साहित्य ही केवळ कल्पनारंजनाची बाब नसून वास्तवाचा आरसा असतो. ते केवळ लेखनकौशल्य किंवा रंजनाचा प्रकार नाही; तर मानवी भावभावनांचा, अनुभवांचा आणि समाजातील असंख्य पैलूंचा दस्तऐवज असतो. अशाच वास्तवदर्शी आणि हृदयस्पर्शी कथा प्रा. रमाकांत दीक्षित यांच्या 'गंडुऱ्या' या कथासंग्रहात सापडतात. या संग्रहातील कथा लेखकाच्या प्रत्यक्ष अनुभूतीतून जन्म घेतात आणि त्यामुळे त्या अधिक जिवंत, परिणामकारक आणि हृदयाला भिडणाऱ्या ठरतात. "गंडुऱ्या" या कथासंग्रहाच्या निर्मितीविषयी लेखक स्वतः स्पष्ट करतात की, यात समाविष्ट प्रत्येक कथा त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांवर आधारित आहे. त्या घटना मनात खोलवर ठसल्या आणि त्या अभिव्यक्त करण्याची तीव्र गरज लेखकाला वाटली. कोणतीही कथा आधीपासून ठरवून लिहिली नाही, तर ती अनुभवाच्या आणि भावनांच्या प्रवाहातून सहज जन्माला आली. विशेष म्हणजे काही कथा एका बैठकीत पूर्ण झाल्या, तर काही कथा दीर्घ काळ विस्मृतीत गेल्या आणि त्यानंतर पुन्हा नव्या उर्जेने पूर्णत्वास आल्या. कथाकार संवेदनशील असतो, असावा लागतो. संवेदनशील मन म्हणजे टिपकागद सभोवताली जे काही घडते, जे भावते, त्याचा ठसा उमटतो. तो ठसा स्पष्ट स्वरूपात बाहेर पडतो, तेव्हा कथा जन्म घेते. ही संवेदनशीलता आणि वास्तवाचा स्पर्शच या कथांना प्रभावी बनवतो. संग्रहातील ‘गंडुऱ्या’, ‘झोप’, ‘संबुळी निमंत्रण’ या कथा लेखकाने स्वतः अनुभवलेल्या घटनांवर आधारलेल्या आहेत. ‘गया’, ‘जयऱ्या’ आणि ‘अखेरचा श्वास’ या कथा एका बैठकीत लिहिल्या गेल्या कारण त्या प्रसंगांनी लेखकाच्या मनात खोलवर घर केले होते. हा भावनिक ओलावा आणि अनुभवाचे दाटलेपण कथांची गहिरी खोली वाढवतात. कथेसाठी कल्पना असते, पण ती कल्पना वास्तवाच्या आधाराशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. म्हणूनच लेखक म्हणतात, "कथेच्या बीजाला रुजायला अनुभूतीच्या मातीचा आधार लागतो, आत खोलवर ओलावा झिरपायला हवा असतो." हा ओलावा लेखकाला त्यांच्या गावाने दिला. ग्रामीण जीवनाच्या सहजसुंदर, पण कधी कधी कठीण आणि वेदनादायी वास्तवाने कथांना खऱ्या अर्थाने जिवंत केले. म्हणूनच या कथा केवळ रंजक नाहीत तर अंतर्मुख करणाऱ्या आहेत. "गंडुऱ्या" म्हणजे गाठीची लाकडे, ओंडके, जे सहज फुटत नाहीत. त्यांना फोडण्यासाठी जास्त श्रम आणि वेळ लागतो. हेच या कथासंग्रहाचे सार आहे. जीवनातील काही प्रसंग, काही अनुभव असेच असतात. ते सहज उमगून जात नाहीत, समजून घ्यावे लागतात. या कथांमध्येही अशाच वेगवेगळ्या गाठी उकलत जातात. या कथासंग्रहाची शैली आणि भाषा याही विशेष दखल घेण्याजोग्या आहेत. लेखक स्वतः स्पष्ट करतात की, साहित्यनिर्मिती म्हणजे कृत्रिम भाषेचा प्रयोग नव्हे, तर आपल्याला दिसणाऱ्या, जाणवणाऱ्या वास्तवाचे नैसर्गिक प्रतिबिंब असते. म्हणूनच या कथांची भाषा संवादप्रधान, सहज आणि ओघवती आहे. या कथांमध्ये केवळ घटना नाहीत, तर त्या काळातील जीवनमूल्यांचे, सामाजिक जाणिवांचे आणि भावनिक गुंतवणुकीचे स्पष्ट प्रतिबिंब उमटले आहे. कोणत्याही समाजाची ओळख त्याच्या जीवनशैलीतून आणि मूल्यव्यवस्थेतून होते. त्या दृष्टिकोनातून पाहता, 'गंडुऱ्या' हा संग्रह ग्रामीण समाजाच्या मनोव्यापाराचे अत्यंत प्रभावी चित्रण करतो. या कथांमध्ये वास्तवाचे दर्शन घडते आणि त्या काळातील समाजाच्या विविध पैलूंचा वेध घेतला जातो. त्यामुळे वाचक त्या काळाच्या जीवनशैलीशी, परंपरांशी आणि समाजव्यवस्थेशी जोडले जातात. या कथांचा परिणाम असा आहे की, त्या वाचून मन अस्वस्थ होते, अंतर्मुख होते आणि विचारप्रवृत्त होते. "गंडुऱ्या" हा कथासंग्रह वाचताना वाचकाला केवळ गोष्टी ऐकल्यासारखे वाटत नाही, तर त्या अनुभवांचा तो साक्षीदार बनतो. प्रत्येक कथा वाचकाला वेगळ्या भावविश्वात घेऊन जाते आणि त्याला अंतर्मुख करते. लेखनाची सहजता, वास्तवदर्शी आशय आणि भाषेतील स्वाभाविकपणा यामुळे हा कथासंग्रह निश्चितच मराठी साहित्यातील एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरतो. या कथासंग्रहातील प्रत्येक कथा ही जीवनाच्या कठीण वास्तवाचा आणि मानवी भावभावनांचा वेध घेते. म्हणूनच हा संग्रह साहित्यप्रेमींसाठी, समाजपरिवर्तनाच्या दृष्टिकोनातून विचार करणाऱ्यांसाठी आणि वास्तवाचे दर्शन घडवणाऱ्या साहित्यात रस असणाऱ्यांसाठी निश्चितच वाचनीय आहे.