'बुद्ध धम्म' – सामाजिक क्रांतीचे आणि मानवमुक्तीचे अधिष्ठान... भारतीय उपखंडाच्या इतिहासात अनेक धर्म, विचारप्रणाल्या आणि तत्त्वज्ञान निर्माण झाले. परंतु ज्याने संपूर्ण समाजव्यवस्थेचा पाया हादरवला, जो केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक, नैतिक आणि बौद्धिक क्रांतीचा धगधगता ज्वालामुखी ठरला, अशी एकमेव चळवळ म्हणजे बुद्ध धम्म. डी. एल. कांबळे यांच्या ‘बुद्ध धम्म – एक महान क्रांती’ या पुस्तकात हाच मूलगामी विचार अभ्यासपूर्ण आणि निर्भीड शैलीत मांडला आहे. बुद्ध धम्म ही केवळ कोणाची अध्यात्मिक किंवा धार्मिक श्रद्धा नाही; ती तर एका विषारी सामाजिक रचनेविरुद्धची असंतोषाने पेटलेली आंतरिक ज्वाला आहे. तथागत बुद्धांनी धर्माचा अर्थच नव्याने परिभाषित केला. जे मानवाचे कल्याण करते, जे मुक्तीकडे नेते आणि जे कृतीवर आधारित आहे, तेच खरे ‘धम्म’. यामुळे बुद्ध धम्म ही श्रद्धेवर नाही, तर समजुतीवर आधारित क्रांती ठरते. जिथे जन्मावरून माणसाची जात ठरवली जात होती, तिथे बुद्ध म्हणतात – “जात जन्मावरून नव्हे, कर्मावरून ठरते.” हे वाक्य म्हणजे त्या काळच्या ब्राह्मणवादी व्यवस्थेला थेट आव्हान होते. म्हणूनच कांबळे सांगतात की, ही धार्मिक क्रांती नव्हती, तर सामाजिक आणि बौद्धिक क्रांती होती. हिंदू धर्मव्यवस्था म्हणजे जातीच्या उतरंडीवर उभे राहिलेले एक विषारी झाड. डॉ. बाबासाहेब म्हणतात, “हे झाड जर नष्ट करायचे असेल, तर त्याच्या फांद्या नव्हे, मुळेच उपटून फेकावी लागतील.” तथागत बुद्धांनी हीच मुळे उखडण्याचे काम सुरू केले. पण कालांतराने ही क्रांती दडपण्यात आली, तिला विकृत करण्यात आले. समाज पुन्हा जुन्या व्यवस्थेत अडकू लागला. डी. एल. कांबळे यांच्या म्हणण्यानुसार, बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा एकदा बुद्ध धम्माच्या माध्यमातून ही लढाई उभी केली. त्यांची घोषणा – “सारा भारत बौद्धमय करीन” – ही केवळ धर्मांतरणाची नाही, तर नवसमाज उभारणीची घोषणा होती. त्यांनी व्यवस्थेच्या मुळालाच हात घातला. पण त्यांच्या पश्चात आपण केवळ फांद्या तोडत राहिलो. मुळं तशीच राहिली, म्हणून आजही विष फोफावत आहे. आजच्या काळात धम्म म्हणजे केवळ काही विधी, कार्यक्रम आणि सामाजिक स्नेहमेळावे इतकाच अर्थ घेतला जातो. यामुळे धम्माचे मूळ उद्दिष्ट हरवले आहे. माणसाचे आत्मोद्धार, समतेची स्थापना, आणि तर्कशुद्ध जीवनशैली. धम्माविषयी उदासीनता ही केवळ अज्ञानातूनच नव्हे, तर व्यवस्थेच्या प्रचंड दबावातूनही येते. कांबळे यांच्या लेखणीतून हा मुद्दा स्पष्ट होतो. जर भारताचा खरा विकास हवा असेल, तर ही विषारी समाजव्यवस्था नष्ट करावीच लागेल. त्या कामासाठी केवळ बौद्ध धम्माची अंधश्रद्धा नव्हे, तर बुद्धाच्या विचारांची आणि तत्त्वज्ञानाची खरी समज आवश्यक आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात, आपण सर्वांनी नव्याने भीमप्रतिज्ञा घेतली पाहिजे. धम्मप्रचार आणि प्रसार करणे हीच खरी मानवसेवा होय. कारण हा धम्म म्हणजे केवळ एका धर्माचा प्रचार नाही, तर एक मुक्तिचळवळ आहे. ही चळवळ आहे, अंधश्रद्धाविरुद्ध, अन्यायाविरुद्ध, विषमतेविरुद्ध. आजच्या काळात धम्म म्हणजे स्वतःची जबाबदारी, जगण्याची सन्माननीय वाट, आणि समाजात समानतेच्या मूल्यांची पुनर्स्थापना. डॉ. बाबासाहेबांनी दाखवलेला मार्ग हा केवळ बौद्ध बनण्याचा नव्हे, तर बुद्धवत होण्याचा आहे – शांत, तर्कशुद्ध, करुणामय आणि क्रांतिकारक. ‘बुद्ध धम्म – एक महान क्रांती’ हे पुस्तक आजच्या पिढीसाठी एक आरसा आहे. समाज, धर्म, विचार आणि व्यवहार यांच्यात खोलवर गेलेले विष नष्ट करायचे असेल, तर बुद्ध धम्माची खरी समज आणि कृती आवश्यक आहे. आपण धम्माचा प्रचार केला नाही, तर आपले भवितव्य पुन्हा अंधकारमय होईल. म्हणूनच, आज गरज आहे नव्याने उभं राहण्याची, नव्याने विचार करण्याची आणि नव्याने जीवन जगण्याची.