ये असते. 'सांजगंध' मधील कविता संवेदनशील आणि अर्थगर्भ आहेत. त्या सहज शब्दांमध्ये लपलेल्या खोल अर्थाने मनाला भिडतात. उदाहरणार्थ, "गर्द निळ्या नभातला स्मरणगंध अंतराच्या तळाशी रिमझिमतो" ही ओळ केवळ वाचल्यावरही मनात एखाद्या संध्याकाळच्या आठवणी दरवळू लागतात. स्मरणगंध म्हणजे भूतकाळातील हळवे क्षण, आणि ते अंतराच्या तळाशी रिमझिमणे म्हणजे आपल्याही नकळत ते क्षण जिवंत होणे. 'सांजगंध' मधील कवितांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची गेयता. कवितेची लय आणि संगीतात्मकता तिला अधिक परिणामकारक बनवते. यातील कविता केवळ वाचण्यासाठी नाहीत, तर त्या ऐकाव्याशा वाटतात. यामुळेच त्या काव्यसंग्रहाच्या संकल्पनेला पूर्णपणे न्याय देतात. या कवितासंग्रहातील रचनांचे भावनिक आणि तात्त्विक मूल्यमापन करताना काही ठळक वैशिष्ट्ये जाणवतात. आत्मसंवाद आणि संवेदनशीलता: कविता ही केवळ बाह्य जगाच्या वर्णनापुरती नसून ती अंतर्मनाशी साधलेला संवादही आहे. यातील कविता वाचताना वाचक स्वतःलाही शोधू लागतो. भावनांची वैविध्यता: प्रत्येक कवितेत वेगवेगळ्या भावनांचा मिलाफ आहे. आनंद, दु:ख, स्मरण, आशा आणि वेदना अशा विविध भावभावनांचे प्रतिबिंब त्यात उमटते. भाषेचा लालित्यपूर्ण वापर: कवीने शब्दांचा अतिशय नाजूक आणि सुंदर पद्धतीने वापर केला आहे. त्यांच्या निवडीतून कवितेचे सौंदर्य अधिक उठावदार होते. 'सांजगंध' हा केवळ कवितासंग्रह नसून तो एक संवेदनशील प्रवास आहे. शब्द, लय आणि भावना यांच्या संयोगातून हा संग्रह साकारला आहे. कवितांचे विषय भलेही मर्यादित असतील, पण त्यात पसरलेले चांदणे मात्र अमर्याद आहे. 'सांजगंध' हा केवळ एका कवितासंग्रहाचा प्रवास नसून, तो मनाच्या गाभ्यात खोलवर झिरपत जाणारा अनुभव आहे.